मुंबई - मुंबईकरांना बेस्ट उपक्रमाच्या माध्यमातून आणखी एक सुखद अनुभव मिळणार आहे, तो म्हणजे डबल डेकर बसचा. मुंबईच्या ताफ्यात लवकरच डबल डेकर इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार आहेत. आतापर्यंत बेस्टच्या ताफ्यात फक्त डिझेलवर आधारीतच डबल डेकर बस होत्या. पण मुंबईकरांना प्रवासाचा एक सुखद अनुभव देण्यासाठी बेस्टच्या ताफ्यात ९०० डबल डेकर बसेस घेण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी बेस्ट वाहतूक उपक्रमाने घेतला होता. त्यापैकी प्रोटोटाईप बसेस या बेस्टच्या ताफ्यात येत्या आठवड्याभरात दाखल होतील, अशी माहिती आहे.
स्विच मोबिलिटीकडून बेस्ट उपक्रमाला या इलेक्ट्रिक बसेस भाडेतत्वावर देण्यात येणार आहेत. मुंबईतील गेम चेंजिंग असा हा अनुभव असेल असेही कंपनीने म्हटले आहे. तसेच वाहतूक क्षेत्रात मोठी क्रांती घडवणारे पाऊल असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. येत्या शुक्रवारी डबल डेकर बसेस बेस्टच्या ताफ्यात सामील होणार होत्या. परंतु काही कारणाने कंपनीने या बसेसच्या लोकार्पणाचा कार्यक्रम पुढे ढकलला आहे.
सध्या बेस्टकडे पुरवण्यात येणारी बस ही ९०० बसेसपैकी प्रोटोटाईप बस आहे. या बसच्या निमित्ताने होणाऱ्या मुंबईच्या रस्त्यावरील चाचण्या, प्रवाशांचा प्रतिसाद आणि उपयुक्तता याबाबतचा अहवाल बेस्ट उपक्रमाकडून तयार करण्यात येईल. त्यानंतरच या बसेसचा समावेश बेस्टच्या ताफ्यात करण्यात येणार आहे, अशी माहिती आहे. या वर्षअखेरीपर्यंत बेस्टच्या डबल डेकर बसेस मुंबईच्या रस्त्यावर धावणे अपेक्षित आहे.
बेस्टच्या डबल डेकर बसेस या जास्त प्रवासी वाहतुकीच्या क्षमतेच्या आहेत. परंतु छोट्या बसेसच्या तुलनेत डबल डेकर बसेसचा प्रति लिटर डिझेलचा एव्हरेज कमी होता. आता इलेक्ट्रिक पर्यायामुळे इंधनाची बचत तसेच वाहतुकीच्या दृष्टीने अधिक प्रवासी क्षमतावाढ शक्य होणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.