अलिबाग : तीन वर्षांत रायगड जिल्ह्यात बेकायदा मद्यप्रकरणी तब्बल 672 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत; तर 776 जणांना अटक झाली आहे. त्यामुळे अगदी झपाट्याने फोफावत असलेल्या या बेकायदा व्यवसायाला पायबंद घालण्याचे आव्हान जिल्ह्याचे नवे पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांच्यासमोर आहे. लॉकडाऊन काळातही जिल्ह्यात हा व्यवसाय तेजीत होता.
पर्यटकांची पहिली पसंती असलेल्या रायगड जिल्ह्यात काही वर्षांपासून औद्योगिकीकरण वाढले आहे, परंतु त्याचा ग्रामीण बाजही कायम आहे. डोंगर-दऱ्यांतील वाड्या हे जिल्ह्याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. त्याचाच फायदा घेत जिल्ह्यात बेकायदा मद्यनिर्मितीपासून विक्री आणि वाहतुकीत वाढ झाली आहे. त्यामुळेच या व्यवसायावर अंकुश ठेवण्यासाठी रायगड दलाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. 2018 पासून ते सप्टेंबर 2020 दरम्यान पोलिसांनी 672 जणांविरोधात गुन्हे दाखल करून 776 जणांना अटक केली आहे. ही कारवाई समाधानकारक असली तरी आजही जिल्ह्यातील ग्रमीण भागात मद्याचा खुलेआम व्यवसाय सुरू आहे. अलिबाग, पेण,मुरूड, सुधागड (पाली), कर्जत या तालुक्यांतील दुर्गम भागात खाडी व नदीकिनारी मोठ्या प्रमाणात मद्यनिर्मितीचे अड्डे आहेत. याद्वारे कोट्यवधींची उलाढाल होते. गुळापासून हे मद्य तयार करण्यात येते. सूत्रांनुसार जिल्ह्यातील सुमारे 70 टक्के मद्यपी या गावठी मद्याचे सेवन करतात.
गावठी मद्यामुळे जिल्ह्यातील अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे या बेकायदा व्यवसायावर घाव घालण्याचे मोठे आव्हान नवे अधीक्षक दुधे यांच्यासमोर मोठे आव्हान आहे.
वाहतुकीसाठी दुचाकीचा उपयोग
खाडी, नदीकिनारी दुर्गम भागात गावठी मद्य तयार करण्यात येते. त्यानंतर दुचाकीद्वारे ते विक्रेत्यांपर्यंत पोहचवण्यात येते. त्यानंतर छुप्या पद्धतीने विक्री केली जाते. गावठी मद्य बंद व्हावे यासाठी अनेक संस्था, संघटनांनी पोलिस ठाण्यात तक्रारी केल्या आहेत.
गावठी मद्याच्या आहारी गेल्याने अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे विक्री, वाहतूक व निर्मितीवर अंकुश ठेवण्यासाठी ठोस कारवाई करण्यात येणार आहे. गावठी मद्याचा बेकायदा व्यवसाय 100 टक्के बंद करण्याचा प्रयत्न आहे. लवकरच याबाबत माहिती घेऊन कारवाई करून गुन्हेगारांना जेरबंद केले जाईल.
- अशोक दुधे,
पोलिस अधीक्षक, रायगड
वाड्या-वस्त्यांमध्ये आजही मोठ्या प्रमाणात बेकायदा मद्यविक्री सुरू आहे. या व्यवसायावर स्थानिक पोलिसांकडून ठोस कारवाई होत नाही. नवे अधीक्षक ठोस कारवाई करून मद्यमाफियांना जेरबंद करतील अशी अपेक्षा आहे.
- स्वप्नील म्हात्रे,
संभाजी ब्रिगेड
----------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.