डोंबिवली - बदलापूर पाईपलाईन महामार्गावरील वसार गावात एमआयडीसीने पाईपलाईन टाकण्यासाठी भूसंपादन केले आहे. यामध्ये रस्त्यासाठी दिलेली जागा, पाईपलाईनसाठी दिलेली जागा आणि संपादीत केलेले क्षेत्र यामध्ये तफावत असून हक्काच्या जागेसाठी स्थानिक शेतकरी गेले 25 वर्षे लढा देत आहेत.
वारंवार पाठपुरावा करूनही एमआयडीसी प्रशासन दाद देत नसल्याने अखेर शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत पोलिस प्रशासन, एमआयडीसी प्रशासन यांच्या सहकार्याने मंगळवारी बदलापूर पाईपलाईन महामार्गावरील नेवाळी नाका दिशेने येणारी वाहतूक वसार गाव येथे बंद केली आहे.
20 दिवसांचा कालावधी शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला असून यावर तोडगा न निघाल्यास पूर्ण रस्ता बंद करण्याचा इशारा आता शेतकऱ्यांनी दिला आहे.
नेवाळी नाका अंबरनाथ या बदलापूर पाईपलाईन रोडवरील बारवी धरण पाणी पुरवठा योजनेसाठी एमआयडीसीने शेतकऱ्यांचे भूसंपादन केले होते. वसार गावातील शेतकऱ्यांची जमीन देखील यामध्ये भूसंपादित झाली होती. शेतकऱ्यांना जमिनीच्या मोबदल्याची आगाऊ रक्कम देखील शासनाकडून देण्यात आली होती.
मात्र एमआयडीसीने भूसंपादनासाठी मंजुर केलेली जमिन संपादीत न करता दुसरी जमीन संपादीत केली असल्याची तक्रार वसार गावातील शेतकरी नरेश वायले यांनी केली आहे.
एमआयडीसीने भूसंपादित केलेली जमिन व शेतकऱ्यांची खासगी जमिन दोन्ही भूखंडावर एमआयडीसी आपला हक्क सांगत असून यामुळे शेतकऱ्यांना त्यांची खासगी जमिनीचा काहीही वापर करता येत नसल्याने त्यांची अडचण झाली आहे.
खासगी जागेवर व्यवसाय करण्यासाठी एमआयडीसी अधिकारी निधी मागत असल्याचा आरोप वायले यांनी केला आहे. भूसंपादन झालेली जमिन एमआयडीसीला देण्यास आम्ही तयार आहोत. मात्र खासगी जमिन शेतकऱ्यांना परत देण्यात यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. या मागणीकडे एमआयडीसी अधिकारी लक्ष देत नाहीत.
याविषयी शेतकरी शासन स्तरावर पाठपुरावा करीत आहेत. अंबरनाथ येथील उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयाने देखील एमआयडीसीला पत्रव्यवहार केला असून एमआयडीसी पाईप लाईन व रस्त्याची वहिवाट यातील भूसंपादन नोंदणी नकाशात तफावत असल्याचे आढळून आल्याचा अहवाल दिला आहे.
तशी मोजणी नकाशाची प्रत देखील एमआयडीसी कार्यालयास भूमि अभिलेखा कडून देण्यात आली आहे. वायले यांच्याप्रमाणेच येथील आणखी शेतऱ्यांच्या देखील खासगी जमिनीवर एमआयडीसीने अतिक्रमण केले आहे. एमआयडीसी अधिकारी याकडे गांर्भियाने लक्ष देत नसल्याची तक्रार वसार गावातील शेतकरी करतात.
एमआयडीसीला डिसेंबर महिन्यात रस्ता बंद करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी महामार्गावर जाहीर सुचनेचा फलक लावत दिला होता. मात्र त्याचीही दखल घेतली नसल्याने अखेर शेतकऱ्यांनी हिललाईन पोलिसांशी चर्चा करुन हा रस्ता बंद करण्याची परवानगी घेतली.
