मुंबई : पावसाळ्याच्या आजारामुळे मुंबईत या वर्षातील पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. जून महिन्यात लेप्टोस्पायरोसिसने ग्रस्त असलेल्या एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हा रुग्ण नायर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल होता.
११ जून या दिवशी या लेप्टोच्या लक्षणांसह या रुग्णाला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान १४ जून ला त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे नाव न सांगण्याच्या अटीवर सांगण्यात आले आहे.
यंदा पाऊस सुरू होण्यापूर्वी लेप्टोचे रुग्ण आढळून येत असून, गेल्या वर्षीच्या जून महिन्यात केवळ १२ रुग्ण नोंदले होते. मात्र, या जून महिन्यात लेप्टोच्या ९७ रुग्णांची नोंद झाली आहे. केवळ लेप्टोच नाही तर डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो, हिपॅटायटीस ए आणि स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, रिपोर्टिंग युनिटमध्ये वाढ झाल्याने अधिक रुग्णांची नोंद होत असून, त्यामुळे या आकडेवारीत वाढ झाली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, याआधी वैद्यकीय महाविद्यालये, उपनगरीय रुग्णालये आणि खाजगी रुग्णालयांमध्ये सर्वाधिक प्रकरणे नोंदवली जात होती, परंतु आता एचबीटी क्लिनिक, आरोग्य पोस्ट आणि खाजगी निदान केंद्रे देखील अहवाल देत आहेत. त्यामुळे प्रकरणे नोंदवली जात आहेत.
जूनमध्ये दररोज लेप्टोचे ३ रुग्ण
यावर्षी जून महिन्यात लेप्टोचे एकूण ९७ रुग्ण आढळून आले आहेत, तर गेल्या वर्षी ही संख्या केवळ १२ होती. म्हणजेच जून महिन्यात दररोज सरासरी ३ जणांना लेप्टोची लागण झाल्याचे आढळून आले आहे.
यावर्षी लेप्टोमुळे एका मृत्यूची नोंद झाली आहे. रुग्णालयाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय भुवड यांना ११ जून रोजी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान १४ जून रोजी त्यांचा मृत्यू झाला. विजय हा लेप्टोस्पायरोसिसने ग्रस्त असल्याचे आढळून आले.
यंदा पावसाळा सुरू होण्यापूर्वीच लेप्टोच्या आकडेवारीने गेल्या वर्षीच्या आकडेवारीला मागे टाकले आहे. गेल्या वर्षी लेप्टोचे २८६ रुग्ण होते, तर या वर्षाच्या पहिल्या ६ महिन्यांत ४३२ रुग्ण आढळले आहेत.
डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ
डेंग्यू, मलेरिया यांसारख्या डासांमुळे पसरणाऱ्या आजारांच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये डेंग्यूचे ३९ रुग्ण होते, तर यंदा ३५३ रुग्ण आढळले आहेत. दुसरीकडे, गेल्या वर्षी जूनमध्ये मलेरियाचे ३४८ रुग्ण आढळले होते, तर, यावर्षी जूनमध्ये ६७६ रुग्ण आढळले आहेत. म्हणजेच या वर्षी जून महिन्यात डेंग्यूचे सरासरी १२ तर मलेरियाचे २२ रुग्ण दररोज आढळून आले आहेत. जून महिन्यात चिकुनगुनियाचे ८ रुग्ण आढळले आहेत, तर गेल्या वर्षी केवळ १ रुग्ण आढळला होता.
गॅस्ट्रो आणि हिपॅटायटीसचा चढा आलेख
दूषित अन्नामुळे होणाऱ्या गॅस्ट्रो आणि हिपॅटायटीसचा आलेखही जून महिन्यात वाढला आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात गॅस्ट्रोचे ५४३ आणि हिपॅटायटीसचे ६४ रुग्ण आढळून आले होते, तर या वर्षी जून महिन्यात गॅस्ट्रोचे १७४४ आणि हिपॅटायटीसचे १४१ रुग्ण आढळले आहेत. म्हणजेच, दररोज सरासरी ५८ लोकांना गॅस्ट्रो आणि सुमारे ५ लोकांना हेपेटायटीसचा त्रास झाला.
स्वाइन फ्लूचे ९० रुग्ण
मुंबईतही स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत आहे. गतवर्षी जूनमध्ये स्वाइन फ्लूचे केवळ ३५ रुग्ण आढळून आले होते, मात्र यंदा ३९ रुग्ण आढळून आले आहेत. संसर्गजन्य आजार असल्याने त्याचा प्रसार वाढू शकतो, अशा परिस्थितीत मुंबईकरांनी वैयक्तिक स्वच्छता राखणे गरजेचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.