- गायत्री श्रीगोंदेकर
मुंबई - देशातील पहिली मोनोरेल अशी ओळख असलेली चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक (जेकब सर्कल) मोनोरेलला नवसंजीवनी देण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) प्रयत्नशील आहे. लवकरच मोनोच्या ताफ्यात १० नव्या स्वदेशी गाड्या येणार आहेत. तसेच मेट्रो आणि रेल्वेस्थानकांशी कनेक्टिव्हीटी आणि दोन फेऱ्यांमधील अंतर कमी झाल्याने मोनोच्या प्रवासी संख्येत वाढ होईल, असा विश्वास एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी व्यक्त केला आहे.
मुंबई महानगर प्रदेशात जागतिक दर्जाची वाहतूक व्यवस्था विकसित करण्यासाठी एमएमआरडीएने २००७-२००८ मध्ये मोनोरेल प्रकल्प आणला. चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक अशी जवळपास २० किमीची मोनोरेल मार्गिका चेंबूर ते वडाळा आणि वडाळा ते संत गाडगे महाराज चौक अशा दोन टप्प्यांत साकारण्यात आली.
हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तीन कोटी इतका खर्च आला. चेंबूर ते वडाळा असा ८.९३ किमीचा पहिला टप्पा फेब्रुवारी २०१४ मध्ये सुरू झाला; तर वडाळा ते संत गाडगे महाराज चौक असा ११.२० किमीचा दुसरा टप्पा मार्च २०१९ मध्ये सुरू झाला. या प्रकल्पातील दोन्ही टप्पे पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यापासून सरासरी उत्पन्न हे ३९ कोटी रुपये इतके आहे.
ताफ्यात १० नव्या स्वदेशी मोनोरेल
एमएमआरडीए नागरिकांना जागतिक दर्जाच्या सुविधा देण्याच्या दृष्टीने सर्व प्रकल्पांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. हैदराबादमध्ये मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत मोनोरेल स्वदेशी पद्धतीने तयार केल्या जात आहेत. मोनोचा पहिला आरएसटी (प्रोटोटाइप) हा २०२३ च्या अखेरीस उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. तसेच त्यानंतर ९ गाड्या ताफ्यात दाखल होतील. नवीन मोनोरेलची प्रवासी क्षमता सध्याच्या मोनोप्रमाणे २५२ प्रवाशी असेल, असा अंदाज आहे.
मोनोच्या ताफ्यात नवीन १० गाड्या आल्यावर मोनोच्या दोन फेऱ्यांमधील अंतर हे केवळ पाच मिनिटांवर येईल. तसेच उपनगरीय रेल्वे आणि मेट्रो स्थानकांशी कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी ट्रॅव्हलेटर तयार करण्याची योजना आखत आहे. यामुळे मोनोरेलची प्रवासी संख्या नक्कीच वाढेल.
- डॉ. संजय मुखर्जी, महानगर आयुक्त
कोरोनानंतर प्रवासी संख्येत वाढ
एमएमआरडीएने दिलेल्या माहितीनुसार प्रकल्प सुरू झाल्यापासून सरासरी प्रवासी संख्या ३,४८,४९३ इतकी होती. कोरोनानंतर २०२१ मध्ये सरासरी प्रवासी संख्या ९५२०२ इतकी होती, तर २०२२ मध्ये सरासरी प्रवासी संख्या २,६०,२९८ इतकी झाली. २०२३ मध्ये फक्त ३ महिन्यांची सरासरी प्रवासी संख्या ३,६२,६४१ इतकी आहे.
मेट्रो रेल्वेस्थानकांना जोडणार
मोनोरेलला महालक्ष्मी लोकल रेल्वेस्थानक आणि मेट्रो तीनचे महालक्ष्मी स्थानकाला जोडण्यासाठी सात रस्ता जंक्शन येथून संत गाडगे महाराज मोनोरेल स्थानकाला जोडण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. याव्यतिरिक्त, मेट्रो मार्गिका दोन ब आणि मेट्रो मार्गिका चारला जोडणे प्रस्तावित आहे.
सरासरी प्रवासी संख्या
२०२३ - तीन लाख
२०२२ - दोन लाख
२०२१ - ९५ हजार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.