Dombivli : रेल्वेस्थानकातून बाहेर पडताना स्टेशन परिसरातील गर्दी टाळण्यासाठी अनेकजण स्कायवॉकवरुन जाण्याचा विचार करतात; मात्र या पुलावर गर्दुल्ल्यांनी कब्जा केला आहे. गर्दुल्ले उघड्यावरच येथे लघुशंका, प्रातविधी करत आहेत. त्यामुळे प्रवाशांना आपल्या माना वळवून दुसरीकडे पाहत प्रवास करावा लागत आहे.
महिला प्रवाशांमध्ये यामुळे असुरक्षिततेचे वातावरण आहे. त्यामुळे महिला या पुलावरुन प्रवास करणे टाळतात. वर्षानुवर्षे येथे गर्दुल्ले भिकारी ठाण मांडून असतात. त्यामुळे या समस्येकडे पालिका प्रशासन गांर्भियाने लक्ष देणार का, असा सवाल प्रवासी उपस्थित करत आहेत.
डोंबिवली स्टेशन परिसर हा कायम प्रवाशांनी गजबजलेला असतो. स्टेशन परिसरात रेल्वे स्थानकातून बाहेर पडणारे प्रवासी, रिक्षाचालक, फेरीवाले, खरेदीसाठी येणारे ग्राहक आदींची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. ही गर्दी टाळण्यासाठी रेल्वे स्थानकातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी पालिका प्रशासनाच्या वतीने स्कायवॉक बांधण्यात आला आहे. रस्त्यावरील गर्दीतून वाट काढण्यापेक्षा पूलावरुन पायी चालत जाऊन तात्काळ स्टेशन परिसरातून बाहेर पडू असा प्रवासी विचार करतात.
परंतू जसे जसे स्कायवॉकवरुन चालत पुढे जाऊ तस तसे वेगळेच चित्र येथे प्रवाशांना पहायला मिळत आहे. कोठे भिकारी, गर्दुल्ले झोपले आहेत, तर कोठे कोणी कसेही अस्ताव्यस्त पडले आहे. काही गर्दुल्ले तर प्रवाशां समोरच उघड्यावर लघुशंका करतात. त्यांना प्रवाशांनी हटकले तरी ते त्यांना तसेच काही तरी शिवीगाळ करुन पुढे जा असे सांगतात.
या स्कायवॉकवर पहिल्यापासून फेरिवाले यांसह भिकारी, गर्दुल्ले यांनी कब्जा केल्याचे पहायला मिळत आहे. इंदिरा गांधी चौकात उतरणाऱ्या ब्रिजजवळ प्रवाशांची वर्दळ कमी असते कारण येथे भिकाऱ्यांनी कब्जा केलेला आहे. पावसाळ्यात ही संख्या वाढलेली दिसून येते.
येथे हे भिकारी बस्तान मांडून असून येथेच खातात पितात, तेथेच झोपतात. ऐवढेच नाही तर प्रातविधी प्रक्रीया देखील ते याच पुलावर करत असल्याने त्याठिकाणी घाणीचे साम्राज्य पहायला मिळते. त्यामुळे प्रवासी येथून प्रवास करणे टाळत आहेत.
प्रवाशांच्या सोयीसाठी स्कायवॉक बांधण्यात आलेला असताना त्याचा उपयोग प्रवासी करु शकत नाहीत. इंदिरा चौकात उतरणारे स्कायवॉकवर भिकारी, गर्दुल्ले यांचे साम्राज्य तर मधुबन टॉकीज गल्ली येथे उतरणाऱ्या जिन्याच्या ठिकाणी फेरिवाल्यांनी कब्जा केल्याने हे मार्ग बंद आहेत.
कॅनरा बॅंक जवळ उतरणाऱ्या रस्त्यावरील मार्ग हा रिक्षाचालकांनी अडविलेला असतो. त्यामुळे नेमके या स्कायवॉवरुन चालण्याचा फायदा काय असा सवाल प्रवासी उपस्थित करत आहेत.
एकीकडे पालिका प्रशासनाच्या वतीने कल्याण स्टेशन परिसर फेरिवाला मुक्त तसेच येथे अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. परंतू डोंबिवलीकडे पालिका प्रशासनाचे कायम दुर्लक्ष राहीले आहे. सध्याच्या घडीला या ठिकाणी गर्दुल्ले, भिकारी यांच्या किळसवाण्या गोष्टी सुरु असतात. ते उघड्यावर लघुशंका, इतर विधी करत असल्याने महिला प्रवाशांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे.
कधी कोणाच्या मनात काय येईल ? किंवा नशेच्या स्थितीत कोण कधी कोणावर हल्ला करेल याची शाश्वती नसल्याने महिला किंवा इतर प्रवासी वर्दळ नसताना येथून प्रवास करने टाळत आहेत. याकडे पालिका प्रशासन कधी लक्ष देईल, हा परिसर स्वच्छ करुन तो प्रवाशांना वापरता येईल का ? असा सवाल देखील प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.