मुंबई

Kalyan Loksabha: ठाकरे गटाच्या उमेदवाराचा ताप वाढला; कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे व्हिटॅमिन मिळेना

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

Dombiwali News: कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत रंगली आहे. उबाठा गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करताच त्यांची उमेदवारी कमकुवत करण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून सुरु झाला आहे. महाविकास आघाडीतील अंबरनाथ येथील काँग्रेस पदाधिकाऱ्यानंतर आता डोंबिवलीतील उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. (shirkant shinde)

यामुळे ठाकरे गटाच्या उमेदवार दरेकर यांचा ताप वाढला आहे. महाविकास आघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे ही पुरेसे व्हिटॅमिन दरेकरांना मिळत नसल्याचे दिसत आहे. बुधवारी उबाठा गटाने शक्तिप्रदर्शन करत रॅली काढत अर्ज दाखल केला. या रॅलीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांची गर्दी दिसली तरी ती प्रचाराच्या शेवटपर्यंत टिकेल का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पडद्यामागे जोरदार घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात देखील महाविकास आघाडीच्या पक्षांना राजकीय भूकंपाचे धक्के बसत आहेत. शिवसेना शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली असून त्यांनी प्रचाराचा धूमधडाका कधीच सुरु केला आहे. त्यासोबतच त्यांनी आपल्या मतदारसंघात ऑपरेशन धनुष्यबाण राबवत महाविकास आघाडीतील पक्षांना खिंडार पाडण्यास सुरुवात केली आहे.

अंबरनाथ मधील काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि माजी विरोधी पक्षनेते प्रदीप पाटील यांनी रविवारी 7 माजी नगरसेवकांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. प्रदीप पाटील यांच्यासह माजी नगरसेविका अर्चना रसाळ, चरण रसाळ, माजी नगरसेवक सुरेंद्र यादव, बबन तांबे, मनोज देवडे, बिस्मिल्ला शेख, काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा स्मिता बंगेरा, नयना पवार, विद्या नागदिवे, अर्चना प्रसाद, मनीषा परमल, युथ काँग्रेसचे हर्षल भोईर, देवराज अल्झानडे, संकेत तांबे, आशिष डुबली ईशान जाधव, अश्फाक खान, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष नईम शेख यांच्यासह सुधीर जाधव, ज्ञानेश्वर शेलार, अनिल कांबळे, प्रशांत उतेकर हे प्रमुख पदाधिकारी तसेच शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. प्रदीप पाटील हे 1995 पासून अंबरनाथ नगरपालिकेचे नगरसेवक असून माजी विरोधी पक्षनेते सुद्धा राहिले आहेत. अंबरनाथ शहरात प्रदीप पाटील यांनी मागील अनेक वर्षे काँग्रेसची एकहाती धुरा सांभाळली होती. महाविकास आघाडीला हा धक्का पचविता आला नाही तोच दुसरा धक्का शिंदे गटाने उबाठा गटाला दिला आहे.

लोकसभेच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी बुधवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उबाठा गटाकडून शक्तिप्रदर्शन करत रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे डोंबिवली शहराच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या दौऱ्यादरम्यानच मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत यांनी उबाठा गटाला धक्का दिला. उबाठा गटाचे डोंबिवली शहर प्रमुख विवेक खामकर, यांच्यासह महिला जिल्हा संघटक कविता गावंड, कल्याण पूर्वेचे माजी नगरसेवक पुरुषोत्तम चव्हाण यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यापुढे ही आणखी पक्षप्रवेश होणार असल्याचे शिंदे गटाकडून सांगण्यात येत आहे.

महाविकास आघाडीतील घटक पक्षांत पदाधिकारी व कार्यकर्तेच शिल्लक ठेवायचे नाही अशी खेळी शिंदे गटाकडून खेळली जात आहे. त्यासाठी साम दाम दंड भेद सर्व क्लुप्त्या शिंदे गटाकडून वापरल्या जात आहेत.

एकीकडे पक्षातील पदाधिकाऱ्यांची मोठी फळी शिंदे गटात प्रवेश करत आहे, तर दुसरीकडे उमेदवार मनासारखा मिळाला नसल्याने केवळ उबाठा गटातच नाही तर काँग्रेस,राष्ट्रवादीच्या गोटातील पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे. वैशाली दरेकर या पूर्वाश्रमीच्या कट्टर शिवसैनिक आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहील्या. स्वच्छ, आक्रमक चेहरा, प्रभावी वकृत्व आणि लढाऊ बाण्यामुळे दरेकर यांची पक्षप्रमुखांनी उमेदवारीसाठी निवड केली असली तरी यामुळे ठाकरे गटातील पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज आहेत.

