विरार : पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात वसलेल्या जव्हार, मोखाडा, विक्रमगड या तालुक्यांचा विकास होण्यासाठी वीजपुरवठ्याचा अडथळा कारणीभूत ठरत आहेत. या ठिकाणी वीजपुरवठा करणारी वाहिनी घनदाट जंगलाच्या भागातून जात असल्याने नवीन वाहिनी टाकण्याचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे, तर 40 किलोमीटरची वाहिनी उभारण्यास ठेकेदार मिळत नाही. अस्तित्वात असलेल्या वीजवाहिनी व उपकरणांमध्ये अनेकदा तांत्रिक बिघाड होत असल्याने या तीन तालुक्यांमधील वीजपुरवठा बेभरवशाचा झाला आहे.
जव्हार भागात वीज उपकेंद्राची गरज असल्याचे पूर्वापार सांगण्यात येत होते. सन 2008 पासून या उपकेंद्राला जागा मिळत नसल्याने हा प्रकल्प रेंगाळला होता. सन 2015 मध्ये उपकेंद्रासाठी जागा उपलब्ध झाल्यानंतर जव्हार विनवड भागात सुमारे तीन कोटी रुपये खर्च करून 132 के.व्ही. नवीन विद्युत उपकेंद्राचे काम पूर्ण झाले असून मार्च2019 मध्ये या केंद्रातील 33 के.व्ही स्तरावर कार्यान्वित झाले आहे. या उपकेंद्राला बोईसर येथून वीजपुरवठा केला जाणार असून जव्हार येथील उपकेंद्रासाठी 132 के.व्ही. सूर्यनगर- कावडास- जव्हार दुहेरी वाहिनी टाकणे आवश्यक होते. डहाणू ते जव्हार असे एकंदरीत 80 किलोमीटर लांबीची विद्युत वाहिनी टाकायचे काम दोन टप्प्यात हाती घेण्यात आले आहे. त्यापैकी 40 किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यात असणाऱ्या दीडशे टॉवरपैकी खुल्या जागेवर असलेल्या काही निवडक 10-15 टॉवरच्या उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे; परंतु उर्वरित अधिकांश टॉवर वनविभागाच्या परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत. उर्वरित 40 किलोमीटरचा दुसऱ्या टप्प्याच्या भागात घनदाट जंगल असल्याने व काम करणे अत्यंत खडतर असल्याने चार-पाच वेळा प्रसिद्ध केलेल्या निविदांना ठेकेदारांकडून प्रतिसाद मिळला नाही. दरम्यान या विद्युत वाहिनीसाठी सुमारे 180 हेक्टर वनजमिनीवर टॉवर उभारणी होणे अपेक्षित असल्याने या प्रकरणाला वनविभागाच्या वरिष्ठ कार्यालयाकडून मान्यता मिळणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत हे प्रकरण डहाणू वन विभागाच्या कार्यालयातून ठाण्याच्या वन कार्यालयात पोहोचले आहे; पण त्याला परवानगी कधी मिळणार, याची वाट नागरिक बघत आहेत.
आणखी ठेकेदार आवश्यक
सध्या अस्तित्वात असलेली वहिनी बोईसर- डहाणू- गंजाड- सूर्यानगर- जव्हार- मोखाडा अशी कार्यरत असू डहाणू ते गंजाड दरम्यानच्या 22 किलोमीटरची विद्युत वाहिनीची व्यवस्था अत्यंत खराब स्थितीत आहे. या योजनेचे विस्तारीकरण व नूतनीकरण हाती घेण्यात आले असले, तरी डोंगराळ भागात काम करण्यास अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे एक दिवसभर शटडाऊन घेतल्यानंतर जेमतेम दोनशे ते तीनशे मीटरचे काम होत असल्याचे दिसून येत आहे. हे काम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी आणखी ठेकेदार नेमण्याची गरज निर्माण झाली आहे.
तरुण सुविधापासून वंचित
विद्युत उपकेंद्र तयार असताना जव्हारकडे जाणारी विद्युत वाहिनी नव्याने टाकण्यास तसेच जुन्या विद्युत वाहिनीची दुरुस्ती करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने जव्हार, विक्रमगड व मोखाडा या भागातील विद्युत प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिला आहे. करोना संक्रमणाच्या काळात शैक्षणिक संस्था ऑनलाईन पद्धतीने शिकवत असताना व शासकीय कामासाठी अनेक बाबींची ऑनलाईन पूर्तता करावी लागते; परंतु सुरळीत विद्युतपुरवठा नसल्याने ग्रामीण भागातील युवक व नागरिक या अनेक सुविधांपासून वंचित राहत आहे.
------------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.