सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कोसळण्याच्या घटनेनंतर मूर्तिकार जयदीप आपटे याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. जयदीप आपटेच्या अटकेमुळे या प्रकरणातील महत्त्वपूर्ण माहिती समोर येण्याची अपेक्षा आहे. अटकेच्या आठ दिवसांपूर्वीच आपटेने जामिनासाठी फिल्डिंग लावल्याचा आरोप केला जात आहे.
२६ ऑगस्ट रोजी दुपारी एकच्या सुमारास राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. या दुर्घटनेनंतर मूर्तिकार जयदीप आपटे फरार झाला होता. पोलिसांनी शोध घेऊन अखेर त्याला कल्याण येथून अटक केली. जयदीप आपटे रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत आपल्या पत्नीला भेटण्यासाठी आला असताना पोलिसांच्या जाळ्यात सापडला.
जयदीप आपटे याला अटक होण्याआधीच सिंधुदुर्गच्या न्यायालयात जामिनासाठी तयारी सुरू असल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. आठ दिवसांपूर्वीपासूनच जामिनाची प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचा संशय आहे, आणि यासाठी ठाण्यातून सूत्र हलवली जात असल्याचे आरोप केले जात आहेत. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट आरोप करत आपटे याच्या अटकेला उशीर का झाला याबद्दल गृह विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
संजय राऊत यांनी आपटेच्या अटकेबाबत गंभीर आरोप करत म्हटले की, "जयदीप आपटे सारखा माणूस वारंवार सांगत होता की, त्याला वाचवण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु शिवभक्तांचा एवढा दबाव होता की, त्याचे बॉस त्याला वाचवू शकले नाहीत."
राऊत यांनी दावा केला की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामासाठी अनुभव नसलेल्या व्यक्तीला दिलेले कंत्राट बेकायदेशीर होते, आणि या सर्व कामात भ्रष्टाचार झाला आहे. याचे मुख्य सूत्रधार ठाण्यातच असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कोसळण्यामुळे शिवभक्तांत तीव्र रोष निर्माण झाला आहे. याबाबत संपूर्ण प्रकरणामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. लोकांच्या भावनांचा अपमान करून, भ्रष्टाचाराच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे कंत्राट दिले गेले आहे.
यावर राऊत यांनी टीका केली की, "छत्रपती शिवाजी महाराजांचा बाजार मांडला गेला आहे. आणि याचे सर्व सूत्रधार ठाण्यातच आहेत."
दरम्यान जयदीप आपटेच्या अटकेनंतर पोलिस आणि गृह विभागावर चौकशीचा दबाव वाढला आहे. पुढील काळात या प्रकरणात आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.