माथेरान : आमच्यासारखे हताश कोणीच नसेल. कोरोनानंतर लॉकडाऊन जाहीर झाला. आम्ही तयार केलेल्या चपला दुकानातच पडून राहिल्या. पावसाळ्यातील दमट वातावरणामुळे त्यांच्यावर बुरशी चढली. त्या खराब झाल्या. त्यामुळे सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले. आता बॅंकाही कर्ज देत नाहीत. त्यामुळे पुढचे दिवस कसे घालवायचे अशी विवंचना आहे
हे सांगताना माथेरानमधील तरुण चर्मोद्योजक नितेश कदम यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ते भावनावश झाले. 700 हेक्टरवर वसलेले माथेरान हे टुमदार पर्यटनस्थळ आहे. मुंबई-पुण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असल्याने या ठिकाणी पर्यटकांचा नेहमीच राबता असतो. त्यामुळे स्थानिकांचाच नव्हे तर कर्जत तालुक्यातील गावांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटलेला आहे. पण पाच महिन्यांतील लॉकडाऊनमुळे माथेरानचे आर्थिक गणित कोलमडून पडले. फक्त पर्यटनावर अवलंबून असलेल्या या गावातील ओझे वाहणाऱ्या हमाल, घोडेवाले, हात रिक्षावाले, दुकानदार, चर्मोद्योजक, चिक्कीवाले, रेस्टॉरंट, लॉजिंग व्यावसायिक, असे सगळेच हवालदिल झाले आहेत.
माथेरानमध्ये शेती नाही. हा भाग पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील म्हणून घोषित असल्याने येथे कारखान्यांसारखे उद्योगधंदेही नाहीत. कोरोना संकटानंतर एक-दोन महिन्यांत लॉकडाऊन हटवला जाईल, आर्थिक चाक रुळावर येईल, असे स्थानिकांना वाटले होते. पण तसे घडले नाही. त्यामुळेच आर्थिक चाक रुतत गेले. घरखर्च कसा चालवायचा या विचाराने बहुतांश स्थानिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
माथेरानला दरवर्षी सरासरी 10 लाख पर्यटक भेट देतात. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. त्यात एप्रिल आणि मे महिना हा महत्त्वाचा पर्यटन हंगाम असल्याने या काळात पर्यटकांची संख्या अधिक असते. त्यामुळे पावसाळी चार महिने हे सुखसमाधानाचे जातात. पण या वेळेला परिस्थिती उलटी असून माथेरानकर सतत पाच महिने लागलेल्या लॉकडाऊनमुळे मेटाकुटीला आला आहे. सप्टेंबरपर्यंत हे स्थळ पर्यटकांसाठी खुले झाले नाही, तर भूकबळींची परिस्थिती ओढवू शकते.
सर्वाधिक फटका घोडेवाल्यांना
माथेरानचे प्रमुख आकर्षण येथील घोडा आहे. त्यावर रपेट मारण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. या घोड्यांमुळे येथील 460 परिवारांचा उदरनिर्वाह चालतो. यामधून मिळणाऱ्या उत्पन्नावर घोड्यांचे खाद्य आणि घोडेवाल्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह चालतो. पण लॉकडाऊनमुळे घोडे हे तबेल्यात बांधून असल्यामुळे त्यांचे खाद्य व घरखर्च चालविणे मुश्किल झाले आहे.
माकडांची भूक कशी भागणार?
माथेरानची शान समजल्या जाणाऱ्या माकडांना पर्यटकांमुळे खूप खाद्य मिळायचे. त्यासाठी त्यांच्या मर्कटलीला फार व्हायच्या. पर्यटकांच्या हातातील खाऊ ओढणे, पर्यटकांना घाबरविणे हे प्रकार घडत होते. पण लॉकडाऊन सुरू झाला आणि माणसाप्रमाणे या मुक्या जनावरांनाही भूक भागविण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
तीन पिढ्यांपासून घोडा व्यवसाय आहेत. त्यामुळे हा आमचा मूळ व्यवसाय असून घोडा हे आमच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. पाच महिने लॉकडाऊनमुळे घोडे तबेल्यात बांधून आहेत. त्यांच्या खाद्यासाठी दिवसाला अडीचशे ते तीनशे रुपये खर्च येतो. पाच महिने घोड्याला खाद्य पुरविले. दरम्यान, काही संस्थांनी आम्हाला मदतीचा हात दिला. पण आता घोड्याचा खर्च भागविणे अवघड होत आहे.
- शैलेश धोंडू शिंदे,
स्थानिक अश्वपालक
माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांचे ओझे नेण्याचे काम करतो. वाहनतळापासून माथेरान शहर दोन ते अडीच किलोमीटर असल्याने पर्यटकांचे ओझे आम्ही वाहत असतो. त्यातून दोनशे ते तीनशे रुपये आम्हाला मिळत असतात. त्यातून आमचा उदरनिर्वाह होतो. लॉकडाऊनमुळे हे काम बंद झाले असल्याने घरखर्च चालविणे मुश्किल झाले आहे.
- विजय कदम,
अध्यक्ष, कुली संघटना.
17 मार्चपासून माथेरान पर्यटकांसाठी बंद आहे. त्यामुळे आमचे हॉटेल बंद आहे. कामगार वर्गाला त्याच वेळेला सुट्टी देऊन आपापल्या राज्यात पाठवले. पाच महिन्यांत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यात निसर्ग चक्रीवादळाने पडझड झाली आहे. त्यामुळे माथेरान सुरू झाल्यानंतर ही आम्हाला हॉटेल दुरुस्तीसाठी खर्च करावा लागणार आहे. कामगार शोधशोध करावी लागणार आहे.
- दिनेश वाधवानी,
मालक, हॉटेल कुमार प्लाझा.
-----------------------------------------
( संपादन - निलेश पाटील )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.