मुंबई : घरात आलेला चार पायांचा पाहुणा कधी नात्याच्या जिव्हाळ्यात विरघळून जातो ते कळतही नाही... त्यात तो जर कुत्रा असेल तर बघायलाच नको... सर्वात इमानी प्राणी असा मान असलेला कुत्रा काही दिवसांत माणसाळून जातो. शेपटी फिरवत मालकाभोवती त्यांचं पिंगा घालणं असो की अनोळखी व्यक्तीवर जीवाच्या आकांताने भुंकणं असो, सारं काही कौतुकास्पद वाटतं... पण अशा पोटच्या गोळ्याप्रमाणे माया केलेलं आपलं `पिल्लू` अचानक जाण्याचं दुःख काळीज चिरून जातं... नालासोपाऱ्यात राहणाऱ्या एका `आई`च्या नशिबी रविवारी असंच दुःख आलं. अवघ्या तीन ते चार महिन्यांचा त्यांचा जर्मन शेफर्ड जातीचा `विस्की` त्यांना सोडून गेला. निमित्त झालं, एका साध्या इन्फेक्शनचं... पण लॉकडाऊनमुळे उपचार न मिळाल्याने तो वाचू शकला नाही. माझं पिल्लू देवाघरी गेलं, असं म्हणत त्यांनी फोडलेला हंबरडा सर्वांच्या डोळ्याच्या कडा ओलावून गेला.
हे वाचलं का? : हवामानतज्ज्ञ म्हणतात, कोणताही ऋतू असो स्वच्छता हवीच!
कोरोनाच्या विध्वंसामुळे देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. अत्यावश्यकच सेवाच चालू आहेत. सर्वच डाॅक्टर आणि त्यांची वैद्यकीय टीम कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी झटत आहे. मनुष्यबळ कमी पडतंय, पण त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच नालासोपाऱ्यातील रहिवासी असलेल्या एका कुटुंबीयातील एक सदस्य आजारी पडला. त्यांचा लाडका कुत्रा `विस्की`ला कसला तरी संसर्ग झाला. जर्मन शेफर्ड जातीचे अवघ्या तीन ते चार महिन्यांचे ते पिल्लू. आजारपणामुळे अस्वस्थ दिसू लागलं. त्याच्यावर प्रचंड जीव असलेल्या त्याच्या मालकिणीने त्याला वाचविण्यासाठी लॉकडाऊनच्या काळातही अथक प्रयत्न केले. त्याला कुशीत घेऊन वाचविण्यासाठी सर्वत्र धावपळ केली. रविवारीही ती पुन्हा त्याला घेऊन जनावरांच्या दवाखान्यात घेऊन गेली, पण त्याला वाचवू शकली नाही.
महत्त्वाचे : `या` ठिकाणी घेतली जातेय कामगारांची उत्तम काळजी
उपचारांसाठी सुरू असलेल्या धावपळीदरम्यानच `विस्की`ने शेवटचा श्वास घेतला. त्याची जाणीव होताच मालकिणीचे अवसानच गळून पडले. खाली बसत त्या रडू लागल्या. त्यांच्या पाणावलेल्या डोळ्यांत `विस्की`च्या साऱ्या आठवणी दाटून आल्या होत्या. त्याच्या निष्प्राण देहाला कवटाळून त्या हमसून हमसून रडू लागल्या. त्यांच्यासोबत असलेली त्यांची मैत्रीण त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करत त्यांना धीर देत होती. मात्र, ते दृश्य मन हेलावून टाकणारे होते... माझं पिल्लू देवाघरी गेलं, अशी अव्यक्त भावना त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती.
अंतिम संस्कारासाठी प्रयत्न
आपल्या लाडक्या कुत्र्याचे अंतिम संस्कार योग्य प्रकारे व्हावेत, त्याला रीतसर दफन करता यावे म्हणून पालिकेकडून काही मदत मिळते का यासाठी मालकिणीने आपल्या मित्र-मैत्रिणींतर्फे प्रयत्न केले. पण कोरोना लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवेत असलेले पालिका कर्मचारी उपलब्ध होऊ शकले नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.