नवी मुंबई : महामुंबई क्षेत्रातील पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी तत्काळ कारवाई करावी. त्याचबरोबरच पर्यावरण संरक्षणासाठी "ग्रीन पोलिसांची' नेमणूक करावी, अशी मागणी नवी मुंबईतील पर्यावरणप्रेमींनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली. विकासाच्या नावाखाली स्थानिक प्रशासनाचे पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाकडे होत असलेल्या दुर्लक्षाकडे या वेळी पर्यावरणप्रेमींनी ठाकरे यांचे लक्ष वेधले.
नेचर कनेक्ट फाऊंडेशन आणि श्री एकवीरा आई प्रतिष्ठानच्या प्रमुखांनी नुकतेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना याबाबतचे निवेदन सादर केले. आदित्य ठाकरे यांनी निवडणुकीपूर्वी "आरे'ला वन क्षेत्र म्हणून घोषित करण्याच्या आणि तो भाग वन खात्याकडे सोपवण्याबाबत दिलेल्या वचनाची आठवण करून देण्यात आली. तसेच हे आश्वासन लवकरात लवकर पूर्ण करण्याची विनंतीही या वेळी करण्यात आली.
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील उरणला नवी मुंबई सेझ, जेएनपीटी, एनएचएआय इत्यादी प्रकल्पांचा फटका बसला असल्याचे ठाकरे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. जेएनपीटीच्या चौथ्या कंटेनर टर्मिनलसाठी 15 हजारहून अधिक खारफुटी नष्ट करण्यात आल्या. एनएमएसईझेडअंतर्गत येणाऱ्या पागोटे येथील 100 एकर आणि भेंडखळ येथील 150 एकर पाणथळ जमिनी अनधिकृत भरावाने नष्ट करण्यात आल्याची बाबही छायाचित्रे व त्यासंदर्भात केलेल्या तक्रारीच्या आधारे दाखवण्यात आल्याची माहिती, नेचर कनेक्टचे संचालक बी. एन. कुमार यांनी सांगितले.
याविषयी श्री एकवीरा आई प्रतिष्ठानचे प्रमुख नंदकुमार पवार म्हणाले, उरणचा बहुतांश भाग महाराष्ट्रातील सर्वांत मोठा पाणथळ भाग होता. गेली काही वर्षे सातत्याने होत असलेल्या भरावामुळे येथे आता धुळीचे साम्राज्य दिसू लागले आहे. भरावामुळे येथील 26 गावांच्या अस्तित्त्वाचा तसेच तेथील पारंपरिक मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांकडून याबाबत केल्या जाणाऱ्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याकडेही या संस्थांनी लक्ष वेधले. त्यामुळे पर्यावरण संरक्षण संवर्धनासाठी स्वतंत्र हरित पोलिसांची (ग्रीन पोलिस) नेमणूक केली जावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
खाणींना संरक्षित क्षेत्र जाहीर करावे
सेव्ह नवी मुंबई, सेव्ह नवी मुंबई वेटलॅंडस्, नेचर कनेक्ट यांसारख्या इतर पर्यावरणप्रेमी संस्थांच्या विरोधानंतर पारसिक हिल येथील खाणींना संरक्षित क्षेत्र म्हणून जाहीर करण्याचे नवी मुंबई महापालिकेने मान्य केले. तसेच हे खाण क्षेत्र पर्यावरण प्रकल्प म्हणून विकसित करण्याचेही आश्वासन दिले, परंतु हे निव्वळ आश्वासन राहू नये याकरता ठाकरे यांनी पाठपुरावा करावा, अशी विनंतीही या वेळी करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.