याची माहिती एमआयडीसी प्रशासनाला मिळताच त्यांनीही शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर मंगळवारी सकाळी शेतकरी, एमआयडीसी प्रशासन, वाहतूक पोलिस, हिललाईन पोलिस या सर्वांच्या सामंजस्याने बदलापूर पाईपलाईन महामार्गावरील एक मार्गिका बंद करण्यात आली. शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी बोलताना एमआयडीसी अधिकारी म्हणाले,
भूसंपादनाचा विषय हा एमआयडीसी प्रादेशिक विभाग यांच्याशी निगडीत आहे. आमच्या अभियांत्रिकी विभागाकडे रोड आणि पाईपलाईन यांचा मेंटनन्स आमच्याकडे आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा निघावा यासाठी वारंवार वरिष्ठांकडे
पत्रव्यवहार व तोंडी विनंती करण्यात आली आहे.
वाहतूक कोंडी
एमआयडीसी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बदलापूर दिशेला जाणाऱ्या मार्गावर दोन मार्गिका बनवित वाहतूक विभागाकडून त्या मार्गावर दुहेरी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. तर नेवाळी नाका जाणारा वाहतुकीचा मार्ग पूर्णतः बंद करण्यात आला आहे. एक मार्ग बंद झाल्याने या मार्गावर वाहन कोंडीची मोठी समस्या उद्भवणार आहे.
मंगळवारी दुपारीच अवजड वाहने व इतर वाहनांची वाहतूक अरुंद मार्गावरुन करताना वाहन चालकांची दमछाक झाली होती. सकाळ संध्याकाळ तर येथे आणखी कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. साधारण 30 मीटरचा परीसर हा बंद करण्यात आल्याने येथून वाहने या मार्गावरुन त्या मार्गावर वळविताना वाहन चालकांची मोठी कसरत होणार आहे.
1972 ला येथील जागांचे भूसंपादन करण्यात आले होते. परंतू भूसंपादनात पाईपलाईन व रस्ता हा वेगळ्या जागेत असून भूसंपादन वेगळ्याच जागेचे केले आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या जागेत काही व्यवसाय करता येत नाही. एमआयडीसी प्रादेशिक विभाग अधिकारी याकडे मुख्यतः टाळाटाळ करीत आहेत.
गेल्या 25 वर्षापासून यासाठी आम्ही लढा देत आहोत, पण आम्हाला दाद दिली जात नाही. यामुळे अखेर हिललाईन पोलिसांसोबत चर्चा करुन आम्ही आमच्या हक्काच्या जागेतील मार्ग बंद करण्याचा निर्णय घेत आज हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे. 20 दिवसांत यावर काही तोडगा निघाला नाही तर महामार्गावरील दोन्ही मार्ग आम्ही बंद करुन त्या जागेत शेती करणार आहोत.
नरेश वायले, शेतकरी
लहु वायले यांची भूसंपादनाविषयी तक्रार आहे आणि त्याबाबत प्रादेशिक कार्यालय एमआयडीसी, महसूल विभाग आणि टिएलआर यांची कारवाई सुरु आहे. तो प्रश्न लवकरच मार्गी लागेल. परंतू या रस्त्यावर सध्या मोठा खड्डा पडला असून जोपर्यंत भूसंपादनाचा विषय मार्गी निघत नाही.
तोपर्यंत स्थानिक हा खड्डा बुजवू देत नाहीत. त्यामुळे हिललाईन पोलिस ठाणे, स्थानिक शेतकरी यांच्याशी चर्चा केल्यानंतर सध्या बदलापूर महामार्गावरील वाहतूक ही एका मार्गावरुन हलविण्यात आली आहे. हा प्रश्न मार्गी लागल्यानंतर येथील खड्डे बुजविण्यात येतील.
व्ही.पी.शेलार, उप अभियंता, एमआयडीसी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.