मुंबई : पुतण्या मोहम्मद रिझवान इक्बाल हसन शेख इब्राहिम (30) याला अटक झाल्यानंतर कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहीम याने छोटा शकील व फहिम मचमच यांना मुंबईला एकही दूरध्वनी न करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे "डी कंपनी'ने तीन महिन्यांत खंडणीसाठी सोडाच, मुंबईतील नातेवाईकांना एकही दूरध्वनी केलेला नाही.
दाऊद इब्राहीमचा पुतण्या रिझवान याच्यासोबत खंडणीप्रकरणी अटक करण्यात आलेला रफिक टॉवलवाला याचा व्यावसायिक वाद सोडवण्यासाठी छोटा शकीलचा हस्तक फहिम मचमच याने तक्रारदाराला धमकीचा दूरध्वनी केला होता. तक्रारदाराने तीन वर्षांपूर्वी अश्फाक रफिक टॉवलवाला याच्यासोबत भागीदारीत व्यवसाय सुरू केला होता. त्याला अश्फाक याच्याकडून 15 लाख 50 हजार रुपये येणे होते. त्यासाठी त्याने अनेकदा मागणी केली होती.
अहमद वधरियाचा निकटवर्तीय असलेल्या टॉवलवालाकडून पैशांची मागणी करू नकोस, अशी धमकी तक्रारदाराला 12 जूनला दूरध्वनीवरून देण्यात आली. दूरध्वनीवरील व्यक्तीने आपण फहिम मचमच असल्याचे त्याला सांगितले. त्यानंतर 13 व 16 जूनला वधरियाकडूनही धमकीचे दूरध्वनी आले. त्याने हे दूरध्वनी ध्वनिमुद्रित करून या तिघांविरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार नोंदवली.
त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून दुबईवरून परतल्यानंतर वधरियाला अटक केली होती. ध्वनिमुद्रणातील आवाज व वधरियाच्या आवाजात साम्य आहे. तो मचमचसाठी मुंबईतील व्यावसायिकांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होता. वधरिया 2016 मध्ये रिझवानमार्फत मचमचच्या संपर्कात आला होता. या प्रकरणात रिझवानही अडकल्यामुळे दाऊदच्या आणखी एका जवळच्या नातेवाईकाची चौकशी झाली.
दाऊद टोळीच्या दोन हवाला ऑपरेटरनाही या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे.
दाऊदचा छोटा भाऊ इक्बाल सध्या तुरुंगात आहे. त्याचा आणखी एक भाऊ नुरा याचा मुलगा सोहेलही अमेरिकन यंत्रणांच्या ताब्यात असून, त्याला लवकरच भारताच्या ताब्यात दिले जाणार आहे. या प्रकरणांत दाऊदच्या कुटुंबातील अनेक जणांवर "मोक्का'अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे दोनतीन वर्षे तरी त्यांना जामीन मिळणे कठीण असल्याने तुरुंगातच राहावे लागणार आहे.
या पार्श्वभूमीवर तीन महिन्यांपूर्वी दाऊदने छोटा शकील व फहिम मचमच यांना बोलावून भारतात आणि विशेषत: मुंबईत कोणालाही दूरध्वनी न करण्याचा आदेश दिला होता. रिझवानच्या अटकेचे खापर फोडून दाऊद व छोटा शकील यांनी मचमचला सज्जड दम दिला होता. त्यामुळे "डी कंपनी'ने तीन महिन्यांपासून खंडणीसाठी कोणालाही दूरध्वनी केलेला नाही; तसेच त्याच्या नातेवाईकांशीही पाकिस्तानातून संपर्क साधण्यात आलेला नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
..........
दुबईमार्गे संपर्कही बंद
यापूर्वी "डी कंपनी'चे दुबईतील हस्तक दाऊदच्या कुटुंबीयांना तेथून दूरध्वनी करायचे. त्यानंतर कॉन्फरन्स सेवेद्वारे हा कॉल पाकिस्तानमधील दाऊदशी जोडला जायचा. ते दूरध्वनीही भारतीय यंत्रणा व गुन्हे शाखेने पकडले. त्यामुळे आता "व्हाया दुबई' दूरध्वनीही बंद झाले आहेत. संपर्क साधण्यासाठी दाऊदचे नातेवाईक परदेशात जात असून, तेथे स्थानिक सीमकार्डचा वापर करत असल्याचे समजते.
..........
पाकिस्तानी यंत्रणांचा दबाव
जागतिक पातळीवर भारताने पाकिस्तानची कोंडी केली आहे. त्यातच दाऊदचे दूरध्वनी भारतीय यंत्रणा "इंटरसेप्ट' करत असल्यामुळे तो पाकिस्तानातच असल्याचे उघड झाले आहे. दाऊदचे नाव जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत असल्यामुळे भविष्यात त्याचा फटका पाकिस्तानला बसू शकतो. त्यामुळे "डी कंपनी'वर पाकिस्तानी यंत्रणांचा मोठा दबाव असल्याचे बोलले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.