मुंबई - महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळाने मेट्रो प्रवाशांची प्रवासादरम्यान तसेच स्थानक परिसरात सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मेट्रो मार्ग २ अ आणि ७ने प्रवास करणाऱ्या सगळ्या प्रवाशांना आता प्रवासी विमाकवच लागू करण्यात आले आहे. त्यानुसार सर्व प्रवाशांना वार्षिक सर्वसमावेशक विमा (annual comprehensive insurance) पॉलिसी महा मुंबई मेट्रोमार्फत देण्यात येणार आहे.
प्रवासादरम्यान संभाव्य जोखिमेचं तपशीलवार विश्लेषण करून आणि संभाव्य धोके लक्षात घेऊन प्रवाशांसाठी ही योजना राबविण्यात येत आहे. अशा प्रकारच्या योजना ह्या प्रवासादरम्यान अनपेक्षित परिस्थितीमुळे होणाऱ्या संभाव्य घटना जसे की अपघात, अपंगत्व, मृत्यू यांसारख्या दुर्दैवी घटनांमध्ये प्रवाशांना मदत करतात.
१० हजार ते ५ लाखांपर्यंत सुरक्षाकवच
या विमा योजनेनुसार अनपेक्षित घटनांमुळे दुर्घटनाग्रस्त प्रवासी रुग्णालयात दाखल झाल्यास त्याला जास्तीत जास्त रू. १ लाख तर बाह्यरुग्णांसाठी रू.१० हजारापर्यंतची भरपाई मिळणार आहे. तसेच बाह्यरुग्ण उपचार आणि रुग्णालयात दाखल असल्यास रुग्णालयातील संरक्षणा व्यतिरिक्त OPD (बाह्यरुग्ण उपचार) खर्च कमाल रू. १००००/- पर्यंत दिला जाणार आहे आणि किरकोळ दुखापतीच्या भरपाईसह वैद्यकीय खर्चाअंतर्गत जास्तीत जास्त रु.९००००/- इतकी भरपाई देण्यात येणार आहे. तसेच अपघातांदरम्यान प्रवाशांचा मृत्यु झाल्यास ५ लाख रुपये नुकसानभरपाई मिळण्याची तरतूद असून कायमचे किंवा आंशिक अपंगत्व आल्यास ४ लाखांपर्यंत नुकसाईभरपाई या विम्याअंतर्गत मिळू शकेल.
संरक्षण कधी मिळणार?
ही पॉलिसी ज्या प्रवाशांकडे वैध तिकीट/पास/स्मार्ट कार्ड/क्यूआर कोड/वैध परवानगी असेल अशा सर्व वैध प्रवाशांसाठी लागू असेल. तसेच सदर पॉलिसी ही वैध प्रवासी हा मुंबई मेट्रो स्थानकाची इमारत, प्लॅटफॉर्म किंवा ट्रेनमध्ये किंवा स्थानक परिसरात जसे की सशुल्क आणि विनाशुल्क परिसर (कॉनकोर्स आणि फलाट) अशा सर्व ठिकाणी वैध असेल. पण मेट्रो स्टेशन इमारतीचे बाह्य क्षेत्र जसे की पार्किंग इत्यादी ठिकाणी काही अनिश्चित घटना/अपघात घडल्यास या विमा पॉलिसीचे संरक्षण त्या व्यक्तिला लागू होणार नाही.
सदर विमा पॉलिसीचे फायदे जाहीर करताना महा मुंबई मेट्रो चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक एस. व्ही. आर. श्रीनिवास म्हणाले, 'अनेक आंतरराष्ट्रीय मानांकनावर आधारीत उभारलेल्या मुंबई मेट्रोचा प्रवास हा सुरक्षित आहेच. पण सर्व सुरक्षा उपायांव्यतिरिक्त आम्हाला अनपेक्षित उद्भवलेल्या परिस्थितीत प्रवाशांचे जीवन सुरक्षित करणेही अत्यंत गरजेचे होते म्हणून आम्ही सर्व मेट्रो प्रवाशांना सर्वसमावेशक विमा संरक्षण प्रदान करत आहोत. हे विमा कवच लागू केल्यामुळे दुर्दैवी घटनेच्या बाबतीत पुरेसे विमा संरक्षण मिळणार असल्याने प्रवाशांना आता निश्चिंत प्रवास करता येईल. आम्ही आमच्या प्रवाशांची सुरक्षितता आणि याचसारख्या कल्याणकारी नाविन्यपूर्ण उपाययोजना करण्यासाठी वचनबद्ध आहोत.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.