मुंबई - व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनाच्या अंतर्गत येणाऱ्या दादर येथील मुलीच्या शासकीय आयटीआय मध्ये आज विविध ट्रेडच्या मुलींना बौद्धिक संपदा आणि नाविन्यता व शोधा संदर्भात धडे देण्यात आले. डक्सलेजीस अटर्नीज या अग्रगण्य संस्थेच्यावतीने हे प्रशिक्षण देण्यात आले.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली आज दादर येथील मुलींच्या आयआयटीमध्ये या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दादर आयटीआयच्या प्राचार्य नीलम मरसकोल्हे, हर्षदा जोशी, संगीता पुणतांबेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मुलींच्या आयटीआय मधील कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, एसपीए आणि आयसीटीएमसी या ट्रेड च्या 100 हून अधिक मुलींनी या प्रशिक्षणामध्ये सहभाग घेतला होता.
डक्सलेजीस अटर्नीजचे मॅनेजिंग पार्टनर दिव्येंदु वर्मा यांनी जगभरातील शोध, त्यामागील पार्श्वभूमी त्यातील नाविन्यता आणि त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी दृष्टी विकसित करण्यासाठी अतिशय मोलाची माहिती दिली. त्याला उपस्थित मुलींनी मोठा प्रतिसाद दिला.
विद्यार्थ्यांनी आपले करिअर सुरू करताना व विविध प्रकारचे ट्रेनिंग पूर्ण करताना कायमच शोधक दृष्टीने आपली नजर विकसित केली पाहिजे आपल्या आजूबाजूच्या परिसरात असलेल्या वस्तू व परिसर याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यामध्ये नाविन्यता आणि विविध शोध घेतले पाहिजे, एकूणच मानवी गरजा आणि त्यासाठी सुलभता कशी निर्माण होईल हा शोध घेण्यासाठी ती नजर विकसित केली पाहिजे असे आवाहन यावेळी वर्मा यांनी केले.
वर्मा यांनी जगभरातील शोधाच्या उगम आणि त्या संदर्भातील माहिती विशद केली. जगाचा विकास एका चाकाच्या माध्यमातून सुरू झाला, त्याच्या प्रगतीतून असंख्य शोध आले, अशाच प्रकारे मानवी गरजा याच विविध शोधाच्या जननी ठरल्या, आणि शोध लागत गेले.
विद्यार्थ्याना शिक्षण घेताना पेटंट यांची माहिती आवश्यक असल्याचे सांगत वर्मा यांनी हरियाणाच्या सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या पृथ्वी सिंग याचे उदाहरण दिले. त्याने वेगावर नियंत्रण आणणाऱ्या प्रणालीवर पेटंट मिळवले. त्यावर आज जागतिक स्तरावरील अनेक संस्थांनी त्याची दखल घेतली.. हीच बाब आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात होऊ शकेल. त्यामुळे शोधक विचार आणि त्या दृष्टीने प्रत्येक गोष्टीकडे पाहणे आवश्यक आहे.
हीच नाविन्यता, नवीन शोधक दृष्टी तुमच्यातील नवीन संशोधक निर्माण करेल, यासाठी विद्यार्थिनींनी कायम त्या दृष्टीने विचार करावा असे आवाहन वर्मा यांनी यावेळी केले. विविध प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून शोध आणि नाविन्यता तसेच पेटंट या संकल्पना विषद करण्यात आल्या. डक्सलेजीस अटर्नीजच्या मॅनेजींग असोसिएट प्रीती मोरे यांनी बौद्धिक संपदा या संकल्पनेचे विविध उदाहरणासह विश्लेषण केले.
या प्रशिक्षणामुळे आम्हीही संशोधक होऊ शकतो हा विश्वास निर्माण झाला असल्याची भावना विद्यार्थिनींनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.