अलिबाग : नव्या हंगामाची सुरुवात करण्यास सरसावलेल्या रायगड जिल्ह्यातील मच्छिमारांना वादळी हवामानाचा जबर तडाखा बसला आहे. 20 ऑगस्टपर्यंत मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा बंदर विभागाने दिला आहे. यामुळे मासेमारीवरील दोन महिन्याचा शासकीय बंदी कालावधी संपून अर्धा महिना उलटला तरी मासेमारी नौका अद्यापही बंदरातच नांगरलेल्या असल्याने येथिल मच्छिमार आर्थिक संकटात सापडले आहेत.
लॉकडाऊनमुळे आपल्या राज्यात गेलेले कामगार आणि तीनवेळा आलेल्या वादळामुळे मागील मासेमारी हंगाम पुर्णपणे वाया गेला होता. नव्या हंगामाची सुरुवात चांगली होईल अशी अपेक्षा रायगडमधील मच्छिमारांची होती. परंतु ही अपेक्षा धुळीला मिळाली आहे. लॉकडाऊननंतर परतलेल्या कामगारांचे पगार, नौकांची डागडुजी, जाळ्यांची खरेदी, कर्जाचे हप्ते भरुन संसार कसा चालवायचा, असा प्रश्न येथील मच्छिमारांना सतावू लागला आहे. काही दिवसात येणाऱ्या गौरी-गणपतीच्या सणावर या आर्थिंक तंगीचा परिणाम दिसून येईल, असे म्हणणे रायगड मच्छिमार संघांचे उपाध्यक्ष मनोहर बैल यांचे आहे. शासकीय बंदी 1 ऑगस्ट रोजी संपल्यापुर्वी नव्या हंगामासाठी निसर्ग चक्रीवादळाच्या जखमा पुसत मच्छिमारांनी जय्यत तयारी केली होती. परंतु 4 ऑगस्टपासून सुरु झालेले वादळ अद्याप शांत झालेले नाही. यामुळे मोरा, मांडवा, वरसोली, साखर-आक्षी, नागाव, राजपुरी, एकदरा, मुरुड, जीवनाबंदर, दिवेआगर, शेखाडी येथील शेकडो नौका अद्याप बंदराच आहेत. वादळ शांत होण्याची वाट येथील मच्छिमार पहात आहे.
मच्छिमारांसमोरील समस्या
* ससुन डॉकमधील बंद असलेला घाऊक व्यापार
* अद्याप न मिळालेला डिझल परतावा
* न पोहचलेली निसर्ग चक्रीवादळाची नुकसानभरपाई
* गावाकडून परतलेल्या कामगारांचा संपलेला पैसा-अडका
* कर्ज वसुलीसाठी बॉंकांचा तगादा
मागील वर्षातला हंगाम पुर्णपणे वाया गेला; मात्र कामगारांचा पगार, डिझेल, नौकांची दुरुस्ती यासाठी येणारा खर्च थांबलेला नाही. गौरी गणपतीवर अपार श्रद्धा असतानाही हा सण कसा साजरा करायचा, असा प्रश्न पहिल्यांदाच सतावत आहे. शासनाने याची दखल घेऊन कोळीबांधवांना दिलासा द्यावा.
-सत्यजीत पेरेकर
मच्छिमार, अलिबाग कोळीवाडा
-----------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.