कल्याण, ता. २९ (वार्ताहर) : भारतीय रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी वातानुकूलित लोकलची सुविधा निर्माण केली आहे; मात्र लोकलमधील एसी बंद पडत असल्याने व्यवस्था कोलमडली आहे. परिणामी प्रवाशांना एसी लोकलमधून उकाड्यात प्रवास करण्याची वेळ आली आहे. कल्याण स्टेशनवरून सकाळी पावणेनऊच्या सुमारास मुंबईकडे रवाना होणाऱ्या वातानुकूलित लोकलमधील एसी मंगळवारी (ता. २८) बंद पडला. एसी बंद पडण्याच्या घटना वारंवार घडत असून प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच गरमी सहन करावी लागल्याने प्रवासीवर्गात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
एकीकडे असह्य उकाड्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. पाराही चाळिशीच्या पुढे गेलेला आहे. लोकलमध्ये होणाऱ्या गर्दीमुळे जीव गुदमरत प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे प्रवाशांचा गारेगार प्रवास व्हावा, यासाठी रेल्वे प्रशासनाने वातानुकूलित सेवा उपलब्ध करून दिली आहे. वातानुकूलित लोकलने प्रवास सुखकर होईल, या आशेने चाकरमान्यांनी हजारो रुपये खर्च करीत मासिक पास काढला. यामुळे रेल्वेला कोट्यवधींचा आर्थिक फायदा होत आहे; मात्र गेल्या दोन दिवसांपासून वातानुकूलित यंत्रणा बंद पडल्याने लोकलमध्ये प्रवासीवर्गात एकच गोंधळ उडाल्याचे दिसून आले आहे.
कल्याण रेल्वे स्थानकातून सुटणाऱ्या वातानुकूलित लोकल गाडी कल्याण कार शेडमध्ये उभी असताना गाडीत काही तांत्रिक बिघाड आहे का, याची चाचपणी रेल्वे प्रशासनाकडून केली जाते; मात्र याबाबत कोणतीही तपासणी व उपाययोजना न करता रेल्वे गाडी प्रवांशासाठी उपलब्ध करून दिली जाते, अशी माहिती प्रवाशांनी दिली आहे.
घामाच्या धारा
सकाळच्या दरम्यान सुटणाऱ्या वातानुकूलित गाडीत मोठ्या संख्येने गर्दी होत आहे. पुढे डोंबिवलीत डब्यांमध्ये गर्दी होते. या वातानुकूलित डब्यात प्रवाशांना काही अडचण निर्माण झाल्यास लाल बटन उपलब्ध करून दिले आहे. प्रवाशांनी बटन दाबल्यास त्याची माहिती मोटरमन व गार्ड यांना तत्काळ मिळते; मात्र गेल्या दोन दिवसांपासून वातानुकूलित गाडीत तांत्रिक बिघाड होत असताही दुर्लक्ष केले जात आहे. वातानुकूलित प्रवासाकरता प्रवासी रेल्वेचा आर्थिक फायदा करीत असतानाही गरमीच्या काळात वातानुकूलित डब्यात यंत्रणा बंद पडल्याने प्रवाशांना घामाच्या धारांसह प्रवास करावा लागत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.