डोंबिवली - डोंबिवली शहरात रस्त्यांची सिमेंट काँक्रीटीकरणाची कामे सुरू आहेत. या कामासाठी काही ठिकाणी पूर्ण वाढ झालेल्या वृक्षांची कत्तल करण्यात येत असल्याची बाब डोंबिवली मधील एका वृक्षप्रेमीने उघडकीस आणली आहे.
याप्रकरणी त्यांनी केडीएमसी प्रशासनास पत्रव्यवहार केला आहे. मात्र पालिका प्रशासनाने फारशी दखल न घेतल्याने त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात कंत्राटदार आप्पा पवार व त्यांचे साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कल्याण मधील इंदिरानगर मध्ये किरण शिंदे राहण्यास आहेत. शिंदे आपल्या सहकाऱ्यांसह गेल्या आठ वर्षांपासून पर्यावरण संवर्धनाचे काम करत आहेत. त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार शिंदे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी के. व्ही. पेंढरकर कॉलेज समोर असलेल्या रोटरी क्लब लगतच्या सार्वजनिक जागेत 5 जून 2015 रोजी लावली होती. या रोपट्यांमध्ये बदाम आणि पिंपळ वृक्षांचा समावेश होता.
अनेक अडथळ्यानंतर साधारणत: 6 ते 8 वर्षांची ही झाडे 14 ते 15 फुट वाढली होती. या झाडावर नैसर्गिक जैवविविधता सुध्दा वास्तव्यास होती. बदामाच्या झाडाला फळेही लागली होती. मागील अनेक दिवसांपासून घरडा सर्कल ते पेंढरकर कॉलेज दरम्यान रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण आणि फुटपाथ बांधण्याचे काम सुरू आहे.
त्यामुळे लागवड केलेल्या झाडांना धोका होण्याची शक्यता असल्याने अनेकदा त्यांना पाहण्यासाठी, निगा राखण्यासाठी वेळ मिळेल तसा या रस्त्यावर येत जात असायचो. 20 ऑक्टोबर रोजी रात्री 9.30 च्या दरम्यान पिंपळ आणि बदामासह रस्त्यालगतची इतर झाडे मुळापासून तोडून टाकल्याचे निदर्शनास आले. वृक्ष तोडलेले पाहून धक्काच बसला.
या घटनेची अधिक माहिती काढली असता, सदर फुटपाथचे बांधकाम करणाऱ्या कामगाराने सांगितले की, कॉन्ट्रॅक्टर आप्पा पवार आणि इतरांनी या झाडांची कत्तल केली आहे. परवानगी शिवाय झाडे तोडल्याने तक्रारदार किरण शिंदे यांनी केडीएमसीच्या संबंधित खात्याकडे पत्राद्वारे पाठपुरावा सुरू केला. मात्र महिना उलटला तरी प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने शिंदे यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे.
शिंदे यांच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध अधिनियम 1995 चे कलम 2 (ग), 3 सह महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनीयम 1975 कलम 21 (1) व (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.