मुंबई : देशासह राज्यात कोरोनाचं थैमान सुरुच आहे. देशातील सर्वच राज्य कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत आहे. दिवसेंदिवस मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा वाढतोय. त्यामुळे राज्य सरकारनं केरळ सरकारला एक पाठवलं होतं. या पत्रात महाराष्ट्र सरकारनं केरळ सरकारकडे वैद्यकीय मदत करण्याची मागणी केली होती. या मागणीनुसार कोविड-19 विरुद्धची लढाई जिंकण्यासाठी महाराष्ट्रात केरळहून डॉक्टर आणि नर्सेचं पथक मुंबईत सेवा बजावण्यासाठी आलं. आता मुंबईत सेवा बजावल्यानंतर हे पथक पुन्हा माघारी गेलं आहे.
कोव्हिड- 19 बाबत त्यांच्या भूमिकेवरील मतभेदांमुळे, ते त्यांचा एक महिन्याचा कार्यकाळ निश्चित होण्यापूर्वी माघारी परतलेत. मुंबईत कोरोनाबाधित आकडा वाढत असताना आणि आरोग्य सेवा एका कठिण काळातून जात असताना केरळचे डॉक्टर पुन्हा अचानक परतल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र या मुद्दय़ापासून दूर राहणं पसंत केलं आहे. या टीममधील तीन पदव्युत्तर विद्यार्थी दोन दिवसांपूर्वी केरळला रवाना झाले असून या टीमचे प्रमुख डॉ. संतोष कुमार 5 जुलैला रवाना होतील. उर्वरित डॉक्टर 15 जुलैला जातील, त्यानंतर नर्से केरळसाठी रवाना होतील. नर्सेस आणि डॉक्टरांना अद्याप त्यांचे पगार दिले गेले नाहीत. त्यांना त्यांचे पगार येत्या 15 दिवसात होईल, अशी माहिती मिळाली आहे. जे तीन विद्यार्थी केरळमध्ये परत गेले त्यांना प्रत्येकी 10 हजार रुपये देण्यात आले. मात्र नर्सेना अद्याप पगार मिळाला नाहीय. त्यामुळे त्यांना दररोजचा खर्च भागवणं अवघड जात आहे, असेही डॉ. संतोष कुमार यांनी सांगितले.
महालक्ष्मी रेसकोर्समध्ये येणाऱ्या कोविड-19च्या रूग्णांसाठी 120 आयसीयू बेड्ससह 600 बेड्सच्या सेटअपवर ही टीम तैनात करण्याची प्राथमिक योजना होती. त्यानंतर त्यांना 300 बेडचे आयसीयू असलेल्या सेव्हन हिल्स हॉस्पिटलमधील डॉक्टरांना मदत करण्यास सांगण्यात आले. दरम्यान टीमनं सेव्हन हिल्समध्ये 20 बेड्स असलेली आयसीयू सुविधा सुरु केली.
आम्ही फक्त पाच तज्ज्ञांची व्यवस्था करू शकलो आणि उर्वरित 35 एमबीबीएस डॉक्टर, तीन पीजी विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्यापैकी शंभराहून अधिक स्टाफ नर्सेनी आमच्याकडे नोंदणी केली होती. मात्र तार्किक मुद्द्यांमुळे आणि नर्सिंग असोसिएशनशी पगारामुळे मतभेद झाल्यामुळे (असोसिएशनं 50,000 मागितले तर सरकारनं केवळ 30,000 रुपये देण्यास तयारी दर्शवली) अनेकांना वगळले, असं डॉ. कुमार यांनी सांगितलं. डॉ. कुमार यांनी सांगितले की, त्यांचे पगार लवकरच देणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.
त्यांचे पगार लवकरच केले जातील असं आश्वासन देण्यात आले आहे. केरळ आणि महाराष्ट्र या दोन राज्यांनी एकत्र काम करण्याची गरज आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांच्याशी आमची चर्चा झाली. केरळातही हळूहळू कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. महाराष्ट्र आणि मुंबई आधीच या परिस्थितीतून जात आहे आणि या वेळी डॉक्टरांपेक्षा परिचारिकांची जास्त गरज आहे. केरळ सरकार अधिक परिचारिका आणि डॉक्टर पाठवण्याचा विचार करीत आहे जेणेकरून त्यांना मोठ्या प्रमाणात साथीचा रोग हाताळण्याचा अनुभव मिळेल. मात्र, अजून निर्णय प्रलंबित आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सामूहिक पाठबळ आणि प्रशिक्षणाची देवाणघेवाण महत्त्वाची आहे, असे डॉ. कुमार म्हणाले.
23 मे रोजी कोव्हिड -19 चे नोडल अधिकारी असलेले वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय डॉ. तात्याराव लहाने यांनी केरळचे आरोग्य आणि समाज कल्याण मंत्री के. के. शैलजा यांना पत्र लिहिले होते. या पत्रात, महाराष्ट्र सरकारने एमबीबीएस डॉक्टरांना दरमहिना 80,000, एमएस / एमडी किंवा विशेष डॉक्टरांना दरमहाना 2 लाख आणि केरळमधील परिचारिकांना दरमहिना 30,000 ऑफर केले होते. तसेच, राहण्याची आणि पीपीई किट्सची व्यवस्था केली जाईल, असे नमूद केले होते, अशी माहिती डॉ. कुमार यांनी दिली.
पालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी सांगितले की, "आमच्या रुग्णालयातील पदव्युत्तर पदवी आणि चांगला अनुभव असलेल्या डॉक्टरांना 80,000 पेक्षा कमी वेतन दिले जात आहे. आणि केरळच्या डॉक्टरांना 2 लाखांपर्यंत वेतन देण्याचे कबूल करण्यात आले आहे. नियमित पगार ही दिला जात नाही. त्यांच्या योगदानाबद्दल डॉक्टर आणि परिचारकांचे कौतुक करण्याऐवजी त्यांना चांगली वागणूक दिली जात नाही.
केरळवरुन आलेल्या डॉक्टरांपैकी काही डॉक्टर्स अजूनही इथेच आहेत. तर, काही डॉक्टर्स निघून गेले आहेत.
- डॉ. स्मिता चव्हाण, उपअधिष्ठाता, सेव्हन हिल रुग्णालय.मला केरळच्या डॉक्टरांबद्दल काहीच माहिती नाही. मला याबाबत कोणतीही माहिती देण्यातही आलेली नाही. माझ्या माहितीनुसार ते दोन महिने येथेच राहणार होते. सेव्हन हिल्स येथे तपासणी करुन बघावं लागेल.
- डॉ. तात्याराव लहाने, संचालक, वैद्यकीय शिक्षण आणि संचालनालय, महाराष्ट्र.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.