Mithi River: मिठी नदीच्या पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी सुरू असलेल्या मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प- पॅकेज चार अंतर्गत मुंबई महानगरपालिकेने २.६० मीटर व्यास असलेल्या भूमिगत मलजल बोगद्याचे खणन हाती घेतले आहे.
बापट नाला आणि सफेद पूल नाल्यापासून धारावी मलजल प्रक्रिया प्रकल्पापर्यंत हा बोगदा तयार करण्यात येत आहे. एकूण तीन टप्प्यांत हे काम होत आहे. यापैकी, दुस-या टप्प्यातील मलजल बोगद्याचे ‘ब्रेक-थ्रू’ यशस्वीपणे पूर्ण झाले.
बापट नाला आणि सफेद पूल नाल्यातून मिठी नदीत जाणारे अंदाजे १६८ दशलक्ष लीटर प्रतिदिन इतके पाणी या भूमिगत मलजल बोगद्याद्वारे धारावी येथील मलजल प्रक्रिया केंद्रात वाहून नेण्यात येणार आहे.
त्यानंतर मलजलावर प्रक्रिया करून माहीम निसर्ग उद्यान येथील खाडीत सोडण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे मिठी नदीचे पाणी स्वच्छ राहण्यास मदत होणार आहे, पर्यायाने पर्यावरणाचेही संतूलन टिकून राहणार आहे.
पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प साकारतो आहे. सांडपाणी मिश्रित पाणी मिठी नदीमध्ये न जाता या पाण्यावर प्रक्रिया करण्याच्या अनुषंगाने या प्रकल्पाचे महत्व अधिक आहे. मिठी नदीमध्ये सांडपाणी मिश्रित होण्याआधीच या पाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे.
परिणामी समुद्र किनारा परिसर स्वच्छ राहतानाच पर्यावरणालाही या प्रक्रिया केलेल्या पाण्याचा फायदा होणार आहे. तसेच समुद्र किनारी परिसरात राहणा-या नागरिकांनाही या पाण्याचा फायदा होईल, अशी माहिती वेलरासू यांनी दिली.
दरम्यान आता, तिस-या टप्प्यात सांताक्रूज-चेंबूर जोडरस्ता जंक्शन शाफ्ट ते बापट नाला या मार्गावर भूमिगत बोगदा खोदण्यात येणार आहे. तिस-या आणि अंतिम टप्प्यातील या बोगद्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्याची एकूण लांबी ३.१० किलोमीटर असेल.
या संपूर्ण प्रकल्पाची एकूण मलजल वहन क्षमता प्रतिदिन ४०० दशलक्ष लीटर इतकी आहे. सध्या यातून प्रतिदिन १६८ दशलक्ष लीटर इतका बिगर पावसाळी प्रवाह वाहून नेण्यात येणार आहे. मुंबई महानगरातील लोकसंख्या वाढीचे प्रमाण लक्षात घेत सन २०५१ पर्यंतचे नियोजन या बोगद्याच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
असा आहे भूमिगत मलजल बोगदा-
मुंबई मलनिःसारण प्रकल्प अंतर्गत हा भूमिगत मलजल बोगदा बांधण्यात येत आहे. बोगद्याची एकूण लांबी ६.७० किलोमीटर तर सरासरी खोली सुमारे १५ मीटर आहे. भारतातील सर्वात लहान व्यासाचा असा हा मलजल बोगदा आहे. त्याचा अंतर्गत व्यास २.६० मीटर आहे. तर बाह्य व्यास ३.२० मीटर आहे. बोगद्याच्या संरेखनामध्ये एकूण ५ शाफ्ट प्रस्तावित आहेत. हा मलजल बोगदा सेगमेंटल लाइनिंग पद्धतीने तसेच अर्थ प्रेशर बॅलन्स टनेल बोरिंग मशीन वापरून बांधला जात आहे.
३.५६ किलोमीटर काम पूर्ण
१ ऑक्टोबर २०२१ पासून प्रकल्पाचे बांधकाम वेगाने सुरू आहे. एकूण ४८ महिन्यांत म्हणजेच ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत तो पूर्ण होणार आहे. एकूण लांबी ६.७० किलोमीटर विचारात घेता आतापर्यंत त्यातील ३.५६ किलोमीटर लांब अंतराचे काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पाची एकूण प्रगती लक्षात घेता जवळपास ६४ टक्के काम पूर्ण झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.