शहापूर : सर्वांच्या लाडक्या विघ्नहर्त्याचे आगमन अवघ्या दोन दिवसांवर आले आहे. बाप्पावर अखेरचा हात फिरवण्याची मूर्तिकारांची लगबग सुरू आहे. यंदाच्या उत्सवावर मात्र कोरोनाचे प्रचंड सावट आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सरकारने हा उत्सव साजरा करण्यावर काही निर्बंध घातल्याने बाप्पा 28 फुटांवरून थेट 4 फुटांवर आला. गणेशमूर्तींची उंची कमी तर झालीच; साहित्य, मजुरीचे दर वाढले, पण गेल्या वर्षीपेक्षा यंदा मूर्तींची मागणी कमी झाल्याने मोठा आर्थिक फटका बसल्याचे गणेश मूर्तिकार सांगतात.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. तालुक्यात बहुतांश ग्रामीण भाग असला तरी जवळपास 80 टक्के गावांमध्ये कोरोनाने शिरकाव केल्याने प्रशासनाने सरकारी नियमांप्रमाणे गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. परिणामी उत्सव साजरा करावा की नाही, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे.
हा संभ्रम असतानाच तालुक्यातील बाजारपेठेतही खरेदीचा उत्साह दिसून येत नसल्याचे व्यापारी सांगतात. याचा मोठ्या आर्थिक फटका जसा व्यापाऱ्यांना बसला तसा गणेश मूर्तीकारांनाही बसला. मूर्तीची उंची कमी झाल्याने शिवाय मागणीही घटल्याने उत्पन्नात घट झाली. मजुरीचे वाढलेले दर, कच्चामाल, रंग, सजावटीचे महागलेले साहित्य यामुळे मूर्तिकारांचे बजेट यंदा कोलमडल्याचे चित्र आहे.
याबाबत शहापुरातील तरुण मूर्तिकार राहुल झुंजारराव सांगतात की, दरवर्षी मुंबई, ठाणे, भिवंडी, हैदराबाद, डोंबिवली येथील गणेश भक्त मूर्ती घेण्यासाठी माझ्याकडे येतात. "होम मिनिस्टर फेम' आदेश बांदेकर हेसुद्धा गेली 10 ते 12 वर्षे गणेशमूर्ती घेऊन जातात. गेल्या वर्षी "मिरा-भाईंदरचा महाराज' ही गणेशाची मूर्ती 28 फुटांची होती, ती यंदा 4 फुटांचीच असणार आहे. मात्र, कोरोनामुळे यंदा मूर्तींची मागणी घटली.
लॉकडाऊनमुळे मूर्ती बुकिंगला उशीर झालाच; पण मूर्तीसाठी लागणाऱ्या साहित्याचे भाव, कामगारांचे वेतन वाढले. त्यामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. राज्यातील सर्वच मूर्तिकार वर्षभर या कामात गुंतलेले असतात. यात पैशांची मोठी गुंतवणूक होते. मात्र, कोरोनामुळे या मूर्तिकारांवर मोठे आर्थिक संकट ओढावल्याचे राहुल झुंझारराव सांगतो.
कोरोनामुळे अधिक सोपे झाले...
पर्यावरण रक्षण आणि संरक्षण यांचे महत्त्व वेळीच लक्षात आले. त्यातच "माहुली निसर्ग सेवा न्यास' या संस्थेद्वारे निसर्गकार्यात मनापासून सक्रिय झालो. त्यातूनच "प्लास्टर ऑफ पॅरिस'च्या गणेशमूर्तींना मनातून कायमचे विसर्जित करण्याचे ठरवले. हल्ली आम्ही केवळ शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनवतो. ज्या पूर्णपणे हाताने बनवाव्या लागतात. या मूर्ती साकारताना उंचीवर मर्यादा ठेवाव्या लागतात, आता कोरोनामुळे नियमांचे बंधन आल्याने ते अधिक सोपे झाले, असे शहापुरातील मूर्तिकार मनीष व्यापारी सांगतात. या प्रवासात शिरीष पितळे आणि वडील प्रभाकर व्यापारी यांचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले.
तालुक्यात ‘एक गाव-एक गणपती’
शहापूर तालुक्याच्या ग्रामीण भागात ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबवण्यावर शहापूर पोलिसांकडून भर देण्यात येत आहे. याबाबत पोलिस पाटील व सार्वजनिक मंडळांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत असल्याचे शहापूरचे पोलिस निरीक्षक घनश्याम आढाव यांनी सांगितले.
तालुक्याची कोरोना रुग्णसंख्या 1100 हून अधिक असून, त्यामुळे गणेशोत्सवावर निर्बंध आले आहेत. परिणामी ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पनाच बहुतेक गावांमध्ये स्वीकारली जाऊ शकेल. पोलिस प्रशासन विविध गावांतील मंडळांच्या बैठका घेणार आहे. यानंतर चित्र स्पष्ट होईल, असे पोलिस निरीक्षक आढाव यांनी सांगितले.
------------------
(संपादन : प्रणीत पवार)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.