"सतत केंद्राकडून मदत मागणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा हा तर धोरण लकवाच"
मुंबई: सवंग लोकप्रियतेसाठी आताच मी कोणतीही मदत जाहीर करणार नाही. नीट माहिती घेऊन सर्वांना मदत जाहीर केली जाईल, असं विधान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर असताना केले. त्यावरून भाजपाचे मुख्य प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरेंना टोला लगावला. "मुख्यमंत्री ठाकरेंचा संकटग्रस्त भागातील हवाईमार्गे केलेला धावता दौरा हा सवंग लोकप्रियतेचाच प्रकार आहे. कोणतीही मदत न देता व दुःखातून सावरण्याची जबाबदारीही संकटग्रस्तांवरच सोपवून हात हलवत माघारी येण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी घरातूनच आढावा घेतला असता, तर मदत यंत्रणेवरील ताण तरी वाचला असता", असा खोचक टोला उपाध्ये यांनी लगावला.
"संकटग्रस्त जनतेसमोर हात जोडणे, आश्वासनांवर बोळवण करणे अशी 'सवंग लोकप्रियते'ची नाटके राज्य सरकारने थांबवावीत आणि राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी अहवालांचे कागदी घोडे नाचविण्याऐवजी तातडीने मदत जाहीर करावी. कोकणातील चिपळूण या पूरग्रस्त शहरात तसेच त्याआधी रायगड जिल्ह्यातील तळिये या गावी जाऊन मुख्यमंत्री ठाकरे यांनी संकटग्रस्तांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्या भावनांचाच अपमान केला आहे. आपण सवंग लोकप्रियतेसाठी काही घोषणा करणार नाही, असे सांगत संकटग्रस्तांना आवश्यक असलेली तातडीची मदतदेखील मुख्यमंत्र्यांनी नाकारली असून महाराष्ट्रातील जनतेला वाऱ्यावर सोडून ठाकरे यांनी संकटात सापडलेल्या जनतेची कुचेष्टा केली आहे", असा आरोप उपाध्ये यांनी केला.
उपाध्ये म्हणाले की अगोदरच विध्वंसाने खचलेल्या व जवळचे नातेवाईक गमावलेल्या जनतेच्या दुःखात सहभागी होण्याची व त्यांना मानसिक व आर्थिक आधार देऊन सावरण्याची खरी गरज असताना, तुम्ही स्वतःला सावरा, असा सल्ला देत मुख्यमंत्र्यांनी स्वतःवरील जबाबदारीही संकटग्रस्तांवरच सोपविली. गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने जनतेवरच जबाबदारी ढकलत व केंद्राच्या मदतीची याचना करत दुबळेपणा दाखविणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा धोरण लकवाच या दौऱ्यातून पुन्हा एकदा उघड झाला आहे असे ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.