खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात १५३ अ कलमाअतंर्गत अखेर गुन्हा दाखल झाला आहे. उद्या या दोघांना कोर्टात हजर केलं जाणार आहे.
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत तसेच परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह नाव माहिती नसलेल्या शिवसैनिकांविरोधात खार पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. ठाकरे आणि राऊत यांनी शिवसैनिकांना चिथवलं असून आपल्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं आहे. तसेच शिवसैनिकांनी आंदोलनस्थळी रुग्णवाहिका आणली होती, असंही राणा दाम्पत्यानं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.
राणा दाम्पत्यावर दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करणारं कलम १५३ अ लावण्यात आलं आहे. हा गंभीर आणि अजामिनपात्र गुन्हा आहे. या कलमांतर्गत जामीन देण्याचा अधिकार हा कोर्टाला आहे. त्यामुळं उद्या राणा दाम्पत्याला कोर्टात हजर करण्यात येईल त्यानंतर त्यांच्या सुटकेबाबत निर्णय होईल.
राणांवर जुलमी पद्धतीनं महाविकास आघाडीचं सरकार कारवाई करतेय. राणा दाम्पत्याच्या कारवाईचा आम्ही निषेध करतो, असं विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.
राणा यांना पोलीस घेऊन गेल्यानंतर युवा सेनेचे नेते वरूण सरदेसाईंसह उपस्थित शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी त्यांनी मुंबई आपल्या साहेबांची नाही कुणाच्या बापाची अशा स्वरुपाच्या जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री, राऊत आणि परब यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या राणा यांच्या मागणीला पळकुट्यांच्या मागण्यांकडे लक्ष देत नसल्याचे म्हटले आहे.
कडक पोलीस बंदोबस्तात अखेर पोलिसांनी बाहेर काढले असून, त्यांना येथून खार पोलीस ठाण्यात घेऊन जाणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, ज्यावेळी राणांना पोलीस घेऊन जात होते. त्यावेळी उपस्थितांपैकी कुणीतरी पोलिसांच्या गाडीवर बाटली फेकल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, राणा यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आक्रमक भूमिका घेत रवी राणा यांनी संजय राऊत, अनिल परब आणि मुख्यमंत्र्यांवरदेखील गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच पोलीस स्टेशन न्यायचं असेल तर, वॉरंट द्या, अशी मागणी नवनीत राणा यांनी केली आहे. परंतु, ज्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यासाठी वॉरंट देण्याची गरज नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
राणा दाम्पत्याला नोटीस बजावल्यानंतरही ते आंदोलनावर ठाम होते. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता, अशी तक्रार शिवसैनिकांकडून करण्यात आली होती. त्यानंतर खासदार राणा यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल आहे. या सर्वांमध्ये युवासेनेचे नेते वरूण सरदेसाई यांनी खार येथील उपस्थित सर्व शिवसैनिकांना शांत राहून कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले आहे.
अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी त्यांचे आंदोलन मागे घेतले आहे. मात्र, यानंतरही हजारो शिवसैनिक राणा यांच्या खार येथील निवास्थानाबाहेर थांबलेले असून, राणा दाम्पत्य जोपर्यंत माफी मागत नाहीत. तो पर्यंत येथून हटणार नाही या निश्चयावर ठाम आहेत. त्यामुळे पोलिसांना राणा दाम्पत्यांना बाहेर काढणे कठीण जात आहे.
पंतप्रधान मोदी मुंबईत येत असल्याने आम्ही आंदोलन मागे घेत असल्याचं राणा दाम्पत्याने सांगितलं आहे. मातोश्री आमच्या हृदयात आहे. हिंदूहृदय सम्राट आमच्या मनात आहेत. हनुमान जयंतीच्या दिवशी चालिसा न वाचणं हे या सरकारचं पाप आहे. आमचा मातोश्रीसमोर हनुमान चालिसा वाचण्याची मागणी कायम राहणार आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा असल्याने आम्ही आंदोलन मागे घेतल असल्याचं राणांनी सांगितलं.
मला आणि नवनीत राणांना विरोध करणं हे योग्य नाही
आम्हाला पोलिसांच्या माध्यमातून ताब्यात घेण्यात आलं
आमच्यावर हल्ला करण्याचं षडयंत्र
पश्चिम बंगालसारखी महाराष्ट्रात परिस्थिती
श्रीरामाचा अपमान करणारे मुख्यमंत्र्यांना रामभक्त जागा दाखवतील
मुख्यमंत्र्यांना प्रचंड अहंकार, तो त्यांच्या डोक्यात गेल्यामुळे हे घडतंय
भाजपच्या शिष्टमंडळाने तातडीने मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांची भेट घेतलीय यावेळी त्यांनी आयुक्तांना पत्रही दिलंय. कंबोज यांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर हे भाजपविरोधात षडयंत्र असल्याचं या नेत्यांनी म्हटलंय.
