Irshalwadi Landslide sakal
मुंबई

Irshalwadi Landslide : इर्शाळवाडीवर मृत्यू कोसळला; सोळा मृत्युमुखी शंभर बेपत्ता

गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे रायगड जिल्ह्यात हाहाकार उडाला, इर्शाळवाडीवर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला.

सकाळ वृत्तसेवा

खालापूर (जि. रायगड) - गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे रायगड जिल्ह्यात हाहाकार उडाला असून बुधवारी (ता. १९) रात्री साडेदहाच्या सुमारास खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीवर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला.

इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासींच्या वाडीवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत सोळाजणांचा मृत्यू झाला असून ढिगाऱ्याखाली शंभरजण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. मातीच्या ढिगाऱ्याखाली अनेक घरे गाडली गेल्याने मृतांचा आकडा वाढण्याचा धोका आहे. या वाडीत अंदाजे २५ ते २८ कुटुंबांचे वास्तव्य होते. दरम्यान या गावाचे लवकरच पुनर्वसन करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.

दुर्घटनाग्रस्त इर्शाळवाडीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारी सकाळीच दाखल झाले असून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून दुर्घटनेची माहिती घेत बचावकार्याचा आढावा घेतला. गडाच्या पायथ्याशीच न थांबता दुपारनंतर मदतकार्याला वेग देण्यासाठी शिंदे चालत घटनास्थळी पोचले. परिस्थितीवर नियंत्रण ठेवत दुर्घटनाग्रस्थांच्या नातेवाइकांनाही त्यांनी धीर दिला.

काल रात्रीपासूनच इर्शाळवाडीत बचावकार्याला सुरुवात झाली असून ‘एनडीआरएफ’ आणि ‘टीडीआरएफ’चे पथक स्थानिक गिर्यारोहक आणि रहिवाशांच्या मदतीने ढिगारा उपसण्याचे काम करत आहेत. मृतांच्या नातेवाइकांना पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली असून जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार उचलणार आहे.

वाहने पोचू शकत नाहीत

दुर्घटना घडलेले ठिकाण अतिदुर्गम भागात असल्याने तिथे वाहने पोचू शकत नाहीत. यात पावसाचा जोर कायम राहिल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत. गुरुवारी (ता. २०) सायंकाळी उशिरा बचावकार्य थांबविण्यात आले. यामुळे वाडीतील अंदाजे २५ ते २८ कुटुंबे बाधित झालेली आहेत. २२८ पैकी ७० नागरिक सुरक्षित असल्याचे समजते.

यात २१ जखमी झाले असून त्यापैकी १७ जणांवर तात्पुरत्या बेस कॅम्पमध्ये उपचार करण्यात आले. सहा जखमींना पनवेलमधील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मदतकार्यासाठी आलेल्या नवी मुंबईतील अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याचाही हृदयविकाराने मृत्यू झाला.

अन् कुटुंबे गाडल्या गेली

चौक आणि इर्शाळवाडीच्या पायथ्याशी तात्पुरते आपत्कालीन कक्ष निर्माण करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी १०७ ग्रामस्थांची ओळख पटली असल्याचे सांगितले. जखमींमध्ये ७७ वर्षांच्या आजीचाही समावेश आहे. खालापुरात सोमवार आणि मंगळवारी अशा दोन दिवसांत ४४४ मिमी एवढा तुफान पाऊस झाला.

बुधवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ९७ मिमी पाऊस पडला होता. मोठ्या पर्जन्यवृष्टीमुळे रात्री इर्शाळगडाच्या माथ्यावरील काही भाग वाडीतील घरांवर कोसळला. वाडीत जवळपास ४८ घरे असून सव्वादोनशेपेक्षा जास्त ग्रामस्थांची वस्ती आहे. गडाचा कडा कोसळल्याच्या आवाजाने अनेकांनी घराबाहेर पळ काढला. मात्र, झोपेत असलेली अनेक कुटुंबे काही कळायच्या आत मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली.

पाऊस, अंधाराचा अडथळा

या घटनेची माहिती इर्शाळवाडीतील मंदिरात बसलेल्या काही तरुणांनी चौक गावात दिल्यानंतर प्रशासन तातडीने कामाला लागले. खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी यांनी सर्व यंत्रणांना सूचना देत घटनास्थळी धाव घेतली. तातडीने बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात आले; परंतु प्रचंड पाऊस आणि अंधारामुळे त्यात असंख्य अडचणी येत होत्या.

