Ganpat gaikwad firing:
उल्हासनगर: अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावात असलेल्या जमिनीच्या वादातून महिलेला जातिवाचक अपशब्द वापरणे आमदार गणपत गायकवाड यांना महागात पडले आहे. याप्रकरणी गायकवाड यांच्यासह आठ जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. उल्हासनगरमधील पोलिस ठाण्यात झालेल्या गोळीबारप्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या आमदार गायकवाड यांच्या अडचणींत आणखी वाढ झाली आहे.
तक्रारदार महिला ही द्वारली गावात राहत असून तिचे मृत सासरे नामदेव जाधव यांच्या नावे द्वारली गावात सर्व्हे क्रमांक ६ ची जमीन आहे. ही महिला ३१ जानेवारीला दुपारी १ वाजण्याच्या सुमारास आपल्या जाऊबाईंसोबत जमिनीच्या ठिकाणी गेली होती. तेथे आमदार गणपत गायकवाड यांच्यासह जितेंद्र पारीक, विठ्ठल चिकणकर, शिवाजी फुलोरे, सौरभ सिंग, छोटू खान, चंद्रकांत ओल आणि मंगेश वारघेट हे उपस्थित होते. या जमिनीच्या मालकी हक्काचा वाद हा न्यायालयात पोहोचला आहे. महसूल विभाग, मंत्रालयातही याबाबत तक्रार करण्यात आली आहे.
याबाबत निकाल लागायचा बाकी असल्याने वादग्रस्त जमिनीभोवती पत्र्याचे कुंपण घालण्यास त्यांनी विरोध केला. त्यावर आमदार गणपत गायकवाड हे फावड्याचा दांडका घेऊन त्यांच्या अंगावर धावले आणि जातिवाचक अपशब्द वापरून तुम्ही कोणत्याही कोर्टात जा, तुमची जमीन घेणारच असा दम दिला. त्यानंतर गायकवाड यांच्यासोबत असलेल्या इतरांनीही या वेळी महिलांना शिवीगाळ केली, असे नीता जाधव यांनी तक्रारीत म्हटले आहे.
या तक्रारीवरून आमदार गणपत गायकवाड, जितेंद्र पारीक, विठ्ठल चिकणकर, शिवाजी फुलोरे, सौरभ सिंग, छोटू खान, चंद्रकांत ओल आणि मंगेश वारघेट यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल जगताप करत आहेत. (Latest Marathi News)
त्याच दिवशी महिला तक्रारीसाठी आली होती-
गोळीबाराची घटना घडली त्याच दिवशी ही महिला रात्री ९ वाजता गणपत गायकवाड यांच्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात आली होती. तिची तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असतानाच आमदार गायकवाड यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिनमध्ये कल्याण पूर्वेचे शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर गोंधळ उडाल्याने ही महिला घरी निघून गेली होती. अखेर आज या महिलेने दिलेल्या तक्रारीवरून आमदार गायकवाड यांच्यासह आठ जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवला आहे.
जमीन मालकांकडून सुरक्षेची मागणी-
आमदार गायकवाड यांनी जाधव कुटुंबीयांच्या जमिनीवरून महेश गायकवाड, राहुल पाटील आणि चैनू जाधव यांच्या दिशेने पोलिस ठाण्यात गोळीबार केला आहे. त्यामुळे जमीनमालकांनी आमच्या जीवाला धोका असून आम्हाला शासनाने सुरक्षा द्यावी, अशी मागणी माध्यमांसमोर केली आहे. (Thane Crime News)
न्यायालयाच्या बाहेर घोषणाबाजी अंगलट-
हिल लाईन पोलिस ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पूर्वेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्या झालेल्या गोळीबारप्रकरणी गणपत गायकवाड यांना शनिवारी चोपडा न्यायालयात हजर करण्यात आले होते. या वेळी आमदार गायकवाड यांच्या समर्थनार्थ न्यायालयाबाहेर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली होती. याप्रकरणी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात अनेक कार्यकर्त्यांवर मनाई आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. यात गुड्डू खान, मोना शेठ, नीलेश बोबडे, शीला राज, सूरज खान, अंजली खामकर, विद्या त्रिंबके, भावेश टोल, सरिता जाधव, लावण्या दळवी, यशोदा माळी व अन्य २५ ते ३० अनोळखी व्यक्तींचा समावेश आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.