मुंबई

नशीब रुतले चिखलात! पिकत्या भातशेतीवर उगवले कांदळवन; लॉकडाऊनमुळे रोजचं पोट भरणं कठीण

महेंद्र दुसार - सकाळ वृत्तसेवा



अलिबाग: निसर्ग साथ देत नाही आणि मायबाप सरकार लॉकडाऊनमध्ये एकवेळचे अन्न देऊ शकत नाही. यामुळे अलिबाग तालुक्यातील खाडीपट्ट्यातील कष्टकऱ्यांचे जगणे अधिकच कठीण झाले आहे. पिकत्या भातशेतीत समुद्राचे खारेपाणी शिरून झालेल्या दलदलीमध्ये कांदळवने उगवली आहेत. त्यामुळे उत्पन्नाचे हमखास साधन येथील शेतकऱ्यांनी गमवले. आता या चिखलात मासेमारी करून निदान चार पैसे मिळवण्याचा राहिलेला आधारदेखील लॉकडाऊनने हिरावून घेतला आहे. गेल्या चार महिन्यांतील लॉकडाऊनमुळे चिखलात नशीब अजमावणाऱ्यांचे नशीब मात्र चिखलात रुतत चालले आहे.

पावसाळ्यात खोल समुद्रातील मासेमारी बंद असते. अशा वेळेला खाडीपट्ट्यातील मच्छीमारांबरोबरच शेतकरीही पारंपरिक पद्धतीने मासेमारी करून आपल्या कुटुंबाची गुजराण करण्याचा प्रयत्न करतात. चिखलात सापडणाऱ्या माशांना बाजारात चांगली मागणी असल्याने विक्रीतून चार पैसे शिल्लक राहत असत; परंतु या वर्षी मान्सूनच्या सुरुवातीला येणाऱ्या समुद्र उधाणाला उशीर झाला. यामुळे वल्गनीचे मासे, खाऱ्या पाण्यातील चिंबोऱ्या सापडण्याचे प्रमाणही कमी झालेले आहे, असे म्हणणे मांडवा येथील साईनाथ पाटील यांचे आहे. मांडवा, रेवस, बोडणी, रांजणखार- डावली, मिळकतखार येथील शेतकऱ्यांना पावसाळ्यात खाऱ्या पाण्यातील मासेमारीचा मोठा आधार मिळत असे. या वर्षी येथील मच्छीमार, शेतकऱ्यांना एका मागून एक मोठ-मोठ धक्के सहन करावे लागत आहेत. डिसेंबरपासून तीन वेळा आलेल्या मोठ्या उधाणांमुळे जी भातशेती शिल्लक राहिली होती, त्या जमिनीचाही चिखल झाला.

लॉकडाऊनमुळे बंद असलेली रोजगाराची इतर साधने, नुकत्याच झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने उघड्यावर आलेली हजारो कुटुंबे, अशी अनेक संकटे खाडीपट्ट्यातील नागरिकांना सोसावी लागत आहेत. पावसाळ्यात तर येथील नागरिकांचे जगणे अधिकच कठीण झाले आहे. लॉकडाऊनमुळे वाहनांची रहदारी बंद असल्याने पकडेलेले मासे बाजारात विकून काही पैसे कमावण्याचा आधारदेखील ते गमावून बसले आहेत. तरीही दररोज उठून चिखलात नशीब शोधण्याचा त्यांचा दिनक्रम बंद झालेला नाही. या नागरिकांच्या दिवसाची सुरुवात चिखल तुडवण्यापासूनच सुरू होते. दिवसभरात पोरांच्या तोंडाला काही तरी लावावे यासाठी अशा कित्येक कुटुंबांची ही धावपळ सध्या खाडीपट्ट्यात दिसून येते. पाग, आखा, येंडीच्या या पारंपरिक मासेमारीच्या साधनाद्वारे मासे पडकण्याचा ते दिवसभर प्रयत्न करीत असतात. भरतीच्या पाण्याबरोबर येणारे मासे बांबूच्या काठ्यांपासून बनविलेल्या भाड्यात (आखा) येतात आणि या कष्टकऱ्यांचा जीव भांड्यात पडतो. जमा झालेली ही मिळकत मोठ्या कष्टाने ढोपरभर पाण्यातून आणून बाजारात विकायला आणावी तर लॉकडाऊनमुळे गिऱ्हाईकच येत नसल्याने त्यांचे विक्रीमूल्य काहीच मिळत नाही. परिणामी अशा कुटुंबाचे या लॉकडाऊनमुळे अतिशय हाल होत आहेत.

भातशेती समुद्राच्या खाऱ्या पाण्याने पिकत नाही. सात-बाऱ्यावर जमीन असूनही त्याचा काहीही उपयोग होत नाही. पावसाळ्यात शिंगाडे, चिंबोऱ्या मिळतात, त्या बाजारात विकून आमची उपजीविका चालते. लॉकडाऊनमध्ये गिऱ्हाईक येत नसल्याने आम्ही उत्पान्नाची सर्वच साधने गमावून बसलो आहोत.
- विजय पाटील, रेवस, अलिबाग

---------------------------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! लोकप्रिय मालिकेच्या सेटवर मोठी दुर्घटना; शुटिंगदरम्यान कॅमेरा असिस्टंटचं निधन

Latest Maharashtra News Updates live : काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर

Nitin Gadkari: आमदार निवडताना जात का महत्त्वाची? नितीन गडकरींचा मतदारांना सवाल

Vastu Tips: घरात 'या' ठिकाणी ठेवा मोरपिस, कुटुंबात होईल भरभराट

व्यसनाधीन मुलाच्या त्रासाला कंटाळून बापाने डोक्यात टिकाव घालून मुलाचा केला खून, आदित्यने मुलगी पळवून आणली अन्..

SCROLL FOR NEXT