डोंबिवली - डोंबिवली पश्चिमेतील उल्हास खाडीवर बांधण्यात आलेला मोठागाव-माणकोली उड्डाण पुलाचे काम पूर्णत्वास आले असून हा पूल कधी ही खुला होण्याची शक्यता आहे. एमएसआरडीसी कडून हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यास डोंबिवलीत वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून माणकोली पूल ते कोपर उड्डाण पूल दरम्यानच्या रस्त्यावर दुतर्फा वाहने उभी करण्यास वाहतूक विभागाने प्रतिबंध केला आहे.
माणकोली पूल खुला झाल्यानंतर तात्काळ या नियमाची वाहतूक विभागाकडून अंमलबजावणी केली जाणार आहे, असे डोंबिवली वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी सांगितले.
डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव रेतीबंदर खाडीवर माणकोली उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. या पुलामुळे डोंबिवली ते ठाणे हे अंतर अवघे 20 मिनिटांत कापता येणार आहे. खाडीवरील पुलाचे, भिवंडीकडील पोहच रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. डोंबिवली बाजूकडील स्वामी नारायण सिटी, तसेच पोहच रस्त्यांची कामे अंतीम टप्प्यात आहेत.
पूल उद्घाटनासाठी सज्ज होणार असल्याने डोंबिवली वाहतूक विभागाने पूल सुरू झाल्यानंतर डोंबिवलीत अभूतपूर्व वाहतूक कोंडी नको म्हणून खबरदारीच्या उपाययोजना घेणे सुरू केले आहे. दैनिक सकाळ’ने एप्रिल महिन्यात ‘माणकोली उड्डाण पुलामुळे भविष्यात वाहतूक कोंडी' या मथळ्याखाली वृत्त प्रसारीत केले होते.
त्यानंतर वाहतूक, उपप्रादेशिक विभाग, पालिका प्रशासन यांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना काय करता येतील या दृष्टीने हालचाली सुरू केल्या होत्या. गेल्या महिन्यात रेतीबंदर फाटकावरील उड्डाण पुलासाठी 168 कोटीचा निधी शासनाने मंजूर केला आहे. या कामास देखील सुरवात होईल. हे सर्व लक्षात घेता वाहतूक विभागाने उपाययोजना केल्या आहेत.
वाहने उभी करण्यास प्रतिबंध
डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव येथील स्वामी नारायण सिटी, नवनाथ मंदिर ते रेतीबंदर चौक रस्त्याच्या दोन्ही बाजूस 740 मीटर परिसरात कोणत्याही प्रकारची वाहने 24 तास उभी करण्यास वाहतूक विभागाने प्रतिबंध केला आहे.
तसेच, रेतीबंदर चौक, पंडित दिनदयाळ रस्ता, सम्राट चौक, डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानका जवळील (व्दारका हॉटेल) ते कोपर पूल दरम्यानच्या पंधराशे मीटर परिसरात 24 तास प्रतिबंधक केला आहे. अत्यावश्यक सेवेतील रुग्णवाहिका, अग्निशमन वाहनांना मात्र या प्रतिबंधातून मुक्त ठेवण्यात आले आहे.
“मोठागाव माणकोली उड्डाण पूल सुरू झाल्यानंतर डोंबिवली शहरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून हे नियोजन वाहतूक विभागाच्या उपायुक्तांच्या आदेशावरुन केले आहे. पूल सुरू झाल्यानंतर त्याची तात्काळ अंमलबजावणी केली जाईल.”
- उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग, डोंबिवली
डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव रेतीबंदर खाडीवर उभारण्यात आलेला 1275 मीटर लांबीचा उड्डाण पूल बांधून पूर्ण झाला आहे. 185 कोटीचा निधी या पुलासाठी खर्च करण्यात आला आहे. पुलाची अंतीम टप्प्यातील कामे एमएमआरडीएकडून सुरू आहेत.
2016 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या पुलाचे काम 36 महिन्यात म्हणजे 2018 मध्ये पूर्ण होणे आवश्यक होते. भूसंपादन, शेतकरी मोबदला, तांत्रिक अडथळा आणि करोना महासाथीमुळे पुलाच्या उभारणीला विलंब झाला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.