मुंबईतील रेल्वेत अनेक तरुण खतरनाक स्टंट करत असल्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वी धावत्या लोकलमध्ये दरवाजावर स्टंट करणाऱ्या तरुणाचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर या स्टंट करणाऱ्या तरुणाविरोधात आरपीएफ पोलिसांनी गुन्हा नोंदवून शोध सुरू केला; मात्र स्टंट करणाऱ्या तरुणापर्यंत जेव्हा रेल्वे पोलिस पोहचले तेव्हा त्यांना जे आढळून आलं ते इतरांसाठी डोळे उघडायला लावणारं होतं.
फरहत आझम शेख असे स्टंट करणाऱ्या तरुणाचे नाव आहे १४ जुलै २०२४ ला व्हायरल व्हायरल व्हिडीओवरून तरुणाविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा रेल्वे पोलिसांनी शोध सुरू केला. पण पोलिस जेव्हा स्टंट करणाऱ्या या तरुणाच्या घरी पोहोचले तेव्हा फरहत आझम शेखला पाहून त्यांना धक्का बसला. स्टंट करताना फरहत याने हात आणि पाय गमावला होता.
रेल्वे पोलिसांनी व्हायरल व्हिडीओमधील घटनेची चौकशी केल्यावर हा व्हायरल व्हिडीओ ७ मार्च २०२४ रोजी केला असल्याची माहिती उघड झाली. सोशल मीडियावर लाइक्स मिळविण्यासाठी शिवडी स्थानकांवर सीएसएमटीकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये स्टंट करण्याची कबुली फरहत याने आरपीएफ पोलिसांकडे दिली.
१४ एप्रिल २०२४ रोजी फरहत याला मशीद बंदर स्थानकावर दुसरा स्टंट करताना जीवघेणा अपघात झाला. या अपघातात त्याला डावा हात आणि पाय गमवावा लागला. रेल्वे प्रशासनाने त्यांना सीएसएमटी येथील सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.
अधिकाऱ्याने सांगितले, "आरपीएफने जेव्हा त्या मुलाचा शोध घेतला तेव्हा, १४ एप्रिल रोजी मस्जिद स्टेशनवर स्टंट करताना फरहत आझम शेख या मुलाचा पाय आणि एक हात गमावल्याचे ऐकून अधिकाऱ्यांना धक्का बसला. १४ जुलै रोजी व्हायरल झालेला व्हिडिओ या वर्षी ७ मार्चचा असल्याचे त्यांनी सांगितले. शिवडी स्थानकावरील त्याच्या एका मित्राने रेकॉर्ड केला होता आणि नंतर ती सोशल मीडियावर अपलोड केला."
दरम्यान आता रेल्वे पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतल्यानंतरचा दुसरा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो दुसऱ्यांदा स्टंट करताना आपला एक हात आणि पाय गेल्याचे सांगताना दिसत आहे.
रेल्वेच्या पोस्टमध्ये सांगण्यात आले की, "मध्य रेल्वेने व्हायरल व्हिडीओमध्ये स्टंटबाजी करणाऱ्याची ओळख पटवली असून त्याने दुसऱ्या एका स्टंटमध्ये एक पाय आणि हात गमावला आहे. रेल्वे पोलिसांनी या प्रकरणामध्ये वेगाने कारवाई केली. आम्ही सर्व प्रवाशांना विनंती करतो की असे जीव धोक्यात घालणारे स्टंट करु नका. तुम्हाला असं कोणी करताना दिलसं तर त्यासंदर्भात ९००४४१०७३५ / १३९ इथे कळवा. सुरक्षा सर्वात महत्त्वाची आहे,"
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.