सर्वपक्षीय मंडळींनी राजकीय मतभेद बाजूला ठेऊन शहरांसाठी एकत्र यावे, असे आवाहन विवेक पंडित यांनी या निमित्ताने केले.
डोंबिवली : डोंबिवलीतील विद्यानिकेतन शाळेच्या (Vidyaniketan School Dombivli) बसवरील (Bus) बॅनर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. डोंबिवली शहरातील रस्त्यांची सुरू असलेली कामे, रेल्वेचा जीवघेणा प्रवास, शहरातील नागरी समस्या, ट्रॅफिक जाम यामुळे मेटाकुटीला आलेल्या नागरिकांना हवाय दिलासा.. समाधान.. त्यासाठी निवडणुका झाल्या, निकाल लागले. निदान आता तरी, राजकीय पक्षनेते मंडळींनी ज्या शहराने राजकीय ओळख दिली त्या शहराशी काही वेळ, नाळ घट्ट करावी असा संदेश शाळेचे संस्थापक विवेक पंडित यांनी बॅनरच्या माध्यमातून दिला आहे.
विवेक पंडित (Vivek Pandit) नेहमीच सामाजिक प्रश्नांवर, शहरातील नागरी समस्यांवर त्यांच्या माध्यमातून आवाज उठवतात. यामुळे काही प्रमाणात फरक पडतो, परंतु पुन्हा स्थिती जैसे थे होते. पण, त्यामुळे आपण आपले जनजागृतीचे काम सोडायचे नाही असे पंडित म्हणतात. केवळ नेते मंडळी नव्हे तर सर्वच शासकीय यंत्रणा देखील त्याला जबाबदार असून नियोजन शून्य कारभार सुरू असल्याचे ते म्हणाले.
लाखो रुपये खर्च करून कल्याण शीळ बांधला, अल्पावधित तो खणला. मेट्रोचे नियोजन शासकीय मंडळींनी दिले नाही का? मेट्रो खरं तर शहरातील मंडळींना किती उपयोगाला येणार आहे हे देखील प्रश्नच असल्याचे पंडित म्हणाले. जागोजागी सीसी रस्त्याची कामे सुरू असून त्याबद्दल बोलायची सोय नाही. पर्यायी रस्ते नको का द्यायला? असा सवाल त्यांनी केला. कोणाचाही कोणाला पायपोस नाही अशी स्थिती आहे, गंभीर चित्र असून वाहतूक कोंडीवर कोणताही अॅक्शन प्लॅन नाही, अशी शहर कशी पुढे जातील याची चिंता त्यांनी व्यक्त केली.
त्यामुळे लोकप्रतिनिधी नात्याने सर्वपक्षीय नेत्यांनी या शहराशी असलेली बांधिलकी सिद्ध करण्याची वेळ आली आहे, असा टोला त्यांनी लगावला. निवडणूक झाली राजकीय धुळवड थांबली असून पक्षाशी जशी निष्ठा बाळगता तशी शहराविषयी दाखवावी, या शहरांनी ओळख दिली आहे हे विसरू नका, अशी खोचक टीकाही त्यांनी केली. डोंबिवलीकर नागरिकांना मेट्रोची संधी कमी मिळणार असून त्यासाठी कल्याण शीळ रस्ता नव्याने केला आणि उखडला हे संयुक्तिक वाटत नाही, त्यामुळे नागरिकांना त्रास नसावा असेही ते म्हणाले. विकासाच्या नावाखाली त्रास नसावा, समस्या सुटावी वाढू नये असे ते म्हणाले.
सर्वपक्षीय मंडळींनी राजकीय मतभेद बाजूला ठेऊन शहरांसाठी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी या निमित्ताने केले. अखेरीस ते म्हणाले की, जनतेसाठी केलेले चांगले काम, जनता, योग्य ठिकाणी व्यक्त करतेच असा टोलाही त्यांनी नुकत्याच लोकसभा निकालाच्या आकड्यांचा थेट उल्लेख न करता त्याचाच आधार घेत लगावला. आणि नकळतपणे आगामी विधानसभा, महापालिका निवडणुका असल्याने नेतेमंडळींना सावध केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.