रविवारी सकाळी डोंबिवली एमआयडीसीतील एका केमिकल कंपनीत केमिकल ड्रमचा स्फोट होऊन चार कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात व्ही. सी. एम. पॉलीयुरोथिन प्रा. लि. कंपनी प्रशासन व दिपक म्हात्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर कबीर भोईर, राजू राठोड, सुमित राय आणि अभिषेक कुमार शाहू अशी जखमी कामगारांची नावे आहेत.
दुर्घटनेत जखमी कामगार कबीर भोईर (वय 44) याच्या तक्रारीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात प्रशासनाविरोधात भादवि कलम 337, 338, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास कबीर भोईर सह अन्य कामगार या कंपनीत दुसऱ्या मजल्यावर साफसफाईचे काम करत होते.
कंपनीचे मॅनेजर व कंपनी प्रशासनाने सदर ठिकाणी केमीकलचा एक लहान ड्रम ठेवला होता. सदर केमीकल व रॉ मटेरीयलच्या ड्रमबाबत सुरक्षिततेच्या कोणत्याही उपाययोजना आणि दक्षता घेतली नव्हती.
यात कंपनी प्रशासनाचा बेकादरपणा, हयगय व निष्काळजीपणा कारणीभूत ठरला. केमिकल व रॉ मटेरीयलचा ड्रम ठेवलेल्या ठिकाणी इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे आगीच्या ठिणग्या उडाल्या. या ठिणग्या ज्वालाग्राही केमिकलच्या ड्रमवर पडल्याने ड्रम फुटून त्यातील केमीकल वेगाने बाहेर पडले.
हे केमिकल तेथे काम करणाऱ्या कबीर भोईरसह अन्य तीन कामगारांच्या अंगावर पडले. यात चारही कामगार जबर होरपळून गंभीर स्वरूपात जखमी झाले. या दुर्घटनेनंतर कंपनीत पळापळ झाली. जखमी कबीर भोईर, राजू राठोड, सुमित राय आणि अभिषेक कुमार शाहू या चौघा जखमींना तात्काळ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे हॉस्पिटल सूत्रांनी सांगितले. या दुर्घटनेची दखल घेत मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक होनमाने यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक संपत फडोळ यांच्याकडे याचा अधिक तपास दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.