Mumbai Local Breaking : मोकळा वेळ घालवायचा तर रेल्वे स्थानकात बसण्याचा पर्याय काही नागरिक निवडतात. तसेच प्रेमी युगूल, महाविद्यालयीन विद्यार्थी, शाळकरी मुले हे देखील अनेकदा रेल्वे स्थानकांवर वेळ घालविताना दिसत असतात. परंतू आता तुम्ही रेल्वे स्थानकात मोकळा वेळ घालविण्याचा विचार करत असाल तर सावध व्हा. लोहमार्ग पोलिस, स्टेशन मास्तर आणि आरपीएफ जवान यांच्यावतीने रिकाम टेकड्यांवर कारवाई केली जात आहे. गुरुवारी तीन तासात 25 ते 30 रिकाम टेकडे बसणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे.
मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानक हे प्रवाशांनी गजबजलेले असते. शाळा महाविद्यालयांत शिक्षण घेण्यासाठी येथे रेल्वेने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. प्रवाशांची वर्दळ आणि बसण्यासाठी जागा असल्याने अनेकदा काही नागरिक वेळ घालवण्यासाठी, कोणाची भेट घेऊन बोलायचे असल्यास रेल्वे स्थानकाचाच पर्याय निवडतात. तर महाविद्यालयीन तरुण तरुणी बंक मारुन रेल्वे स्थानक परिसरात वेळ घालविताना दिसतात. प्रेमी युगुलांचे देखील बसण्याचे ठिकाण रेल्वे स्थानक होऊ लागले आहे.
याठिकाणच्या आडोशाच्या जागा पकडून अनेक प्रेमी युगुल तासन तास रेल्वे स्थानक परिसरात बसलेले असतात. डोंबिवली रेल्वे स्थानकातील प्रेमी युगुलांच्या एका व्हिडीओने तर खळबळ माजवली होती. या गर्दीचा फायदा घेत अनेकदा चोरटे देखील लोकल पकडण्याच्या घाई गडबडीत असणाऱ्या प्रवाशांचे पाकीट, दागिने, मोबाईल चोरतात.
या सर्व गोष्टींचा विचार करता आता अशा रिकाम टेकड्यां विरोधात रेल्वे प्रशासन सतर्क झाले आहे. फलाटावर रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशां व्यतिरिक्त इतर कोणालाही थांबू न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात नुकतीच रेल्वे पोलिस, आरपीएफ आणि स्टेशन मास्तर कार्यालय यांच्याकडून पाच फलाटांवर संयुक्तिक कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान रिकाम टेकड्यांना दणका देण्यात आला.
जवळपास तीन तासात 25 ते 30 जणांवर कारवाईचा बडगा उगारला गेला. यामध्ये काही नागरिकांना ताब्यात घेत कारवाई करण्यात आली. डोंबिवली स्टेशन परिसरात काम शिवाय फिरू नये असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे. रेल्वे स्टेशन परिसरात रिकामे बसल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा देखील पोलिसांनी दिला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.