Mumbai Crime - उसने घेतलेले 16 लाख रुपये परत करण्यासाठी सारखा तगादा लावल्याने तिघांनी कल्याण मधील निवृत्त तिकीट तपासणीसाची शहापूर येथे हत्या करत त्याचा मृतदेह शेतात पुरल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शहापूर पोलिसांनी दोघांना अटक केली असून तिसऱ्या मारेकऱ्याचा शोध घेतला जात आहे.
गोपाळ नायडू (वय 62) असे हत्या झालेल्या तिकिट तपासणीसाचे नाव आहे. तर अरुण फर्डे (वय32) व सोमनाध जाधव (वय 35) याला पोलिसांनी अटक केली असून रमेश मोरे (वय35) याचा शोध सुरु आहे.
शहापूर तालुक्यातील किन्हवली मार्गावरील धसई शिवनेर गावात एका ज्येष्ठ नागरिक व्यक्तिची निर्घृण हत्या करून त्यांचा मृतदेह याच गावातील अरुण फर्डे यांच्या शेतात पुरण्यात आला आहे, अशी माहिती शहापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार उपासे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक सुरेश मनोरे यांना मिळाली.
पोलिसांनी एकत्रितपणे या प्रकरणाचा तपास सुरू केला. धसई गावातील फर्डे यांच्या शेतातील पुरेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला.
मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी ठाणे जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना संपर्क केला. कल्याण मधील कोळसेवाडी पोलीस ठाण्यात एक 63 वर्षाची व्यक्ति बेपत्ता असल्याची नोंद आढळली. पोलिसांनी संबंधित तक्रारदारांना संपर्क करुन मृतदेह दाखविला. तो मृतदेह निवृत्ती रेल्वे तिकीट तपासणीस गोपाळ नायडू यांचा असल्याचे उघड झाले.
कल्याणच्या नागरिकाची शहापूरमध्ये हत्या करुन मृतदेह धसई गावातील शेतात का पुरण्यात आला. या दिशेेने तपास करुन पोलिसांनी शेत मालक अरुण फर्डे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी सुरू केली.
या चौकशीतून रमेश मोरे हा या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. मोरे, अरुण, सोमनाथ यांनी ही हत्या केली असल्याचे पोलीस तपासात उघड झाले.
पोलिसांनी सांगितले, टिटवाळा येथील रमेश मोरे याने मयत गोपाळ नायडू यांच्याकडून दोन वर्षापूर्वी 16 लाख रुपये उसने घेतले होते. ते परत करण्याचा तगादा गोपाळ यांनी लावला होता. रमेश गोपाळ यांना पैसे परत न देण्याच्या मनस्थितीत होता. गोपाळ दररोज पैसे मागत असल्याने रमेशने गोपाळ यांचा काटा काढण्याचे ठरविले.
पैसे परत देण्याचा निरोप देऊन रमेशने गेल्या आठवड्यात गोपाळ यांना शहापूर येथे बोलविले. पैसे परत न करता त्यांचा शहापूर जवळील धसई गाव हद्दीत निर्घृण खून करुन त्यांचा मृतदेह अरुण फर्डे यांच्या शेतात कोणाला संशय येऊ नये म्हणून पुरण्यात आला. या हत्येची माहिती मिळताच मोठ्या कौशल्याने पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली.
ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर अधीक्षक दीपाली घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे, पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, हवालदार प्रकाश साहील,
संतोष सुर्वे, प्रवीण हाबळे, सतीश कोळी, हेमंत विभुते, दीपक गायकवाड, स्वपिन बोडके यांनी हा गुन्हा उघडकीला आणला. शहापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.