डोंबिवली - डोंबिवली मधील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचे व्यवस्थापक दत्तात्रय लधवा हे कामात भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप करत त्यांची बदली करण्याची मागणी सामाजिक संस्था तसेच माजी उप महापौर राहुल दामले यांनी पालिका आयुक्तांकडे केली होती.
याची दखल घेत आयुक्तांनी लधवा यांची तडकाफडकी शुक्रवारी बदली करत कल्याण मधील आचार्य अत्रे रंगमंदिर चा पदभार देण्यात आला. मात्र त्यास देखील संस्थांनी विरोध दर्शविल्याने त्यांना तो पदभार स्वीकारण्यास रोखण्यात आले असल्याची माहिती आहे. यामुळे लधवा यांचा तिथे ही टिकाव लागलेला नाही.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली एमआयडीसी मधील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचे व्यवस्थापक कामात भ्रष्टाचार करीत असून त्यांच्या विरोधात अनेक संस्था चालकांनी तक्रार केल्या. या तक्रारींची दखल घेत तसेच स्वतः भाजपचे माजी उप महापौर दामले यांना याचा अनुभव आल्यानंतर दामले यांनी पालिका आयुक्त डॉ.
भाऊसाहेब दांगडे यांची भेट घेतली. त्यांना लेखी निवेदन देत लधवा यांची बदली करण्यात यावी अशी मागणी केली. अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील दिला होता.
दामले यांनी तक्रारीत लधवा यांच्याकडून सुरू असलेला मनमानी कारभार, तारखा वाटप, तारखेसाठी वाढीव निधी, स्वतंत्र लाईट व साउंडसाठी उकळले जाणारे पैसे आदी विषय नमूद करण्यात आले होते. तसेच नाट्यगृह आवारात प्रेक्षकांना दुचाकी वाहने उभी करण्यास ते मज्जाव करत होते. या तक्रारींची गंभीर दखल आयुक्तांनी घेतली.
पालिका आयुक्तांनी लधवा यांची तडकाफडकी बदली कल्याण मधील पालिकेच्या आचार्य अत्रे रंग मंदिरातील व्यवस्थापक पदी करण्यात आली. तर कल्याणचे आचार्य अत्रे नाट्यगृहाचे व्यवस्थापक माणिक शिंदे यांच्याकडे सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. लधवा यांची अत्रे नाट्यगृहात बदली करण्यात आली आहे.
याविषयी माहिती कल्याणमधील नाट्य, गायन, साहित्य-सांस्कृतिक सस्थांच्या पदाधिकाऱ्यांना मिळताच, त्यांनी तातडीने आयुक्त डाॅ. दांगडे यांना संपर्क केला. कोणत्याही परिस्थितीत लधवा यांना अत्रे नाट्यगृहाचा पदभार देण्यात येऊ नये, अशी मागणी केली.
सावित्रीबाई फुले नाट्यगृहात जो गोंधळ व्यवस्थापक घालतात, तोच प्रकार कल्याण मधील अत्रे नाट्यगृहात सुरू करतील, अशा तक्रारी सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांकडे केल्या. यामुळे लधवा यांना अत्रे नाट्यगृहाचा पदभार स्वीकारण्यापासून थांबविण्यात आले.
त्यामुळे त्यांना सध्या सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याची माहिती समजत आहे. याविषयी मात्र कोणीही उघड बोलण्यास तयार नाही. तसेच याप्रकरणी लधवा देखील काहीही बोलण्यास तयार नसून फोनला ते कोणताही प्रतिसाद देत नाहीत.
लधवा यांची फुले नाट्यगृहातून उचलबांगडी होताच शहरातील अनेक सामाजिक संस्थांनी समाधान व्यक्त केले. फुले नाट्यगृहात नियमित सामाजिक संस्थांचे कार्यक्रम सुरू असतात.
त्यामुळे या नाट्यगृहात साहित्यिक, सांस्कृतिक, कवीमन असलेल्या पालिका कर्मचाऱ्याची व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करावी, अशी मागणी डोंबिवलीकरांकडून केली जात आहे. पालिकेत अनेक साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारे, राज्य पुरस्कार मिळविणारे काही कर्मचारी सक्रिय आहेत. त्यांची वर्णी लावली तर नाट्यगृहांना नवे रूप येईल, असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.
सध्या दोन्ही नाट्यगृहाची जबाबदारी माणिक शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहे. लधवा यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले नाही. लधवा यांची कोणत्या विभागात बदली करायची यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल असे पालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.