मुंबई : कलाकारांचे हक्काचे घर अशी ओळख असलेले परळमधील दामोदर नाट्यगृह कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे व्यवस्थापनाला कोट्यवधींचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागला. त्यात बुधवारी (ता. 23) झालेल्या मुसळधार पावसामुळे नाट्यगृहात पाणी शिरले व ध्वनियंत्रणेसह तब्बल 400 आसने पाण्यात बुडाली. त्यामुळे आर्थिक संकटात अधिकच भर पडल्याने नाट्यगृह पुनर्जीवित करण्यासाठी व्यवस्थापनाला आता आर्थिक मदतीची गरज लागणार आहे.
मराठी नाट्यसृष्टीतील अनेक कलाकारांना दामोदर नाट्यगृहाने व्यासपीठ मिळवून दिले. तसेच नवोदित कलाकारांना दिशा दाखविणारे आणि नाटक, तमाशा, लावणी या लोककलांची अभिजात परंपरा जपणारे नाट्यगृह म्हणून "दामोदर'ची ओळख आहे; मात्र कोरोना संकटानंतर पावसामुळे नाट्यगृहातील 400 आसने, एलईडी प्रकाश योजना, लाकडी रंगमंच, विद्युत उपकरणे, ध्वनियंत्रणा असे 30 लाखाहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याने व्यस्थापनासमोर नाट्यगृह पूर्ववत करण्याचे मोठे आव्हान आहे.
यासंदर्भात नाट्यगृहाचे व्यवस्थापन सांभाळणाऱ्या सोशल सर्व्हिस लीगचे सचिव चंद्रकांत खोपडे म्हणाले की, गेल्या 50 वर्षांपासून परळच्या विभागात पाणी भरण्याची समस्या कायम आहे. यावर तोडगा निघणे गरजेचे आहे. यंदा पावसात नाट्यगृहातील महत्त्वपूर्ण साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी सहकार्यासाठी संबंधित प्रशासनाला तसेच महापौरांना पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. गिरणगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या परिसरात पूर्वी साधारण 10 ते 15 मिल होत्या. त्या प्रत्येक मिलमध्ये तळीसुद्धा होती. त्यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबण्याची समस्या निर्माण होत नसे; मात्र कालांतराने मिल बंद झाल्या आणि तळी बुजवून मैदाने झाली आहेत. या कारणामुळे पावसाळ्यात पाणी तुंबण्याची समस्या वाढू लागली आहे.
यावर कायमचा तोडगा म्हणून या परिसरातील मैदानावर तळी बांधण्याबाबतचा प्रस्ताव पालिका प्रशासनाला देण्यात आलेला आहे. त्यामुळे लवकरच परळ हिंदमाता या सखल भागात पाणी तुंबण्याची समस्या कायमची मिटेल, असा विश्वास नगरसेवक सचिन पडवळ यांनी व्यक्त केला आहे.
दामोदर हे फक्त एक नाट्यगृह नसून ते एक सांस्कृतिक केंद्र आहे. नाट्यगृहाच्या संचालकांनी नाट्यगृहाची अशी अवस्था पुन्हा होऊ नये म्हणून आवश्यक ते उपाय करावेत; तसेच तसेच लवकरात लवकर त्याच्या दुरुस्तीवर लक्ष द्यायला हवे. जेणेकरून पुढील नुकसान टळेल.
- प्रमिला धनू, नाट्य कलाकार
कित्येक कलाकार याच रंगमंचावर घडले आहेत. कलाकारांच्या उपजीविकेचे साधन म्हणून आजही कलाकार या रंगमंचाकडे बघतात; मात्र सहा महिन्यांपासून नाट्यगृह बंद आहे व आता पावसामुळे नुकसान झाल्याने छोट्या कलाकारांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नाट्यगृहाचे काम लवकरात लवकर व्हावे यासाठी नाट्यगृहाच्या पदाधिकऱ्यांनी व शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
- सुनील पाटेकर, कलाकार-दिग्दर्शक
(संपादन - अनिल जमधडे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.