मुंबई : कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आज ईडीनं तब्बल ९ तास चौकशी केली. आजची चौकशी संपल्यानंतर रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास पाटील ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. पण चौकशीनंतर बाहेर आल्यानंतर पाटील यांच्या चेहऱ्यावर कुठलाही तणाव दिसत नव्हता उलट ते हसतमुख चेहऱ्यानं बाहेर आलेले दिसले. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदही घेतली. (NCP Maharastra President Jayant Patil ED Inquiry ended after almost 9 hours)
सकाळी साडे आठ वाजल्यापासून जयंत पाटील यांची ईडीकडून चौकशी सुरु झाली होती. ही चौकशी तब्बल नऊ तासांहून अधिक काळानंतर रात्री साधारण ९ वाजल्यानंतर संपली. त्यानंतर साडेनऊच्या सुमारास पाटील ईडीच्या कार्यालयाबाहेर पडले. यावेळी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. राज्यातील विविध भागातून हे कार्यकर्ते इथं जमले होते.
दरम्यान, जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संबोधित केलं. "ईडीच्या अधिकाऱ्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरं आपण दिली. इतक्या तासांमध्ये ईडीच्या कार्यालयात बसून माझं 'शिवकालीन महाराष्ट्र' हे पुस्तक अर्ध वाचून झालं. ईडीकडं आता मला विचारायला कुठलेच प्रश्न शिल्लक नसतील. ईडीच्या अधिकाऱ्यांनी चांगली वागणूक दिली, त्यांच्याबद्दल तक्रार नाही" अशी प्रतिक्रिया यावेळी जयंत पाटील यांनी चौकशीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
जयंत पाटलांची चौकशी झाली ते प्रकरण काय?
IL&FS कंपनीला 2008 ते 2014 या कालावधीत रस्ते उभारणीचं कंत्राट मिळालं होतं. हे कंत्राट उपकंत्राटदार देण्यात आलं. उपकंत्राटदारानं कथितरीत्या जयंत पाटील यांच्याशी संबधित कंपन्यांना पैसे दिल्याचा आरोप आहे. जयंत पाटील त्या काळामध्ये राज्याचे गृहमंत्री होते.
IL&FS कंपनीवर 91 हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे. अनेक प्रकल्प अपूर्ण अवस्थेत असल्यामुळे त्यांच्याकडे पैसा नाही. सरकारकडून मिळणारे 17 हजार कोटी अडकले. कंपनीचे एकूण 250पेक्षा अधिक सब्सिडरीज आणि जाँईंट व्हेंचर्स आहेत. जमिनीच्या वादात जास्त नुकसान भरपाई दिल्यामुळं प्रकल्पांचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला. अनेक महत्त्वाचे म्युचअल फंडस् आणि पेन्शन योजना टांगणीवर लागल्या आहेत. याच प्रकरणात जयंत पाटील यांचेही नाव समोर आल्याचं ईडीने म्हटलं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.