मुंबई

Mumbai Local Viral Video: सुरक्षेची ऐशी तैशी; ३ रीलबहाद्दर तरुणांनी लोकलमध्येच घालवले २४ तास

सकाळ डिजिटल टीम

नितीन बिनेकर

Mumbai Local VIral Vedio: ‘रील्स’चे भूत हल्ली तरुणाईच्या मानगुटीवर इतके घट्ट बसले आहे, की त्यासाठी वाट्टेल ते करण्याची त्यांची तयारी असते. सुरक्षितता, त्यातून पुढे होणारी कारवाई याची काहीही तमा बाळगली जात नसल्याचे मुंबईतील एका प्रकरणावरून समोर आले आहे.

तीन तरुणांनी मुंबईकरांची ‘लाईफलाईन’ अर्थात लोकलमध्ये २४ तास राहण्यासाठी चक्क कारशेडमध्येच मुक्काम ठोकल्याचा धक्कादायक प्रकार पश्चिम रेल्वेवर घडला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे याची साधी गंधवार्ताही रेल्वे प्रशासनाला नाही. त्यामुळे दररोज लाखो प्रवाशांचा भार वाहणारे प्रशासन सुरक्षेबाबत किती गंभीर आहे, याचा पंचनामा झाला आहे.

कमी वेळेत झटपट प्रसिद्धी मिळवण्याकडे तरुणाईचा कल वाढला आहे. रील्स तयार करण्यासाठी अलिकडे उपनगरीय रेल्वे स्थानक आणि लोकलला असंख्य कलाकार, यू-ट्यूब स्टारची पसंती मिळत असल्याचे विविध रील्समधून समोर येते.

स्थानकातील गर्दीचा फायदा घेत अचानक हे तरुण डान्स सुरू करतात; मात्र मुंबईतील तीन तरुणांनी २४ तास लोकलमध्ये राहण्याचा विक्रम केला आहे. रात्री वाहतूक बंद झाल्यानंतर हे तरुण लोकलमध्ये बसून कारशेडमध्ये गेले. मुक्कामाच्या हिशेबाने त्यांनी नाश्ता, चादर जवळ बाळगली होती. तिघांनी रात्रभर मुक्काम केला. धक्कादायक बाब म्हणजे लोकल कारशेडला जाताना महिला होमगार्डने या तिघांना लोकलमधून उतरवण्याचा प्रयत्न केला; मात्र तिला गुंगारा देऊन हे तिघेही कारशेडमध्ये गेले.

तिघा तरुणांनी या मुक्कामाची व्हिडीओग्राफी करून ती इन्स्टाग्रामवर टाकली आहे. दोन भागात टाकलेल्या या व्हिडीओला जवळपास दीड लाखांच्या घरात लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडीओ २ नोव्हेंबरला व्हायरल झाला. लाखो नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली; मात्र पश्चिम रेल्वेने याची अजूनही दखल घेतलेली नाही. हा व्हिडीओ पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी यांच्याकडे ‘सकाळ’ने पाठवला; मात्र त्यावर काही प्रतिक्रिया मिळाली नाही.

सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

अलिकडे कारशेडमधील अनेक गुन्हेगारी घटना समोर आल्या आहेत. सोमवारी (ता. ६ ) वांद्रे टर्मिनसवर डेहराडून एक्स्प्रेसमध्ये एकाने गळफास घेतल्याची घटना उजेडात आली आहे. यापूर्वी लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले आहेत. कारशेडमध्ये जाण्यापूर्वी प्रत्येक लोकलची कडक तपासणी केली जाते; परंतु व्हायरल व्हिडीओने रेल्वेच्या सुरक्षा व्यवस्थेलाच आव्हान दिल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे. या तरुणांच्या जागी दहशतवादी, गुन्हेगार असते तर काय, असा प्रश्नही रेल्वे प्रवासी संघटनांनी विचारला आहे.

कायदा काय म्हणतो?

प्रवास करताना धावत्या लोकलमध्ये किंवा फलाटांच्या बाजूला सेल्फी घेणे, रील्स बनवणे किंवा व्हिडीओ रेकॉर्ड करणे, एखाद्याचा जीव धोक्यात घालणे, रेल्वे कायदा १९८९ च्या कलम १४५ आणि १४७ नुसार दोषी मानले जाते. या अंतर्गत किमान एक हजार रुपये दंड आणि सहा महिने तुरुंगवासाची तरतूद आहे. त्याच वेळी जर रेल्वे फलाटाच्या काठावरील पिवळी लाईन ओलांडली, तर ५०० रुपये दंडही आकारला जाऊ शकतो. त्याचबरोबर महिनाभर तुरुंगवासही भोगावा लागू शकतो.

रेल्वे प्रशासन प्रवासी सुरक्षेवर लक्ष देत नाही. रेल्वे स्थानक परिसर आणि धावत्या रेल्वेमध्ये रील्स बनवणाऱ्यांवर रेल्वेने कठोर कारवाई करावी. यासंदर्भात प्रवाशांमध्ये जनजागृती करावी.

- नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, उपनगरीय प्रवासी संघटना

प्रत्येकाच्या हातात मोबाईल आल्यामुळे केव्हाही, कुठेही व्हिडीओ काढला जाऊ शकतो; मात्र यावर काही विशिष्ट ठिकाणी बंदी घालणे गरजेचे आहे; अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यासंदर्भात नियमावली तयार करण्याची वेळ आली आहे.

- लता अरगडे, सरचिटणीस, उपनगरीय प्रवासी संघ

मुंबई लोकल ही दहशतवाद्यांच्या कायम टार्गेटवर राहिली आहे. तरुणाचा व्हिडीओ म्हणजे रेल्वे सुरक्षेची ऐशीतैसी करणारा आहे. याकडे रेल्वे प्रसाशनाने गंभीरतेने पाहणे आवश्यक आहे.

- सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल यात्री परिषद

विक्रमासाठी रेल्वे वेठीस

- तीन तरुणांचे २४ तास लोकलमध्ये राहण्याचे चॅलेंज

- विक्रम करण्यासाठी नाश्ता, जेवण आणि उशी-चादर घेऊन सज्ज

- तिघांनी सकाळी साडेचारची अंधेरी-विरार लोकल पकडली

- दिवसभर रेल्वे प्रवास, रात्री कारशेडमध्ये मुक्काम

- लोकल प्रवासात सहप्रवाशांसोबत प्रँक आणि बरेच काही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Sawant: शायना एनसींवर खरंच आक्षेपार्ह टीका केली का?; अरविंद सावंत म्हणतात, हिंदीत...

IND vs NZ, 3rd Test: जडेजाच्या ५ अन् वॉशिंग्टनच्या ४ विकेट्स; पहिल्याच दिवशी किवींचा डाव गडगडला, आता भारताच्या फलंदाजांची कसोटी

मुलगा होणार की मुलगी? जन्माआधीच मराठी अभिनेत्रीने सांगितलं बाळाचं जेंडर; शेअर केला व्हिडिओ

Bhau Beej 2024 Gift Idea: भाऊबीजच्या दिवशी बहिणीला द्या 'ही' खास भेटवस्तू, नातं होईल अधिक मजबुत

Latest Marathi News Updates: विरोधकांना महिलांचे सक्षमीकरण नको आहे - श्रीकांत शिंदे

SCROLL FOR NEXT