मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने अंधेरीच्या (पश्चिम) गिल्बर्ट हिल येथील महानगरपालिकेच्या तरण तलावास छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव' असे नाव देण्यात येईल, अशी घोषणा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे.
गिल्बर्ट हिल परिसर हे मुंबईतील पर्यटनाचे आकर्षण ठरेल, या अनुषंगाने परिसराचा विकास करण्यात येईल, अशी ग्वाही देखील श्री. लोढा यांनी यावेळी दिली. गिलबर्ट हिल परिसरात बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे नव्याने बांधण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जलतरण तलावाचे लोकार्पण लोढा यांच्या हस्ते आज झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी स्थानिक आमदार अमीत साटम व महापालिका अधिकारी हजर होते.
मुंबईतील दहावा जलतरण तलाव यानिमित्ताने नागरिकांच्या सेवेत खुला करण्यात आला आहे. या तलावाच्या सदस्य नोंदणीसाठी आजपासून सुरूवात झाली आहे. २,७५० सदस्यांना ऑनलाईन पद्धतीने सदस्यत्वाची नोंदणी करता येईल. येथे मोकळ्या जागेत व्यायामशाळेचीही उभारणी करावी, तसेच जलतरण तलावाच्या सभासद नोंदणीत महिलांना अधिकाधिक प्राधान्य मिळावे, अशाही सूचना लोढा यांनी यावेळी केल्या.
गिल्बर्ट हिल परिसराचा विकास पर्यटनस्थळ म्हणून करावा
गिल्बर्ट हिल देखील भूवैज्ञानिक वारसा म्हणून अतिशय मोलाचे आहे. या परिसराचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करावा. त्यासाठी कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही, यातून देश विदेशातील पर्यटक येथे भेट देतील आणि मुंबईचे पर्यटन महत्त्व आणखी वाढेल, असे नमूद करून पुढील वर्षभरात या परिसराला पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठीच्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही लोढा यांनी यावेळी केल्या.
तर गिल्बर्ट हिल येथील गावदेवी मंदिरामध्ये दर्शनास जाण्यासाठी लिफ्टची सुविधा देण्यात येईल. या प्रकल्पासाठी पालकमंत्री लोढा यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लवकरच या प्रकल्पाला सुरूवात होईल, असे स्थानिक आमदार अमीत साटम यांनी सांगितले. महिन्याभराच्या कालावधीत वरळी, विक्रोळी आणि अंधेरी पूर्व (कोंडीविटा) येथील जलतरण तलावाचे काम पूर्ण होईल, अशी माहिती उपायुक्त (उद्याने) किशोर गांधी यांनी यावेळी दिली.
गिल्बर्ट हिल जलतरण तलाव नोंदणी सुविधा
वेळ- सकाळी ६ ते रात्री १०
वार्षिक शुल्क (सर्वसाधारण)– ८ हजार ४१० रूपये
महिलांसाठी (२५ टक्के सवलत)– ६ हजार ३९० रूपये
१५ वर्षाखालील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग– ४ हजार ३७० रूपये
कालावधी- एका वर्षासाठी २ हजार ७५० जणांना सभासदत्व दिले जाणार आहे.
नोंदणी कुठे कराल ?
सभासदत्वासाठी आज (दिनांक ३ सप्टेंबर २०२३) सकाळी ११ वाजेपासून पासून https://swimmingpool.mcgm.gov.in/ या संकेतस्थळावर नोंदणी खुली करण्यात आली आहे. नोंदणी प्रक्रिया पूर्ण होवून नंतर सभासदांसाठी हा जलतरण तलाव दिनांक १ ऑक्टोबर २०२३ पासून खुला होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.