डोंबिवली - कल्याण डोंबिवली शहरातील रस्त्यांची खड्ड्यांनी चाळण झाली आहे. त्यातच गुरुवारी रात्री कल्याण मलंग रोडवर खड्ड्यांमुळे दुचाकीस्वाराचा अपघात होऊन त्याचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेनंतर पालिका प्रशासनाने खड्ड्यात खडी टाकत या समस्येवर तात्पुरता उतारा शोधून काढला.
रस्त्यांची ही मलमपट्टी अवघ्या काही तासांसाठी शिल्लक रहात असून पावसात भिजून ती निघून जात असल्याने वाहन चालकांमध्ये नाराजी आहे. खड्डे बळी नंतर भाजपचे आमदार गणपत गायकवाड व कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील हे आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.
पावसाळी अधिवेशनात हा विषय मांडणार असल्याचे सांगत त्यांनी येथे पालिका अधिकाऱ्यांवर वचक नसल्याने त्यांचे फावले असल्याचा आरोप गायकवाड व पाटलांनी केला आहे. मुंबईतील काळ्या यादीतील कंत्राटदारांना येथे काम कसे दिले जाते असा सवाल देखील उपस्थित केला आहे.
दरवर्षी प्रमाणे यंदाच्या पावसाळ्यात देखील कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. या खड्ड्यांतून दुचाकी चालवताना तोल जाऊन अपघात होऊन एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पालिका अधिकाऱ्यांनी खड्डे पडल्याच्या बातम्या आल्यानंतर पालिका अधिकाऱ्यांनी खड्डयांची पाहणी करुन संबंधित अभियंता, कंत्राटदार यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी घोषणा केली होती.
मात्र अद्यापपर्यंत पालिका प्रशासनाने कोणावरही कारवाई केलेली नाही. खड्ड्यांमध्ये खडी टाकून तात्पुरत्या स्वरुपात खड्डे बुजविले आहेत. परंतु सतत सुरु असलेल्या पावसामुळे तसेच वाहनांच्या वर्दळीमुळे ही खडी उखडून जाऊन खड्डे पुन्हा उघडे पडले आहेत. यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे.
खड्ड्यांमुळे वाहन चालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. वाहनांचे नुकसान होत आहे, शिवाय अनेक शारीरिक आजार बळावले जात आहेत. नागरिकांच्या या समस्या लक्षात घेता खड्ड्यांविषयी कल्याण पूर्वचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड व कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला असल्याचे दिसून येत आहे.
पावसाळी अधिवेशनात शहरातील रस्त्यांची व खड्डयांची अवस्था आणि यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाविषयी विषय मांडून वाचा फोडणार असल्याचे सांगितले आहे. जनतेचा पैसा हा जनतेच्या उपयोगी न पडता त्याचा भ्रष्टाचार होतो. दरवर्षी नालेसफाई आणि खड्डे भरणी कामात मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जातो, परंतू कामाचा दर्जा दिसत नाही. याला वाचा फोडण्यासाठी हा विषय विधानसभेत मांडणार असून विधानसभेवर आजही नागरिकांचा विश्वास असल्याचे आमदारांनी सांगितले.
भाजप आमदार गायकवाड म्हणाले, अपघात होऊन एका तरुणाचा जीव गेला आहे. अपघाताच्या आदल्या दिवशीच पालिकेच्या अधिकाऱ्यांनी खड्ड्यांची पाहणी केली होती. तसेच एखादा अपघात झाल्यास संबंधित अभियंता व कंत्राटदार यांना जबाबदार धरण्यात येईल असे सांगितले होते.
या आधी देखील खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास संबंधित ठेकेदार, अभियंता यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश महापालिका स्तरावर, मंत्रालय स्तरावर तर अधिवेशनात देखील काढण्यात आले होते. त्यानुसार कारवाई झाली पाहीजे, मात्र कारवाई कधीच झाली नाही. त्यामुळे कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांचे फावले आहे.
आपल्याला कोणीच काही करु शकत नाही अशा आर्विभावात ते वावरत असतात. कल्याण डोंबिवली मधील सीमेंटचे रस्ते देखील अनेक ठिकाणी खराब झाले आहेत. डांबराचे रस्ते तर कोठेच नीट राहीले नाही. अशाच पद्धतीने काम होत रहाते. हा जनतेचा पैसा जनतेच्या उपयोगी न पडता त्याचा केवळ भ्रष्टाचार होतो.
तो भ्रष्टाचार कोठे तरी थांबला पाहीजे यासाठी येत्या अधिवेशनात हा विषय मांडणार आहे. तसेच ज्या रस्त्यांवर अपघात होऊन नागरिकांचा जीव गेला आहे, तो रस्ता ज्या अभियंत्याच्या अंतर्गत येतो त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले.
कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील म्हणाले, खड्डे आणि नालेसफाई हा दरवर्षी यांच्यासाठी आलेला एक सण असतो. यासाठी कोट्यावधीचे बजेट पास केले जाते पण ते खड्ड्यात आणि गटारात जाते. दोन्ही कामे व्यवस्थित होत नाही. मलंगगड रोडचे काम करणारा कंत्राटदार हा मुंबईत काळ्या यादीत टाकलेला आहे.
मागच्यावेळी त्याविषयी आवाज उठवत आंदोलन केले होते. परंतू आज ही त्यांचेच पालिका हद्दीत काम सुरु आहेत. मुंबईत काळ्या यादीत टाकलेल्या कंत्राटदारांना येथे काम दिले जाते यामुळे अशीच कामे होणार. यांनी कितीही बाईकवर बसून पाहण्या केल्या तरी हे खड्डे भरणे होणार नाही.
यासाठी कडक प्रशासन आणि तो चालविणारा सत्ताधारी येथे असला पाहीजे. आणि आता तर प्रशासनाचे फावले आहे. स्थानिक नगरसेवक काम करुन घेतात पण आता प्रशासनावर वचक नसल्याने या गोष्टी झालेल्या आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.