माथेरान : निसर्गरम्य पर्यटनस्थळ अशी ओळख असणाऱ्या माथेरान शहरामध्ये उद्यापासून (ता. ५) ई-रिक्षा धावणार आहेत. माथेरान नगरपालिकेकडून माथेरानकर आणि पर्यटकांसाठी आधुनिक प्रवासाच्या सेवेमुळे दमछाक थांबण्यास मदत होणार आहे.
जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असणाऱ्या माथेरानमध्ये वाहनांना प्रतिबंध लादण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि संनियंत्रण समितीच्या आदेशानुसार ई-रिक्षा सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येत आहे.
नागरिक व पर्यटकांसाठी तिकीट खिडकी, चार्जिंग स्टेशन, चालकांसाठी सूचना फलक व ई-रिक्षा मार्गाची पाहणी करण्याचे काम माथेरान नगर परिषदेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांच्या देखरेखीखाली युद्धपातळीवर पार पडली आहे.
दस्तुरी नाका येथे काळ्या-पिवळ्या रंगाच्या पाच ई-रिक्षा तैनात असून त्याला पोलिसांचा बंदोबस्त देण्यात आला आहे. उर्वरित दोन रिक्षा काही दिवसांत प्रवाशांच्या सेवेसाठी रुजू होणार आहेत.
रात्री १० वाजेपर्यंत ई-रिक्षा सेवा
ई-रिक्षा फक्त माथेरानच्या महात्मा गांधी रस्त्यावरून धावणार असून प्रवेशद्वार दस्तुरीनाका, कम्युनिटी सेंटर, वाचनालय आणि बी. जे. हॉस्पिटलसमोर चार्जिंग स्टेशन उभारले आहेत. या रिक्षातून प्रवास करण्यासाठी प्रथम येणाऱ्या प्रवाशाला प्राधान्य देणार असून सुरुवातीला रेल्वेस्थानक व दस्तुरी नाका येथील तिकीट खिडकीवरच मिळणार आहे. सकाळी ६.३० ते रात्री १० वाजेपर्यंत ई-रिक्षा धावणार आहे. रात्री १० वाजेनंतर अत्यावश्यक सेवेकरिता गरज भासल्यास धावली जाऊ शकते, असे पालिकेकडून सांगण्यात आले.
पालिका प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना प्राधान्य
शाळेच्या वेळेनुसार विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य देऊन ई-रिक्षा त्यांना उपलब्ध होईल. त्या हेतूने ई-रिक्षाची वेळ निश्चित केली आहे. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांचा प्रथम विचार करण्यात आला आहे. सर्वसामान्यांना परवडेल असा टिकीट दर आकारत दस्तुरी नाका ते सेंट झेव्हियर हायस्कूलपर्यंत (पांडे रोड) फक्त ३५ रुपये दर, तर शालेय विद्यार्थ्यांना ये-जाण्यासाठी १० रुपये आणि मासिक पास ३०० रुपयांत देण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.