सुमारे ३ किलोमीटर लांबीचा आहे नवा उड्डाणपूल
मुंबई: घाटकोपर-मानखुर्द फ्लायओव्हरमुळे मुंबईकरांचा अनावश्यक खर्च होणारा वेळ वाचेल आणि त्यांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. या फ्लायओव्हरच्या लोकार्पणाच्या वेळी ते बोलत होते. 'हा प्रकल्प उपयुक्त आणि जनहिताचा आहे. जनहिताचे प्रकल्प उभारण्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेचा हातखंडा असून त्याबद्दल एक मुंबईकर म्हणून महानगरपालिकेचा मला नेहमी अभिमान वाटतो', अशा शब्दांत त्यांनी BMC चीही प्रशंसा केली. जाणून घेऊया या उड्डाणपुलाची खास वैशिष्ट्ये-
नवीन उड्डाणपुलाची ठळक वैशिष्ट्ये-
घाटकोपर-मानखुर्द जोडरस्ता हा शीव (सायन) - पनवेल महामार्ग आणि पूर्व द्रुतगती मार्ग या दोहोंना जोडणारा मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावर पूर्व द्रुतगती मार्ग, सांताक्रुज-चेंबूर जोडरस्ता तसेच पूर्व मुक्त मार्गावरुन येणाऱ्या वाहनांमुळे नेहमी वाहतूक कोंडीचा अनुभव येत होता. त्यावर उपाय म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने हा सुमारे ३ किलोमीटर लांबीचा नवीन उड्डाणपूल बांधण्यात आला आहे.
हा उड्डाणपूल हा शिवाजी नगर, बैंगनवाडी, देवनार क्षेपणभूमी व मोहिते पाटील नगर हे चार महत्त्वाचे जंक्शन त्यासोबत देवनार नाला, चिल्ड्रेन एड नाला, पी. एम. जी. पी. नाला अशा ३ मोठ्या नाल्यांवरुन जातो.
पुलाच्या निर्मितीसाठी लागलेल्या साहित्याचा विचार करता एकूण १ लाख ०२ हजार २२५ घनमीटर काँक्रिट, १७ हजार १७५ मेट्रिक टन लोखंड (रेनफोर्समेंट स्टील), ४ हजार ४८६ मेट्रिक टन संरचनात्मक लोखंड (स्ट्रक्चरल स्टील), १ हजार मेट्रिक टन एच.टी. स्ट्रॅण्ड, ५८६ नग बेअरिंग्स आणि १० हजार ३६२ मेट्रिक टन डांबर मिश्रण वापरात आले आहे.
पुलाची एकूण लांबी २.९९१ किलोमीटर तर रुंदी २४.२ मीटर इतकी आहे. उत्तर वाहिनी ३ व दक्षिण वाहिनी ३ अशा एकूण ६ मार्गिका या पुलावर आहेत. या उड्डाणपुलाचे बांधकाम सेगमेंट तंत्रज्ञानाने व एकल स्तंभ पद्धतीने केलेले असल्याने पुलाखालील रस्त्याच्या मार्गिका देखील वाहतुकीसाठी वापरात आल्या आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत या उड्डाणपुलासाठी प्रथमतःच अखंड पद्धतीने २४.२ मीटर लांबीचा सेगमेंट तयार करण्याचे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.