या नाराजीमुळे सेनेतील ज्येष्ठ जाणते शिवसैनिक दरेकर यांच्या प्रचार दौऱ्यापासून दूर असल्याचे दिसते. दरेकर यांनी उमेदवारी जाहीर होताच आपले मोजके समर्थक, युवा कार्यकर्ते यांना घेऊन प्रचार सुरु केला. त्यांनी महाविकास आघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक घेतली नाही. त्या पदाधिकाऱ्यांना प्रचार दौऱ्याविषयी माहिती देत नाहीत, त्यांच्याशी चर्चा करत नाहीत. कोठे लग्न कार्य, जाहीर समारंभ, धार्मिक कार्यक्रम असल्यास त्यांची व आमची अचानक भेट होते. यामुळे त्यांच्या प्रचारात आम्ही नसल्याचे कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे पदाधिकारी सांगतात.

दरेकर या कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण, कळवा मुंब्रा भागात प्रचार करुन या भागातील प्रतिस्पर्धींची नाराज मते मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतू कळवा मुंब्रा परिसरात आमदार जितेंद्र आव्हाड यांचे त्यांना फारसे सहकार्य लाभताना दिसत नाहीत. तर कल्याण ग्रामीण भागातील माजी आमदार सुभाष भोईर यांचेही सहकार्य दरेकर यांना दिसून येत नाही.

भोईर यांच्या नावाची चर्चा होती मात्र त्यांनी स्वतःच उमेदवारीसाठी नकार दिल्याचे समजत आहे. उमेदवारी त्यांनी नाकारली असली तरी पक्षाच्या उमेदवारासाठी ते कोठेही पुढे दिसत नाहीत. एवढ्या दिवसांत ते प्रथमच बुधवारी दरेकर यांच्या रॅलीत दिसून आले. महाविकास आघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे ही पुरेसे व्हिटॅमिन दरेकरांना मिळत नसल्याने त्यांचा एकाकी प्रचार सध्या सुरु आहे.

लोकसभा निवडणूकीसाठी मतदान अवघ्या 20 दिवसांवर आले असताना पक्षातील बड्या पदाधिकाऱ्यांनी असे पाठ फिरवणे उद्धव ठाकरे यांच्यासाठी फारसे फायद्याचे नाही. वैशाली दरेकर यांच्याकडून प्रचार केला जात असला तरी पक्षातील पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने दरेकर यांच्यासाठी देखील हा मोठा झटका आहे.

पक्षातील मोजक्या कार्यकर्त्यांना हाताशी घेऊन आता दरेकर या मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव तसेच कल्याण लोकसभेचे गेली 10 वर्षे असलेले खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना आवाहन द्यावे लागणार आहे. यामुळे ठाकरे गटाकडून आता कोणती रणनिती आखली जाते हे पहावे लागेल.

हा लढा जनतेचा सुरु आहे. यामध्ये पदाधिकारी, कार्यकर्ते नाही तर जनता आहे भारताची. लोकशाही वाचविण्यासाठी जनता उभी राहीली आहे. कोण आले गेले याचा फरत पडत नाही. भारत एकसंघ राहण्यासाठी आम्ही लढतो. कोणी गेले तरी फरक पडत नाही.

जाणारे जाणार गेले आहेत त्यांचा आम्ही विचार करत नाही. अजून कोणी नाराज असतील तर ते त्यांचा निर्णय घेतील, जे नसतील ते पक्षाचे काम करतील. नाराज कोण हे पाहण्यापेक्षा ही लढाई फार महत्त्वाची असून निर्णायक स्थितीला आली आहे. संविधान वाचविण्यासाठी, लोकशाही टिकवायची यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत.

वैशाली दरेकर, उमेदवार

निवडणूकीच्या तोंडावर नाराजी नाट्य होत असते. इच्छुक असतात त्यांना पर्याय मिळतो तेव्हा ते विचार करत असतात. दरेकर यांना पुर्ण सहकार्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून मिळत आहे. कोणी गेले म्हणून फरक पडतो परंतू 40 आमदार, 13 खासदार, पदाधिकारी गेले तरी शिवसेना उभी राहीली. पक्ष पक्ष असतो, शिवसेनेला कधी माणसांची, कार्यकर्त्यांची कमतरता जाणवली नाही.

सदानंद थरवळ, जिल्हा प्रमुख, शिवसेना ठाकरे गट

खोट्या शिवसेनेतून सर्व शिवसैनिकांचा प्रवास खऱ्या शिवसेनेकडे सुरू आहे. नकली सेनेत तर नकली लोकच उरणार आहेत. महाराष्ट्रात धनुष्यबाणावर शिवसेनेचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे. आणि वैशाली दरेकर ज्या त्यांच्या उमेदवार आहेत त्या तरी कुठे असली आहेत. त्यांचा प्रवास शिवसेनेतून सुरू होतो, नंतर मनसे आणि पुन्हा शिवसेनेत संपतो.

दीपेश म्हात्रे, सचिव युवा सेना, शिवसेना शिंदे गट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT