Mumbai Breaking : मुंबईत शंभरी पार केलेले १४ जुने पूल आहेत. यातील काही पुलांच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे, तर काही नव्याने बांधण्यात येणार आहेत.
जुन्या पुलांच्या अपघाताचा धोका लक्षात घेता सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर जुन्या पुलांच्या पुनर्निर्माणाची गरज अधोरेखित झाली. मात्र जागेची कमतरता आणि अतिक्रमण यामुळे पुनर्निर्माणाचा वेग मंदावला आहे.
सीएसएमटी येथील हिमालया पूल दुर्घटनेनंतर पालिकेने मुंबईतील ३५० पुलांची तपासणी केली. त्यातील १४ पूल धोकादायक असल्याने ते पाडून त्या ठिकाणी नवीन पूल बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यातील बहुतांश पूल हे दक्षिण मुंबईतील ब्रिटिशकालीन आहेत.
गेल्या सात वर्षांमध्ये त्यातील चार पूल पाडण्यात आले. यामध्ये मस्जिद बंदर येथील कर्नाक, सॅंडहर्स्ट रोड येथील हँकॉक, लोअर परळ येथील डीलाईल आणि चर्नी रोड येथील फरेरे पुलाचा समावेश आहे. मुंबईतील खराब अवस्थेतील १० पुलांची उभारणी अद्याप बाकी आहे. यात रे रोड केबल स्टे पूल, भायखळा सॅंडहर्स्ट रोड पूल, दादर टिळक आणि भायखळा येथील वाय ब्रिज या पुलाचा समावेश आहे. या पुलांच्या कामाला मंजुरी मिळाली आहे.
पालिकेचा पूल विभाग यावर सुमारे ८०० कोटी रुपये खर्च करत आहे. टप्प्याटप्प्याने या पुलांच्या कामाला सुरुवात केली जाईल. यानंतर मग उर्वरित पुलांच्या कामाचा विचार केला जाईल, असे पूल विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
महालक्ष्मी रेल्वेस्थानकाजवळील उड्डाण पूल धोकादायक घोषित करण्यात आला आहे. दुसरीकडे कर्नाक पुलाचे पाडकाम झाले असून त्याच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. मात्र या पुलाचे काम सुरू होण्यासाठी नियोजित कालावधीपेक्षा अधिक वेळ लागला. कारण या पुलाखालील जागेत अतिक्रमण झालेली बांधकामे होती.
तसेच भायखळा पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. या पुलाखाली तब्बल १२५ बांधकामे आहेत. या पुलाच्या अवतीभवती मोठ्या प्रमाणात बांधकामे असल्याने पुलाचे पिलर उभारायलाही जागा उपलब्ध नाही. त्यामुळे या पुलाचे काम ‘केबल स्टे’चे तंत्रज्ञान वापरून केले जाणार आहे. दादर येथील टिळक पूल धोकादायक झाला आहे.
हा पूल निमुळता असल्याने तेथे नेहमीच वाहतूक कोंडी होते, त्यामुळे पुलाचे खांब उभारण्यासाठी पर्यायी जागा नाही. त्यामुळे प्रत्यक्षात पुलाचे काम सुरू होऊन देखील कामाने गती पकडलेली नाही
महाराष्ट्रात खेडी, शहरे, राज्य किंवा राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यांवर ३५ हजारपेक्षा जास्त मोठे आणि छोटे पूल आहेत. त्यांच्या नियमित देखभाल आणि दुरुस्तीची मोठी आव्हाने आहेत. त्यांच्या देखभालीमध्ये अनेक एजन्सीचा सहभाग आहे. सरकारी आकडेवारीनुसार, राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित, स्वातंत्र्यपूर्व काळातील १४६ छोटे, १०५ मोठे आणि ५ लांब पूल (एकूण २५६) आहेत. त्यातील काही पूल ३५० वर्षांहून अधिक जुने आहेत आणि अजूनही कार्यरत आहेत, असे समोर आले आहे.
प्रत्यक्ष कामात अडथळा
जुने पूल दाटीवाटीच्या ठिकाणी असून तेथे काम करण्यास अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे नियोजन तयार आहे, मात्र प्रत्यक्ष बांधकाम करण्यास उशीर होत आहे. दक्षिण मुंबईतील जुन्या ब्रिटिशकालीन पुलांना लागून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे.
त्यात व्यावसायिक गाळ्यांचे प्रमाण मोठे आहे. हे अतिक्रमण काढून त्यानंतर बांधकामाला सुरुवात करावी लागत असल्याने त्याला वेळ जात लागत असल्याचे पूल विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. अतिक्रमण हटवणे हे अतिक्रमण विभागाचे काम असून त्यानंतर पुनर्वसन करण्याचे काम इमारत विभागाकडून केले जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.