Maghi Ganesh Utsav : कल्याणच्या शिवप्रेमी माघी गणेशोत्सव मंडळाने माघी गणेशोत्सवासाठी यंदा भव्य अशी अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारली आहे.
कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या संकल्पनेतून प्रभू श्रीराम मंदिराचा अप्रतिम असा देखावा सादर करण्यात आला आहे. श्री गणेशाचे मंगळवारी वाजत गाजत आगमन झाले आहे.
कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या शिवप्रेमी माघी गणेशोत्सव मंडळातर्फे दरवर्षी माघी गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदा या मंडळाच्या गणेशोत्सवाचे 30 वे वर्ष असून अयोध्येतील श्री राम मंदिराची प्रतिकृती देखावा स्वरूपात साकारण्यात आली आहे.
अनेक भक्तांची इच्छा असूनही त्यांना अयोध्येला जाणे शक्य होत नसल्याने शिवप्रेमी मंडळाने ही श्रीराम मंदिर प्रतिकृती साकारली आहे. श्री कॉम्प्लेक्स परिसरातील आत्माराम भोईर चौकात गेल्या अनेक दिवसांपासून या भव्य मंदिर प्रतिकृतीचे काम सुरू होते.
ही प्रतिकृती 40 फूट लांब, 90 फूट रुंद आणि 70 फूट उंच इतकी भव्य आहे. ज्याठिकाणी भक्तांना थेट आतमध्ये प्रवेश करून या मंदिराची रचनाही पाहता येत आहे. तसेच स्वर्गीय विशाल भोईर चौकापासून ते आत्माराम भोईर चौकापर्यंत अतिशय आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली आहे.
गेल्या 30 वर्षांपासून अतिशय भव्य दिव्य स्वरूपात साजरा होणारा हा बहुधा पहिलाच गणेशोस्तव असून धर्मवीर आनंद दिघे हे देखील दरवर्षी याठिकाणी दर्शनासाठी यायचे अशी आठवण आयोजक आणि स्थानिक लोकप्रतिनिधी प्रभूनाथ भोईर यांनी यावेळी सांगितले. तसेच कल्याणसह आसपासच्या परिसरातील भाविकांनी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी तसेच ही मंदिर प्रतिकृती पाहण्यासाठी नक्की यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
दरम्यान शिवप्रेमी गणेशोत्सव मंडळाने स्वर्गीय विशाल भोईर चौकापासून गणपती बाप्पांची वाजत गाजत मिरवणूक काढली होती. यावेळी कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर, स्थानिक लोकप्रतिनिधी जयवंत भोईर, प्रभूनाथ भोईर, युवानेते वैभव विश्वनाथ भोईर यांच्यासह गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.