मुंबई, ता. 18 : मुंबई विद्यापीठाने पदविका, पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या व अंतिम सत्रातील परीक्षांच्या नियोजनासाठी मार्गदर्शक तत्वे निर्गमित केली आहेत. यानुसार अंतिम सत्राच्या, वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा जुलै महिन्यात घेण्यात येणार आहेत. त्यानुसार पदवी आणि पदव्यूत्तर अभ्यासक्रमांच्या आणि अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या परीक्षा, ग्रेडींग पद्धतीनुसार विद्यार्थ्यांचे मुल्यमापन करुन निकाल जाहीर करणे, पीएचडी आणि एमफिलच्या विद्यार्थ्यांना प्रबंध सादर करण्यास सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यासह विविध माहितीचे परिपत्रक विद्यापीठाने जारी केले आहे.
या परिपत्रकानुसार सत्र पद्धतीतील दोन वर्षाच्या अभ्यासक्रमांसाठी चौथ्या सत्राची परीक्षा, तीन वर्षाच्या अभ्यासक्रमांसाठी सहाव्या सत्राची परीक्षा, चार वर्षाच्या अभ्यासक्रमांसाठी आठव्या सत्राची परीक्षा, पाच वर्षाच्या अभ्यासक्रमांसाठी दहाव्या सत्राची परीक्षा घेण्यात येईल.
तसेच वार्षिक पद्धतीतील एक वर्षाच्या अभ्यासक्रमांसाठी पहिल्या वर्षाची परीक्षा, दोन वर्षाच्या अभ्यासक्रमांसाठी दुसऱ्या वर्षाची परीक्षा, तीन वर्षाच्या अभ्यासक्रमांसाठी तिसऱ्या वर्षाची परीक्षा आणि चार वर्षाच्या अभ्यासक्रमांसाठी चौथ्या वर्षाची परीक्षा घेण्यात येणार असल्याचे परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे.
अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रासाठी प्रविष्ठ असलेल्या विद्यार्थ्यांच्या एटीकेटीच्या परीक्षा या सुद्धा जुलै महिन्यातच घेण्यात येणार आहेत. विशेष बाब म्हणजे जुलै 2020 मध्ये घेण्यात येणाऱ्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा या 13 मार्च 2020 पर्यंत शिकविण्यात आलेल्या अभ्यासक्रमानुसार घेण्यात येणार आहेत.
अंतिम वर्षाचे विद्यार्थी सोडून इतर विद्यार्थ्यांचे मुल्यमापन ग्रेडींग पद्धतीनुसार ( 50 टक्के अंतर्गत व 50 टक्के मागील सत्रातील गुण ) करुन निकाल जाहिर करण्यात येईल व त्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात येईल.
अनुत्तीर्ण विषयांची परीक्षा ही महाविद्यालय, विद्यापीठाचे शैक्षणिक विभाग सुरू झाल्यानंतर 120 दिवसाच्या आत घेण्यात येईल.
ज्या विद्यार्थ्यांना एटीकेटीच्या नियमामुळे शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये प्रवेश मिळाला नव्हता अशा विद्यार्थ्यांना सुद्धा पुढील वर्गात प्रवेश देण्यात येईल व त्यांच्या अनुत्तीर्ण विषयांची परीक्षा महाविद्यालय, विद्यापीठ विभाग सुरू झाल्यानंतर 120 दिवसाच्या आत घेण्यात येईल.
शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये अंतिम वर्ष सोडून इतर वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या सम सत्राच्या (2,4,6,8) या परीक्षांच्या निकालाची कार्यवाही सरकार आदेशान्वये 50 टक्के चालू सत्रातील अंतर्गत गुण व 50 टक्के मागील सत्रातील गुण ग्राह्य धरून करण्यात येईल.
वार्षिक पद्धतीच्या अभ्यासक्रमांमध्ये अंतर्गत गुणांची पद्धत असल्यास अंतिम वर्ष वगळून इतर परीक्षांचा निकाल हा अंतर्गत परीक्षेचे गुण हे 100 टक्के ग्राह्य धरून जाहीर करण्यात येईल.
ज्या अभ्यासक्रमांना अंतर्गत गुणांची पद्धती नसेल अशा अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांना मागील सत्रातील मिळालेल्या गुणांच्या आधारे निकाल जाहीर करण्यात येईल. तसेच 50 टक्के अंतर्गत गुण व 50 टक्के मागील सत्रातील गुण याबाबत अवलंबविण्याच्या कार्यपद्धतीबाबत विद्यापीठाकडून स्वतंत्रपणे परिपत्रक निर्गमित करण्यात येणार आहे.
अंतिम सत्रातील/ वर्षातील विद्यार्थ्यांच्या अंतिम सत्रातील परीक्षा किंवा मागील सत्रातील अनुत्तीर्ण विषयांची परीक्षांच्या पद्धती, कालावधी इत्यादी बाबतही स्वतंत्ररित्या परीपत्रकान्वये जाहिर करण्यात येईल.
ज्या परीक्षांच्या परीक्षा अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 31 मार्च 2020 होती, अशा परीक्षांचे परीक्षा अर्ज भरण्यासाठी विद्यापीठ सुधारीत तारखा नमूद करून परिपत्रक जाहिर करणार आहे.
पीएचडी आणि एमफीलचे व्हायवा-व्होसे ऑनलाईन पद्धतीने घेण्यासाठीही कार्यप्रणाली विद्यापीठाकडून जाहीर करण्यात येणार आहे. स्वायत्त महाविद्यालये आणि विभाग यांना सुद्धा परीक्षेत एकरुपता येण्यासाठी वरील कार्यपद्धती अवलंबिता येणार असल्याचे परिपत्रामध्ये नमूद करण्यात आले असल्याचे संचालक, परीक्षा व मुल्यमापन मंडळ डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.
दूर व मुक्त अध्ययन संस्थेतील (आयडॉल) प्रविष्ठ विद्यार्थ्यांबाबत स्वतंत्रपणे परिपत्रक लवकरच निर्गमित करण्यात येणार आहे.
mumbai university issued important notification about TY exams and declared moth of exam
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.