मुंबईमधील हाय व्होल्टेज ड्रामाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आज कोल्हापूर येथे होणाऱ्या सभेला जाणार नसल्याची माहिती समोर येत आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी स्वतः गृहमंत्री संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवणार असून, नवनीत राणा आणि रवी राणा यांना अमरावती येथे सुरक्षित पोहचवण्याची जबाबदारी गृह खात्याची आहे. त्यामुळे राणा दाम्पत्यांना राज्य सरकार अमरावतीला सुखरूप पोहचवणार असल्याची चर्चा आहे.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भोंग्यांच्या प्रकरणात येत्या २५ तारखेला सर्वपक्षीय बैठक बोलवल्याची माहिती दिली. राणा म्हणजे कोणीतरी पुढे केलेलं प्यादं असल्याचं त्यांनी म्हटलंय.
मोहित कंबोज यांच्या गाडीची तोडफोड झाल्यानंतर भाजपने पत्रकार परिषद घेतली. विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्यात अराजकता असल्याचं म्हटलं. यासाठी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू कऱण्याची वेळ आल्याचं ते म्हणाले.
शिवसैनिकांनी राणा दाम्पत्यासाठी रुग्णवाहिका आणली आहे. त्यावर बंटी और बबली यांच्यासाठी राखीव असल्याचा बोर्ड लावण्यात आला आहे. या रुग्णवाहिकेमार्फत राणांना अमरावतीला नेणार असल्याचं शिवसैनिकांनी सांगितलं आहे. शिवसैनिकांनी रुग्णवाहिकेतील स्ट्रेचर बाहेर काढून राणांना त्यावर नेणार असल्याचं सांगितलं.
मुंबईत वातावऱण तापल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील मुंबईला रवाना झाले आहेत. दौरा सोडून त्यांनी राजधानी गाठण्याचा निर्णय घेतलाय. मुंबईतील घडामोडींवर नजर ठेऊन असल्याचं त्यांनी सांगितलं.
भाजप आमदार आणि खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री निवासस्थानासमोर सकाळी 9 वाजता हनुमान चालिसाचे पठन करण्याचा इशारा दिला होता. मात्र, सकाळचे अकरा वाजत आले तरी, राणा दाम्पत्य अद्याप खार येथील त्यांच्या घरातून खाली उतरलेले नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी नऊ वाजून गेले राणा दाम्पत्य कुठंय असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच जो पर्यंत राणा दाम्पत्य अमरावतीला परत जात नाहीत. तो पर्यंत येथून हलणार नसल्याचा निर्धार केला आहे.
शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर राणा दाम्पत्यानीही त्याला प्रत्युत्तर देणार असल्याचं सांगितलं. काही करून मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठणावर राणा ठाम आहेत. यानंतर कायदा सुव्यवस्था नियंत्रणात राहण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी राणांच्या घरात दाखल झाले आहेत.
खारमधील घरात राणांनी हनुमानाच्या पाया पडून मातोश्रीवर जाणार असल्याचा एल्गार केला आहे. आम्ही या घरातून बाहेर पडणार असून आम्हाला काही झाल्यास त्याची जबाबदारी संपूर्ण मुख्यमंत्र्यांवर असणार आहे, असं रवी राणांनी स्पष्ट केलं आहे. कार्यकर्ते बोलावून आमच्यावर हल्ला करण्याचा हा प्रयत्न आहे. महाराष्ट्राच्या सुखशांतीसाठी आम्ही हे करत असल्याचं राणांनी सांगितलंय.
२००-३०० शिवसैनिक खारमधील इमारतीत घुसले आहेत. संबंधित इमारतीच्या आठव्या मजल्यावर राणा यांची सदनिका आहे. माजी महापौर महाडेश्वर हे देखील या ठिकाणी दाखल झाले आहेत. नऊ वाजले आहेत. एकतर तुम्ही खाली या, नाहीतर आम्ही वर येतो, असा इशारा शिवसैनिकांनी दिल आहे. पोलीस उपायुक्त मंजुनाथ शिंदे देखील या ठिकाणी दाखल झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. (Ravi Rana Vs Shivsena)
नीट राज्यकारभार सुरू असताना जाती धर्मात तेढ निर्माण करायची आणि राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे. आम्ही राज्यकर्ते म्हणून सगळे प्रश्न सोडवत आहोत. पण हा केवीलवाणा प्रय़त्न करून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे.
राज्यात सध्या हनुमान चालिसा आणि भोंग्यांच्या प्रकरणावरून वातावरण तापलं आहे. यातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे मातोश्री समोर हनुमान चालिसा पठणावर ठाम होते. (Navneet Rana Vs. Shivsena)
त्यांच्या या निर्णयामुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. रात्रभर शिवसैनिकांनी मातोश्रीसमोर पहारा दिला. नवनीत राणा आणि रवी राणा हनुमान चालिसा पठण करण्यासाठी आल्यास त्यांना धडा शिकवणार असल्याचा पवित्रा शिवसैनिकांनी घेतला आहे. (Navneet Rana News)
दरम्यान, या प्रकरणात आता ट्विस्ट आला असून राणा दाम्पत्याने माघार घेतली आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्या मुंबईत दौरा असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेला अडथळा नको, यासाठी आम्ही आंदोलन मागे घेत असल्याचं नवनीत राणा यांनी सांगितलं. पंतप्रधानांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उद्धभवू शकतो. त्यामुळे आम्ही अमरावतीला माघारी जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.