डॉक्टरांच्या पथकास बुरशीचे रंग ओळखून उपचारांच्या सूचना
मुंबई: कोरोना साथीच्या दरम्यान म्यूकरमायकोसिस अर्थात काळ्या बुरशीचा उद्रेक देखील वाढला आहे. वाढता प्रादुर्भाव आणि देशातील इतर राज्यात आढळणाऱ्या या बुरशीचे नवीन रंग पाहून मुंबई महापालिकाही आश्चर्य व्यक्त करत आहे. दरम्यान, मुंबईत सध्या फक्त काळ्या बुरशीच्या संसर्गाचा प्रकार आढळत असून बुरशीच्या बदलणार्या रुपांकडे लक्ष देऊन त्यानुसार उपचार करण्याच्या सुचना दिल्या आहेत. (Mucormycosis Disease getting Dangerous day by day as new colors of fungus are introduced)
महापालिकेतर्फे चार प्रकारे म्यूकरमायकोसिसच्या रुग्णांवर लक्ष ठेवले जात आहे. जे रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत त्यांना वाॅर्ड वाॅर रुममधून संपर्क केला जात आहे. तसेच, म्युकरमायकोसीसच्या उपचारांसाठी डाॅक्टरांना विशेष प्रशिक्षण दिले गेले आहे. कोविड असताना किंवा कोविडनंतर जर कोणालाही त्रास झाला तर तात्काळ उपचारांसाठी रुग्णालयांमध्ये दाखल करून घ्यावे. तसंच, रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांची माहिती पालिकेतर्फे संकलित केली जात आहे. त्यांना जे औषधोपचार लागतील ते पालिकेकडून पुरवले जातील. सोबतच बुरशीचे प्रकार आणि त्यावर उपचार काय यासाठी डॉक्टरांच्या पथकाला बुरशीचे प्रकार ओळखण्याची सूचना पालिकेकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, आतापर्यंत पिवळ्या किंवा सफेद बुरशीच्या रूग्णांची नोंद झालेली नाही,असेही काकाणी यांनी स्पष्ट केले आहे. मंगळवारपर्यंत मुंबईच्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये म्युकरमायकोसिसचे जवळपास 250 हून अधिक रुग्ण दाखल असून उपचार घेत आहेत. यातील अनेकांची प्रकृती गंभीर आहे. यापैकी अनेकांचा डोळा, नाक, किंवा सायनस हे अवयव काढून टाकावे लागले आहेत. त्यामुळे, हा आजार पूर्णपणे बरा होणारा नसून कोरोना होऊ नये यासाठी लोकांनी काळजी घेतली पाहिजे असे आवाहन केईएम रुग्णालयाच्या कान-नाक-घसा विभागाच्या प्रमुख डॉ. हेतल मारफातिया यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून यूपी, हरियाणा आणि इतर राज्यात काळ्या बुरशीसह पांढरी आणि पिवळ्या बुरशीचा प्रकार आढळत आहे. त्यामुळे, यावर चिंता व्यक्त करत याचा सामना करण्यासाठी सोमवारी पालिका रुग्णालयांमधील डॉक्टरांची चर्चा झाली.
पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, म्युकरमायकोसीसच्या प्रकारांची माहिती घेण्याबाबत सोमवारी डॉक्टरांशीही चर्चा झाली. म्यूकरमायकोसिस या आजाराचा सामना करण्यासाठी बनवलेल्या डॉक्टरांच्या विशेष पथकास बुरशीच्या रंगांसह रूग्णांचीही बारीक तपासणी करण्याची सूचना देण्यात आली आहे. डॉक्टरांना मुंबईत पांढऱ्या आणि पिवळ्या बुरशीचे रुग्ण आहेत का ? हे शोधण्यासाठी विचारणा केली गेली आहे.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कूपर रुग्णालयाच्या कान-नाक-घसा विभागाचे प्रमुख डॉ. निनाद गायकवाड यांनी सांगितले की, म्यूकरमायकोसिसच्या सुरुवातीच्या टप्प्यात शरीरात पांढरे टिश्यू असतात. यानंतर, शेवटच्या टप्प्यात त्यांचा रंग बदलतो, त्याचा रंग काळा होतो. कूपर येथे सध्या म्युकरमायकोसिसचे 18 रुग्ण दाखल आहेत. तर, त्यातील दोघांना एस्परजिलोसिसचा ही संसर्ग आहे. यावर उपचार म्हणून एम्फोटेरोसिन इंजेक्शन आणि शस्त्रक्रिया हेच आहेत. ते म्हणाले की काही रुग्णांवर शस्त्रक्रिया देखील झाली आहे. डॉ. निनाद म्हणाले की, वारंवार सर्दी, डोकेदुखी, चेहऱ्यावर सूज येणे अशी लक्षणे आढळल्यास जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधून सल्ला घ्या. लवकर उपचार रुग्णाला लवकरच बरे करतो.
म्युकरमायकोसिसचा धोका नेमका कोणाला?
- मधूमेह आजार असणाऱ्या रुग्णांना
- स्टेरॉईडचे सेवण करणाऱ्या रुग्णांना
- आय सी युमध्ये उपचार घेतलेल्या रुग्णांना
- पोस्ट ट्रांसप्लांट आणि मैलिग्नेंसीच्या व्यक्तिंना
म्युकर मायकोसिसची लक्षण-
1. सायनसमध्ये त्रास होणे
2. नाक बंद होणे
3. नाकाचे हाड दुखणे
4. डोळ्यांना सूज येणे, डोळे लाल होणे
5. अंग दुखणे
6. श्वास घेण्यास त्रास होणे
7. ताप येणे
उपाय-
दुहेरी मास्क घाला, तुमच्या नाकाला वारंवार स्पर्श करु नका, मधुमेह नियंत्रणाखाली ठेवा
पिवळ्या बुरशीची लक्षण-
पिवळी बुरशी अधिक धोकादायक असते, यात जखमा भरत नाहीत. या रोगास म्यूकोर स्पेक्टिक्स असेही म्हणतात. शरीरातील अवयव सुन्न होणे, त्रास आणि वेदना होणे, अत्याधिक अशक्तपणा, बंद नाक, हृदयाचे ठोके वाढणे, शरीरातील जखमांतून पू येणे आणि शरीर कुपोषितसारखे दिसणे ही या आजाराची लक्षणे आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.