मुंबई : सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे देण्यास केंद्र सरकारने बिहार सरकारची शिफारस मान्य केली. त्यापाठोपाठ सुशांतच्या बँक खात्यातून झालेल्या पैसे हस्तांतरणाबाबत तक्रारी आल्याने अंमलबजावणी संचलनालयानेही (ईडी) या प्रकरणात एन्ट्री घेतली. सुशांत सिंग राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्तीच्या संपत्तीत गेल्या काही वर्षांपासून सातत्यपूर्ण वाढ होत असल्याचे तिच्या प्राप्तिकर परताव्यावरून स्पष्ट होत असल्याचे सक्तवसूल संचलनालयातील (ईडी) सूत्रांनी सांगितले. ईडीने रिया चक्रवर्तीला शुक्रवारी (ता.7) चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी ईमेलद्वारे समन्स पाठवले आहे. मात्र रियाकडून अद्याप याप्रकरणी कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.
सुशांतसिंग आत्महत्येप्रकरणी आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने तपास सुरू केला असून याप्रकरणी अनेक संशयितांची चौकशी करण्यात ईडीने सुरूवात केली आहे. याप्रकरणी सोमवारी सुशांतचे चार्टर्ड अकाऊंटन्ट संदीप श्रीधर यांची ईडीने चौकशी केली होती. पण त्यांच्याकडून अद्याप अपेक्षित माहिती मिळाली नसून त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलवण्यात येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ईडीने याप्रकरणी केलेल्या प्राथमिक तपासात रियाच्या प्राप्तिकर परताव्याची माहिती घेतली असून गेल्या काही वर्षांत तिच्या मिळकतीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. ही वाढ एवढी मोठी नसली तरी या वाढीत सातत्य असल्याचे ईडीतील सूत्रांनी सांगितले. तसेच मिळकतीत वाढ एवढी मोठी नसतानाही रियाने दोन मालमत्तांची खरेदी केली आहे. त्यातील एक मालमत्ता रिया व दुसरी तिच्या कुटुंबाच्या सदस्याच्या नावावर आहे. त्यासाठी नेमके पैसे कोठून आले. ते अद्याप स्पष्ट नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यासाठी या मालमत्तांबाबतच्या व्यवहारांची कागदोपत्री माहिती ईडीने मागवली असून ती लवकरच प्राप्त होणार आहे. या सर्व व्यवहारांबाबत ईडी रियाची चौकशी करणार आहे.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या करुन जवळपास दीड महिना उलटला आहे. पण त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी सुशांतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीमध्ये त्यांनी रियाने घर सोडताना घरातील रोख रक्कम, दागिने, लॅपटॉप, क्रेडिट कार्ड आणि सुशांतच्या वैद्यकीय सूचनांची कागदपत्रे सोबत नेली असे म्हटले आहे.
तसेच सुशांतच्या खात्यामधील 15 कोटी रुपये देखील रियाने काढले असल्याचे म्हटले होते. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा बिहार पोलिसांनी दाखल केल्यानंतर याप्रकरणी मुंबईत तपासाला सुरूवात केली. त्यानंतर ईडीनेही याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. आता याप्रकरणी ईडीने रियाला चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. या चौकशीसाठी एक प्रश्नावली बनवण्यात आल्याचे ईडीतील सूत्रांनी सांगितले.
----
संपादन : ऋषिराज तायडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.