मुंबई: माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे माळवते गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते. या आरोपांवरून आज उच्च न्यायालयाने गृहमंत्र्यांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले. या आदेशानंतर अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला. आधी सचिन वाझेचं निलंबन, मग परमबीर सिंह यांची बदली आणि आता गृहमंत्र्यांचा राजीनामा... विरोधकांच्या दृष्टीने आता पुढचं टार्गेट कोण असा सवाल पत्रकारांकडून विचारण्यात आला. त्या प्रश्नावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सूचक उत्तर दिले.
"आमच्या दृष्टीने कोणताही मंत्री टार्गेटवर नाही. सध्या देशात आणि जगात महाराष्ट्राची प्रतिमा खराब होत आहे. राज्यातील पोलिसांची प्रतिमादेखील डागाळली जात आहे. ही प्रतिमा पूर्ववत करणं हेच आमचं टार्गेट आहे. त्यासाठी जे करावं लागेल, ते आम्ही नक्कीच करून", असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
एकटे देशमुख नाही, अनेक नावं समोर येतील...
"हे जनतेच्या मनातलं सरकार नाही. बेईमानीचं सरकार आहे. या सरकारचे तीन पक्ष आपापला अजेंडा चालवत आहेत. प्रत्येक मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राला स्वत:ची जहागीर समजतो आहे. पण माझ्याकडे जी माहिती आहे त्यावरून मी सांगतो की एकटे अनिल देशमुखच नव्हे तर अनेक नावं भविष्यकाळास उघडकीस येतील. सध्या मी यावर बोलणार नाही. चौकशी आणि तपासात पुराव्यासहित माहिती बाहेर येईल", असा दावा त्यांनी केला.
शरद पवार यांच्यावर टीका
शरद पवार यांनी अनिल देशमुख यांची पाठराखण करण्यासाठी ज्या पत्रकार परिषदा घेतल्या, त्यातील दुसऱ्या पत्रकार परिषदेत त्यांच्यावर ओढवलेली परिस्थिती दुर्दैवी होती. त्यांना नीट माहिती दिली नसल्याने ती चुकीची पाठराखण झाल्यासारखं वाटलं. राजीनामा आधीच द्यायला हवा होता. कारण 'बूंद से गयी वो हौद से नहीं आती', असं मत त्यांनी व्यक्त केलं.
संजय राऊतांच्या प्रश्नावर हसतहसत दिली भन्नाट प्रतिक्रिया
संजय राऊत यांची परिस्थिती सध्या 'सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही' अशी झाली आहे. सरकारमध्ये असल्याने त्यांचा खूपच गोंधळ उडालाय. त्यांना काही वेळा सरकारचा बचाव करावा लागतो तर काही वेळा सरकार विरोधात आक्रमक व्हावं लागतं. ज्या वेळी त्यांना एखाद्या गोष्टीचा बचाव करता येत नाही, त्यावेळी ते 'मी ती गोष्ट वाचली नाही किंवा पाहिलं नाही' असं सांगतात", अशी मिस्कील प्रतिक्रिया फडणवीस यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.