मुंबई: आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ५ ऑगस्ट रोजी बेलार्ड पिअर परिसरात झळकलेला बॅनर सध्या चर्चेत आहे. या बॅनरवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांचा 'सेनापती' तर आव्हाड यांचा 'उपसेनापती' असा उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे पुन्हा एकदा राजकारणात खळबळ उडाली आहे.
यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या अंतर्गत राजकारणामुळे अनेकदा वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. कुण्या एका सेनापतीमुळे विजय होत नसतो, असे रोहित पवार यांनी म्हटले होते. आता पुन्हा एकदा मुंबईत बॅनर लागल्यामुळे राजकारणात मोठी चर्चा निर्माण झाली आहे.
लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात चांगले प्रदर्शन केले होते. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षात गटबाजी आणि अंतर्गत कलहाचे वृत्त समोर येत आहे. यापूर्वी रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील मतभेद उघडपणे समोर आले होते.
शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने लोकसभा निवडणुकीत ८ जागा जिंकल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या उपस्थितीत अहमदनगर येथे पक्षाचा २५ वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला होता. मात्र, या वेळी रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील वादाने पक्षातील अंतर्गत कलह उघडकीस आणला.
“येत्या काळात कोणीही आपण सेनापती असल्याचा दावा करू शकतो, पण हा विजय कोणा एका व्यक्तीमुळे किंवा एक-दोन नेत्यांमुळे मिळालेला नसून सर्वसामान्य कार्यकर्त्यांमुळे मिळालेला विजय आहे. आणि शरद पवार यांनी त्यांच्या वयाच्या ८३ व्या वर्षी केलेल्या मेहनतीमुळे असे परिणाम आले आहेत." यावेळी रोहित पवार हा जयंत पाटील यांच्या नावाच्या काही पोस्टर्सकडे बोट दाखवले होते.
यावर प्रत्युत्तर देताना जयंत पाटील म्हणाले, "सार्वजनिक वक्तव्ये न करण्याची गरज आहे. जर कोणाला माझ्याबद्दल तक्रार असेल तर थेट शरद पवार यांच्याकडे जा." या वादामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटबाजीचे राजकारण पुन्हा एकदा उफाळून आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.