कर्जत : अबलेच्या मदतीला खाकी धावली असून महाविद्यालयीन विद्यार्थीनीची छेड काढणाऱ्या दोन सडक सख्याहरींना "प्रसादा"सह जेलची हवा खावी लागली आहे. पुन्हा असे करणार नाही अशी अद्दल दोघांना घडली. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि त्यांच्या टीम चे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी ही कथा आहे.
येथील एका उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता ११ वीच्या वर्गात शिकणारी निर्भया (बदललेले नाव) (ता.२ मार्च) नियमित महाविद्यालयात आली. या वेळी तीला ईश्वर जयराम हुलगुंडे (रा.खंडाळा ता. कर्जत) याने हातवारे करून खुणावले. मात्र याकडे दुर्लक्ष करत ती महाविद्यालय सुटल्यावर आपल्या घरी निघून गेली. त्यानंतर (ता ४ रोजी) निर्भया पुन्हा महाविद्यालयासाठी आली असता कर्जत बसस्थानक येथे तोच संबंधीत मुलगा आपल्या एका मित्रासह तीच्या जवळ आला आणि 'तू मला आवडतेस व मी तुला लाईक करतो' असे म्हणुन लज्जा उत्पन्न होईल अशा अश्लील भाषेत बोलून निर्भयाकडे पाहून हातवारे करू लागला.
त्याचवेळी त्याच्या सोबत असलेला त्याचा जोडीदार निर्भयाजवळ येऊन म्हणाला की 'तु तुझा मोबाईल नंबर माझ्या मित्राला दे, मात्र ती यावर काही न बोलता पुढे चालू लागली. यावेळी दोघांनीही तिचा पाठलाग केला. भीतीपोटी निर्भयाने एका अनोळखी इसमाच्या फोनवरून आपल्या भावाला फोन करून हकीकत सांगून बसस्थानकात बोलावले.
तीचा भाऊ तात्काळ त्या ठिकाणी आल्यानंतर निर्भयाने तिला त्रास देणारा मुलगा व त्याचा मित्र ही दाखवला मात्र त्या दोघांनी तात्काळ पळ काढला. ही माहिती समजताच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव हे तात्काळ पोलीस अंमलदार पांडुरंग भांडवलकर, शाम जाधव, सुनील खैरे, गोवर्धन कदम, मनोज लातूरकर, अमित बर्डे यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले.
आरोपींचा शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत. त्यानंतर निर्भया व तिच्या भावाने कर्जत पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली असुन आरोपींवर विनयभंग, बाल लैंगिक अपराध संरक्षण कायदा विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्हीही आरोपींना काही तासात अटकही करण्यात आली आहे. किमान पंधरा दिवस ते एक महिना आरोपीना जेलची हवा खावी लागणार आहे असे समजते.
"कोणत्याही मुली-महिलांना कुणी त्रास द्यायचा प्रयत्न केला तर याद राखा, कुणाला सोडणार नाही. कोणत्याही मुलींबाबत असा प्रकार घडत असेल किंवा घडला तर तात्काळ कर्जत पोलिसांना कळवा. तक्रारदाराचे नाव गुपित ठेऊन त्रास देणाऱ्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येईल."
-चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक कर्जत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.