मुंबई : मुंबईला कोरोनाचा फटका मोठ्या प्रमाणात बसला आहे. मात्र, त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नांना काही प्रमाणात यश आले असून, सुरुवातीला असणारा 9 टक्के मृत्यू दर आता 3.5 टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात सरकारला यश आले आहे. यापुढेही युद्धपातळीवर काम करून कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती राज्याचे वस्त्रोद्योगमंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली. झूम ऍपच्या माध्यमातून पत्रकार परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते.
मुंबईत आतापर्यंत 76 हजार 628 चाचण्या करण्यात आल्या असून, त्यापैकी 6 हजार 879 लोकांना लागण झाली आहे; तर 1364 लोकांना उपचार करून घरी पाठवण्यात आले आहे. मुंबईत कोरोनामुळे आतापर्यंत 290 जणांचा मृत्यू झाला आहे. शहराची लोकसंख्या लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणात क्वारंटाईनची सोयही करण्यात आलेली आहे. धारावी, मालवणी, गणपत पाटील नगर यांसारख्या भागावर लक्ष देऊन, त्यातून 6500 लोकांच्या चाचण्या केल्या. त्यात 240 रुग्ण सापडले, असेही अस्लम शेख यांनी यावेळी सांगितले.
मुंबईतील कंटेन्नेंट झोनमधील ज्येष्ठ नागरिकांच्या वाढत्या चाचण्यांसाठी केंद्राकडे पाठपुरावा केला जात आहे. मुंबईतील हॉटस्पॉट भागात शीघ्र कृती दलाची स्थापना करून वार्डनिहाय तपासणी केली जात आहे. झोपडपट्टीतल्या लोकांच्या विलगीकरणासाठी शाळा, इतर इमारती ताब्यात घेऊन तेथे क्वारंटाईनची व्यवस्था केलेली आहे. धारावीमध्ये सव्वा लाख लोकांची घरोघरी जाऊन तपासणी करण्याचे काम केले, त्यात 1300 पेक्षा जास्त चाचण्या केल्या आहेत. परदेशातून विमान प्रवास करून मुंबईत आलेल्या तीन लाख लोकांची तपासणी करण्यात आलेली आहे. तसेच डायलिसिसच्या रुग्णांसंदर्भात तक्रारी येत होत्या; परंतु आता अशा पेशंटसाठी सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था केलेली आहे, असेही शेख यांनी यावेळी सांगितले.
मजुरांची परतण्याची व्यवस्था करणार
मुंबईत स्थलांतरित मजुरांची संख्या जवळपास 6.5 लाख आहे. त्यांना दररोज दोन वेळचे जेवण पुरवण्याचे काम मुंबई महापालिकेकडून केले जात आहे; परंतु छोट्या खोल्यांमधून दाटीवाटीने राहत असलेल्या या मजुरांना आता त्यांच्या गावी जायचे आहे. अशा मजुरांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू असून मुंबईतील सर्व पोलिस ठाण्यांमध्ये, महसूल विभागाची यंत्रणा त्यासाठी कामाला लागलेली आहे. कोणत्या राज्यातील, शहरातील मजूर आहेत त्यांची माहिती एकत्र करून त्यांना टप्प्याटप्प्याने रेल्वे किंवा बसने त्यांच्या गावी पाठवण्याची सोय केली जाईल. सर्व व्यवस्था झाल्यानंतर अशा मजुरांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर त्यांना पाठवायची काय व्यवस्था करण्यात आली आहे याची माहिती दिली जाईल, असेही शेख म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.