मुंबई: मुंबई महानगर पालिकेचा घरोघरी जाऊन (डोअर-टू- डोअर) लसीकरणाच्या प्रस्तावाला केंद्र सरकारनं परवानगी नाकारली आहे. मुंबई पालिकेनं वयोवृद्ध, अंध व्यक्ती, शारीरिक अंपगत्व असलेल्या नागरिकांसाठी घरोघरी जाऊन लसीकरण करण्यासाठी प्रस्ताव आखला होता. बीएमसीचा हा प्रस्ताव केंद्रानं फेटाळून लावली आहे. तसंच असं कोणतंही धोरण नसल्याचं सांगितलं आहे. यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं असं स्पष्ट केलं की, लसीकरण केंद्राचा विस्तार (काही प्रमाणात बूथ-स्तरीय लसीकरणापर्यंत) लहान स्तरापर्यंत केला जाणार आहे. जेणेकरुन लोकांना कोविडची लस घेण्यासाठी दोन किलोमीटरच्या पलीकडे प्रवास करावा लागणार नाही.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितलं की, मुंबईत जवळपास दीड लाखांहून अधिक नागरिक हे वृद्ध, काही जण अंथरुणावर तर काही जण अपंग आहेत. जे लसीकरणासाठी घराबाहेर जाऊ शकत नाही. यासंदर्भात आम्ही केंद्राला पत्र लिहिलं होतं. या पत्रात अशा नागरिकांसाठी घरी जाऊन लसीकरण देण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली होती. मात्र असं कोणतंही धोरण नसल्याचं केंद्रीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. ज्या नागरिकांना लसीकरणासाठी केंद्रावर येणं खरोखर शक्य नाही आहे त्यांना या मदत झाली असती.
दरम्यान, अंधेरी पश्चिम येथील भाजपचे आमदार अमित साटम यांनी झोपडपट्ट्यांमधील लसीकरण मोहिमेसंदर्भात घेतलेल्या प्रतिक्रियेबद्दल पालिका आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. त्यांनी पत्रात म्हटलं आहे की, १०० किंवा त्याहून अधिक लाभार्थी असणाऱ्यांसाठी पालिकेनं लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवावी. अशीच एक मोहिम चेन्नईमध्ये बऱ्यापैकी यशस्वी झाली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, देश सध्या कोविड- १९ च्या दुसऱ्या लाटेच्या मध्यभागी होता. अशात जास्तीत जास्त लोकांना लसीकरण मिळावं यासाठी केंद्रानं खूप छोट्या स्तरावरील लसीकरण कार्यक्रमाची योजना आखली होती. लसीकरणासाठी रूग्णालयात जाण्यासाठी बऱ्याच लोकांना अडचण आहे. रुग्णालयात गेल्यास कोरोनाचा संसर्ग होईल अशी नागरिकांना भीती आहे. पुढे त्यांनी सांगितलं की, केंद्राचं लसीकरण सूक्ष्म पातळीवर नेण्याची योजना असून या योजनेत नागरिकांना लसीकरणासाठी २ किमीपेक्षा जास्त प्रवास करावा लागणार नाही आहे. कोविडचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी हा एक सर्वात प्रभावी मार्ग आहे. अनेक देशांमध्ये असा प्रयोग करण्यात आला होता, असंही ते म्हणालेत.
तसंच या अधिकाऱ्यानं डोअर- टू- डोअर लसीकरण ही संकल्पना का काम करत नाही याचंही स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी सांगितलं की, जर आपण एखाद्यास लस दिली तर त्यानंतर आपल्याला त्या व्यक्तीला काही वेळासाठी वैद्यकीय देखरेखीखाली ठेवावं लागतं. जर नागरिकांना घरी जाऊन लस द्यायची झाल्यास बराच वेळ लागण्याची शक्यता आहे. एका व्यक्तीला लस दिल्यानंतर त्यावर लक्ष ठेवून राहावं लागेल आणि त्यात बराच वेळ लागू शकतो. अशा प्रकारे या लसीकरणाच्या मोहिमेचा वेग मंदावेल.
Mumbai BMC request allow door to door vaccination Centre has rejected
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.