पोलिस कर्मचारी, स्थानिक तरुण, सामाजिक संस्था आणि काही गिर्यारोहक अंधारात गड चढून मदतीसाठी घटनास्थळी पोचले आणि मदतकार्यास वेग आला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार महेश बालदी आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी दाखल झाले.

माणसांच्या मदतीनेच बचावकार्य

अत्यंत दुर्गम अशा ठिकाणी वाडी असल्याने आणि मदतीसाठी कोणतीही साधने आणता येणे शक्य नसल्याने फक्त माणसांच्या मदतीनेच बचावकार्य केले जात आहे. जेसीबी किंवा हेलिकॉप्टर घटनास्थळी आणता येत नसल्याने स्थानिक नागरिक, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि टीडीआरएफ यांच्या पथकांच्या माध्यमातून प्रत्यक्ष मदतकार्य सुरू असून इतर सामाजिक संस्थांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती आणि सततचा पाऊस असूनही लवकरात लवकर मदतकार्य पूर्ण करावे यासाठी शक्य ते सारे प्रयत्न सुरू आहेत.

गावचे तातडीने पुनर्वसन : मुख्यमंत्री

ईर्शाळगड दुर्घटनेतील मदतकार्याला वेग देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः घटनास्थळी दाखल झाले . घटनास्थळी पोहोचून त्यांनी प्रत्यक्ष मदतकार्याचा आढावा घेतला. वाडीचे पुनर्वसन तातडीने होण्यासाठी व सर्वांना तत्काळ मदत उपलब्ध होण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. दुर्घटनाग्रस्त वाडीतील ग्रामस्थांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यासाठी पायथ्याशी ५० कंटेनरची व्यवस्था करण्यात येणार असून त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन तातडीने करण्यात येणार आहे.

फडणवीस यांचे सभागृहात निवेदन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेची माहिती विधिमंडळामध्ये दिली, यावेळी सर्वपक्षीयांनी आपण याप्रकरणात सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत असे सांगितले.

इर्शाळवाडीचे भौगोलिक स्थान

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून दोन किलोमीटर आत नंबराची आदिवासी वाडी आहे. तिथून पुढे इर्शाळगड आहे. समुद्रसपाटीपासून साधारण ३७०० फूट उंच असणारा इर्शाळगड गिरीदुर्ग प्रकारात मोडतो. जवळपास दीड तासांची पायपीट करून इर्शाळवाडीपर्यंत जावे लागते. माथेरानच्या डोंगर रांगेत वसलेला इर्शाळगड अनेक साहसी गिर्यारोहकाना भुरळ घालतो. इर्शाळगडावरून इर्शाळवाडी असे नाव पडले.

हा गड समुद्रसपाटीपासून साधारणपणे ३७०० फूट (११२७ मीटर) उंचीवर आहे. इर्शाळवाडी ही रायगड जिल्ह्यात खालापूर तालुक्यातील चौक मानिवली ग्रामपंचायत हद्दीतील वाडी आहे. ही वाडी उंच दुर्गम डोंगरावरती इर्शाळगडाच्या डोंगर कपारीत वसलेली आहे. या वाडीपर्यंत वाहने जाण्यासारखा रस्ता नाही.

घटनाक्रम

बुधवार, १९ जुलै

  • रात्री १०.३० ते ११.०० दरम्यान : इर्शाळवाडीवर दरड कोसळली

  • रात्री ११.३० : प्रशासनास घटनेबाबत माहिती

  • रात्री १२.०० : राज्य नियंत्रण कक्षाला माहिती

गुरुवार, २० जुलै

  • पहाटे ४.०० : एनडीआरएफ घटनास्थळी

  • पहाटे ४.०० ते ५.०० : मंत्री गिरीश महाजन, दादा भुसे, आदिती तटकरे घटनास्थळी

  • पहाटे ५.०० ते ६.०० : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी, बचाव आणि मदत कार्याचा आढावा

  • सकाळी ७.०० : डोंगराच्या पायथ्याशी नियंत्रण कक्ष स्थापन, रुग्णवाहिकाही पोहोचल्या

  • संध्याकाळी ६.०० : बचावकार्य तात्पुरते थांबवले

मदतीचे आवाहन

रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळील इर्शाळवाडी या गावावर दरड कोसळून संपूर्ण गाव ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहे. इर्शाळवाडी ग्रामस्थांच्या मदतीसाठी व पुर्नवसनासाठी समाजाला ‘सकाळ रिलीफ फंडा’कडून मदतीचे आवाहन करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT